Home महामुंबई ठाणे घोडयाच्या पाठीवरून नेले जाते पाणी

घोडयाच्या पाठीवरून नेले जाते पाणी

0

मुळची खालापूर तालुक्यातील, मात्र कर्जत तालुक्यातून सर्व व्यवहार होत असलेली गारबेटवाडी सध्या पाणीटंचाईच्या समस्येने बेचैन आहे. 

नेरळ- मुळची खालापूर तालुक्यातील, मात्र कर्जत तालुक्यातून सर्व व्यवहार होत असलेली गारबेटवाडी सध्या पाणीटंचाईच्या समस्येने बेचैन आहे. वाडीतील पिण्याच्या पाण्याने तळ गाठल्याने येथील नागरिक घोडयाच्या पाठीवरून पाणी आणत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी आता मुक्या जनावरांनाही वणवण करावी लागत असल्याचे समोर आले आहे.

माथेरानच्या डोंगररांगामध्ये असलेल्या गारबेट वाडी येथे जाण्यासाठी कर्जत तालुक्यातून पायवाट आहे. नेरळ-माथेरान घाटरस्त्याने जाताना ही पायवाट लागते. मुख्य रस्त्यापासून या वाडीपर्यंत तासभर पायपीट करावी लागते. अशा आडवाटेच्या वाडीतील सर्व व्यवहार माथेरानच्या जोरावर सुरू आहेत.

गारबेट वाडीतील आदिवासी धनगर नागरिक दुग्धव्यवसाय आणि अश्वपालनावर उदरनिर्वाह करतात. माथेरानमध्ये असलेले घोडे हे याच वाडीतील असतात. वाडीतील २७ घरांच्या वस्तीला जानेवारीपर्यंत पिण्याचे पाणी तेथील नसíगक झ-यावर मिळते.

पुढे मात्र डव-याचे पाणी आणण्यासाठी नंबर लावून रात्र जागून काढावी लागते. आता तर येथील पाण्याची स्थिती आणखी गंभीर झाली असून आता घोडयावरून पाणी आणण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे. माथेरानला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नेरळ-माथेरान घाटरस्त्याने जात असून वाडीकडे जाणा-या रस्त्याजवळ ही जलवाहिनी थेंब-थेंब गळते. ते पाणी डब्यांमध्ये साठवून हे नागरिक घोडयावरून वाडीत नेतात.

मात्र जाता-जाता यातील अध्रे पाणी सांडून जाते. ही कसरत आणि पाण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन असलेले घोडे वापरणे हे सध्या रोजचेच झाले असून त्यामुळे या वाडीतील काही कुटुंबे सध्या माथेरानला स्थलांतरित झाले आहेत.

मात्र हे सारे कधीपर्यंत चालणार? गारबेटवाडीला हक्काची जलवाहिनी मिळणार नाही का? हा प्रश्न या नागरिकांच्या अजून ध्यानीमनीही नाही. त्याकडे सरकारी यंत्रणेचे तरी लक्ष जाते का? हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version