‘गुलजार’

0

‘नाम गुम जाएगाऽऽऽ, चेहरा ये बदल जाएगा। मेरी आवाज ही पहचान हैऽऽऽ, अगर याद रहे।।’ अशा सुरेख नज्म लिहिणा-या संपूर्ण सिंह यांचा आज जन्मदिन! नाही ओळखलंत? संपूर्ण सिंह म्हणजेच ‘गुलजार’. १८ ऑगस्ट १९३६ रोजी सध्या पाकिस्तानात असणा-या ‘दिना’ या गावी एका शीख कुटुंबात जन्मलेला, हा उर्दूतून लिहिणारा कवी. ‘चौरस रात’ हा त्यांचा पहिला लघुकथा संग्रह. शिक्षणाला रामराम ठोकल्यानंतर मुंबईत येऊन गुलजार यांना ‘इप्टा’तील साहिर मजरूह, के. ए. अब्बास, कैफी आजमी, शैलेंद्र, बासुदा अशा मान्यवरांचा सहवास लाभला आणि त्यांची कविता आकार घेऊ लागली. त्यातून घडला आजचा लेखक, गीतकार, पटकथाकार, दिग्दर्शक ‘गुलजार’! ‘गंगा आये कहॉँ से’ हे ‘काबुलीवाला’ चित्रपटासाठी व ‘मोरा गोरा अंग लई ले’ हे ‘बंदिनी’ चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं ही गुलजारांची चित्रपटसृष्टीतील प्रारंभीची गीतरचना. ‘आशीर्वाद’, ‘गुड्डी’, ‘बावर्ची’, ‘आनंद’, ‘अभिमान’ अशा अनेक चित्रपटांचे लेखन गुलजार यांनी केले. ‘सिलसिला’ ते ‘माचिस’ अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. ‘प्यार कोई बोल नही, प्यार आवाज नही, एक खामोशी है, सुनती है, कहॉँ करती है’ असे सांगणारा हा गीतकार. त्यांची कविता हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख बनून गेली. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक निर्मितीला असणारा कवित्वाचा स्पर्श तिला वेगळेपण बहाल करतो. आजही गुलजार हे एक समर्थ, सशक्त कवी असल्याचं दर्शन त्यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर कलामांच्या व्यक्तिमत्त्वावर रचलेल्या काव्यातून अवघ्या जगाने अनुभवले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version