Home महामुंबई गोळीबारच्या महाराजाचा गणेश सर्वाचे आकर्षण

गोळीबारच्या महाराजाचा गणेश सर्वाचे आकर्षण

0

सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेला घाटकोपर येथील गोळीबारचा राजा यंदा मूर्तीवरील सुबक सजावटीमुळे आकर्षित होत आहे.

मुंबई – सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेला घाटकोपर येथील गोळीबारचा राजा यंदा मूर्तीवरील सुबक सजावटीमुळे आकर्षित होत आहे.

घाटकोपर येथील सखाराम सुर्वे यांनी १९६८ साली श्री गणेश सार्वजानिक उत्सव मंडळ स्थापन केले. गणरायाच्या प्रतिष्ठापनानंतर या बाप्पाने नागरिकांना वेळोवेळी सहकार्य केल्याने त्यांनी हा उत्सव आजतागायत चालू ठेवला आहे.

सुंदर, सुबक अशी १२ फुटी मूर्ती, मूर्तिकार निळकंठ राजम यांनी तयार केली असून मंडपाची सजावटही अगदी विलोभनीय व डोळे दीपवणारी आहे. शिवाय बाप्पाच्या अंगावरचे चांदीचे दागिने भक्तांचे आकर्षण ठरत आहे.

दरवर्षी भेटीच्या स्वरूपात तेथील भक्तगण काही ना काही बाप्पाला अर्पण करत असतात. कानातील चांदीचा कर्णकुंडल, सोंडेवरील नाजूक नक्षीदार दागिना, गळ्यातील कंठीहार व बाजूबंद व यंदाचे आकर्षण म्हणजे चांदीचा पाय हे बाप्पाच्या सौंदर्यात भर घालतात.

पन्नासाव्या वर्षी बाप्पासाठी खास सोन्याचे मुकुट बनवण्याचा मानस या मंडळाने केला आहे, त्यासाठीचा जमाखर्च आतापासूनच केला जातोय. ‘नवसाला पावणारा राजा म्हणून या बाप्पाची ख्याती असल्याने अनेक भक्तजण आवर्जून काही ना काही भेट बाप्पाला देतात’ असे मंडळाचे अध्यक्ष मनोहर देसाई यांनी सांगितले.

बाप्पाची सेवाही अगदी रोज शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. पहाटे ७ वाजता सकाळची आरती तर रात्री ८च्या दरम्यान होणा-या आरतीला विभागातील अनेक नागरिक एकत्र येऊन उत्साहाने आरती करताना दिसतात.

बाप्पाचा मानाचा फेटा आणि धोतर खासकरून पुण्यावरून मागविले आहे तर रोज शास्त्रशुद्ध पद्धतीने परिधान केला जातो. विसर्जनासाठी खास मराठमोळ्या ढोल पथकांचे आयोजन केले जाते. या मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम व गरजूंना आर्थिक सहाय्य केले जाते.

शिवाय यंदा त्यांनी दुष्काळ ग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासाठी मंडपात दानपेटीची सोय केली आहे, त्याअतंर्गत दर्शनासाठी येणारे भक्त व मंडळातील कार्यकर्ते त्या दानपेटीत दान टाकून जमा झालेला निधी मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी चालू केलेल्या ‘नाम’ संस्थेला देण्यात येणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version