Home महाराष्ट्र गोव्यातील ‘इफ्फी’वर आज पडदा पडणार!

गोव्यातील ‘इफ्फी’वर आज पडदा पडणार!

0

गेल्या १० दिवसांपासून गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरात सुरू असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर आज समारोप सोहळ्यानंतर पडदा पडणार आहे.

पणजी- गेल्या १० दिवसांपासून गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरात सुरू असलेल्या ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर आज समारोप सोहळ्यानंतर पडदा पडणार आहे. हा सोहळा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

समारोप सोहळ्याला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड, रक्षामंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘ऑस्कर’ पुरस्कार विजेता ख्यातनाम संगीतकार ए आर रेहमान हे विशेष अतिथी या नात्याने समारोप सोहळ्याला हजर राहणार असून त्यांची समारोप सोहळ्यातील विशेष ‘अदाकरी’ सोहळ्याचे खास आकर्षण ठरणार आहे. ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २० नोव्हेंबरला गोव्यात थाटात उद्घाटन झाले होते.

केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. ख्यातनाम बॉलिवुड अभिनेता अनिल कपूर या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून हजर होता. त्यानंतर गेल्या १० दिवसांत पणजीतील आयनॉक्स चित्रपटगृहात, कला अकादमीच्या मा. दीनानाथ रंगमंदिरात तसेच मॅक्वेनिझ पॅलेसच्या चित्रपटगृहात ८९ देशांतील १९० पेक्षा जास्त विविध भाषिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्याला देश-विदेशांतील चित्रपट रसिकांकडून चांगला प्रतिसादही लाभला होता.

महोत्सवादरम्यान चित्रपट क्षेत्रातील नामवंत देश विदेशातील हस्तींनीही महोत्सव स्थळी भेट देऊन विचारांचे आदान-प्रदान केले. चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, वितरण, तंत्रज्ञान या विषयावर विस्तृत चर्चाही करण्यात आली. पुण्याच्या फिल्म्स अँड टेलिव्हिजन इस्टिटय़ुट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यासांठी केलेले प्रतिकात्मक निषेध आंदोलन वगळता हा महोत्सव यशस्वी झाल्याचा दावा आयोजक गोवा मनोरंजन सोसायटी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय यांनी केला आहे.

ख्यातनाम अभिनेता शेखर कपूर यांच्या नेतृत्वाखाली ज्युरी समिती निवडण्यात आली असून; ही समिती उद्या समारोप सोहळ्यात विविध विभागांतील उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट निर्माता, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री यांसारख्या पुरस्कारांची घोषणा करणार असून; त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. सुमारे ५० लाख रुपयांचे हे पुरस्कार असतील. शेखर कपूर यांनी पणजीत रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version