Home मध्यंतर उमंग गोष्ट छोटी डोंगराएवढी..

गोष्ट छोटी डोंगराएवढी..

0

लहान मुलांच्या भावविश्वात ‘गोष्टींचा’ खूप मोठा सहभाग असतो. चिऊकाऊच्या गोष्टीने सुरू झालेल्या या गोष्टींची जागा वय वाढेल तशी बदलत जाते. हळूहळू त्यात प्राणी, पक्षी, परी, राजकुमार, राक्षस, सुपरमॅन आदी यायला सुरुवात होते. पूर्वी रात्री झोपताना मुलांना घरातील वडीलधा-यांकडून गोष्टी सांगितल्या जायच्या, मनोरंजनातून शिकवण हा हेतू त्यामागे असायचा, पण कालानुरूप त्यात बदल होत वडीलधा-यांची जागा आता टीव्ही, लॅपटॉप, टॅब, मोबाईलने घेतली, गोष्टींमधून संवाद संपला, त्यामुळे साहजिकच ‘गोष्टी’ एकतर्फी झाल्या, एखादी गोष्ट ऐकल्यावर / पाहिल्यावर त्यातून मुलं स्वत:पुरती समजूत करून घेतात, जी पालकांना माहीत नसते आणि त्यामुळे गैरसमज दूर करायला वाव राहत नाही. एक सुजाण पालक म्हणून आपण याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.

त्या  दिवशी घरातलं रोजचं काम आवरत असताना माझ्या ९ वर्षाच्या मुलीने मला विचारलं, ‘आई तू काय सिंड्रेला आहेस का?’ आपली लेक आपल्याला राजकुमारी वगैरे समजते याचं कौतुक वाटलं. थोडय़ा कुतूहलाने मी तिला ‘का गं?’ असं विचारलं आणि ती काय म्हणते याकडे कान लावले. मात्र पुढच्या काही क्षणात मी निराश झाले. अगदी निरागसपणे ती सांगत होती, ‘तू सिंड्रेला वाटते कारण सिंड्रेलाला खरी आई नाही आणि तूही तुझ्या आईशिवाय इथे राहतेस, सिंड्रेलाची खोटी आई तिला खूप काम करायला सांगते आणि तिच्याशी छान नाही वागत. जेव्हा आपण आईशिवाय राहतो तेव्हा आपल्याला खूप काम करावं लागतं!’ हे सगळं ऐकल्यावर एका क्षणात सिंड्रेलाच्या गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला आणि एक पालक म्हणून मी विचारत पडले. तिला माझ्याबद्दल जे काही वाटत होतं ते नक्कीच चुकीचं होतं, मला तिने बिचारी समजावं असं मला कधीच वाटत नव्हतं. पण कुठेतरी त्या कोवळ्या मनाने त्यादृष्टीने नकळत विचार केला. सुदैवाने वेळीच लक्षात आल्यामुळे आता माझ्यावर तिचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी होती.

पण अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्या नकळत आपण मुलांच्या मनावर बिंबत असतात. लहान मुलांच्या भावविश्वात ‘गोष्टींचा’ खूप मोठा सहभाग असतो. चिऊकाऊच्या गोष्टीने सुरू झालेल्या या गोष्टींची जागा वय वाढेल तशी बदलत जाते. हळूहळू त्यात प्राणी, पक्षी, परी, राजकुमार, राक्षस, सुपरमॅन आदी यायला सुरुवात होते. पूर्वीच्या काळी रात्री झोपताना मुलांना घरातील वडीलधा-यांकडून गोष्टी सांगितल्या जायच्या, मनोरंजनातून शिकवण हा हेतू त्यामागे असायचा, पण कालानुरूप त्यात बदल होत वडीलधा-यांची जागा आता टीव्ही, लॅपटॉप, टॅब, मोबाईलने घेतली, गोष्टींमधून संवाद संपला, त्यामुळे साहजिकच ‘गोष्टी’ एकतर्फी झाल्या, एखादी गोष्ट ऐकल्यावर/ पाहिल्यावर त्यातून मुलं स्वत:पुरती समजूत करून घेतात, जी पालकांना माहीत नसते आणि त्यामुळे गैरसमज दूर करायला वाव राहत नाही. एक सुजाण पालक म्हणून आपण याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी खालील काही मुद्दय़ांवर लक्ष दिलं तर त्याची नक्कीच मदत होईल.

>> शक्यतो मुलांना गोष्टी स्वत: सांगणे आणि त्यावर चर्चा करणे.

>> मुलं जेव्हा टीव्ही किंवा ऑनलाईन कार्टून्स बघतात तेव्हा त्याकडे लक्ष द्या, कारण ब-याचदा कितीतरी अवास्तव, विध्वंसक गोष्टी कार्टूनच्या माध्यमातून दाखवल्या जातात आणि अशा प्रकारचे कार्टून्स जास्त पाहिल्यामुळे मुलांमधील संवेदनशीलता कमी होऊ शकते. कार्टून्समधील पात्र या मुलांसाठी आदर्श असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे विध्वंसक कृत्ये करण्याकडे मुलांचा कल वाढू शकतो.

>> गोष्ट किंवा कार्टून्स कोणत्याही भाषेतील असली तरी ती भाषा असभ्य/असंस्कृत नसावी. यासाठी पालकांनी जातीने लक्ष घालवे, कारण नुकतेच बोलायला लागणा-या मुलांना चांगल्या-वाईटाची जाण नसते आणि अशातच जर चुकीचे शब्द कानावर पडले तर तेच त्यांच्या बोलण्यातही येतात. दुर्दैवाने लहान मुलांसाठी कार्टून्स बनवणा-या आणि ते आपल्या वाहिन्यांवर प्रक्षेपित करणा-या लोकांच्या हे लक्षात येत नाही ही मोठी चिंतेची बाब आहे.

>> चांगल्या बोधकथा, मनोरंजन कथा, या इंटरनेट, सीडीच्या माध्यमातून मिळतात, त्या काही प्रमाणात दाखविण्याचा प्रयत्न करावा.

>> टीव्ही, लॅपटॉपवर किंवा ऑनलाईन गोष्ट बघत असताना वेळेचे भान ठेवावे, किती वेळ अशा प्रकारे गोष्ट किंवा कार्टून्स पाहता येतील हे मुलांना समजावून सांगावे, कारण या गोष्टींच्या अतिवापरामुळे डोळ्यांना त्रास होतो, तसेच ही मुलं ते बघत असताना इतकी तल्लीन होतात की, आजूबाजूला काय घडत आहे याचंही त्यांना भान राहत नाही. त्यामुळे वेळ हा मुद्दा कटाक्षाने पाळावा.

>> आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोष्टींचं वाचन. मुलांच्या वयोगटांप्रमाणे गोष्टींची पुस्तकं मिळतात, अगदी सहा महिन्यांच्या बाळासाठीही चित्ररूपात गोष्टींची पुस्तकं उपलब्ध आहेत. जर लहानपणापासून गोष्ट वाचनाची सवय आपण मुलांना लावली तर त्यांच्यात ती गोडी कायम राहील. वाचता न येणा-या वयातील मुलांना पालकांनी वेळ काढून स्वत: गोष्टी वाचून दाखवल्या तर त्यांच्यात एक सुसंवाद निर्माण होईल, शिवाय वाचनाची गोडीही निर्माण होईल.

>> मुलं पुस्तकांमध्ये, ऑनलाईन किंवा टीव्हीवर जे काही वाचतात किंवा पाहतात त्यावर त्यांच्यासोबत चर्चा करावी. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन समजण्यास मदत होईल. जर काही शंका असतील तर त्याचे निवारण वेळीच करता येईल. बघायला गेलं तर हा अमर्याद विषय आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे अनुभवही वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे एखादी गोष्ट प्रत्येकालाच लागू पडेलच असं नाही; परंतु आपल्यासाठी सर्वस्व असणा-या पाल्यांसाठी आपल्यापरीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आपण करावा इतकंच. ज्याप्रमाणे आपण मुलांना घडवत असतो, त्याचप्रमाणे मूलही आपल्यात दडलेल्या पालकाला घडवत असतात. चुकांमधून शिकण्याची आणि सुधारण्याची कला आपण शिकायला हवी आणि ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ ही उक्ती आपल्यालाही काळायला हवी.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version