Home क्रीडा गतविजेता बार्सिलोना चँपियन्स लीगबाहेर

गतविजेता बार्सिलोना चँपियन्स लीगबाहेर

0

यूएफा चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत गतविजेता बार्सिलोनाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. 

माद्रिद- यूएफा चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत गतविजेता बार्सिलोनाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीच्या दुस-या लेगमध्ये बुधवारी मेसी आणि सहका-यांना अ‍ॅट्लेटिको माद्रिदकडून ०-२ असे पराभूत व्हावे लागले. अँटोनी ग्रिझमनचा ‘डबल’ धडाका त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. यजमानांनी ३-२ अशा फरकाने आगेकूच केली.

पहिल्या लेगमध्ये बार्सिलोनाने २-१ असा विजय मिळवल्याने गतविजेत्यांना आगेकूच करण्याची सर्वाधिक संधी होती. मात्र यजमान अ‍ॅट्लेटिकोने प्रतिस्पर्ध्याना वरचढ होऊ देण्याची संधी दिली आहे.

अँटोनी ग्रिझमनने दोन गोल करताना माद्रिदच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या अर्ध्या तासात गोलफलक कोराच होता. मात्र ३६व्या मिनिटाला अप्रतिम ‘हेडर’द्वारे गोल करताना ग्रिझमनने अ‍ॅट्लेटिकोचे खाते उघडले. त्यानंतर ‘पेनल्टी स्पॉट’वर दुसरा गोल केला.

ग्रिझमनने महत्त्वपूर्ण लढतीत दोन गोल केले तरी लिओनेल मेसीसह नेयमार आणि आंद्रे इनियेस्टा अशा ‘स्टार्स’ना एकही गोल करता आला नाही. या पराभवानंतर मेसी आणि कंपनीला आपली निराशा लपवता आली नाही. सहा महिन्यांत सलग ३९ सामने जिंकणा-या बार्सिलोनाला गेल्या ४ सामन्यांत तिसरा पराभव पाहावा लागला.

बायर्न म्युनिचचीही आगेकूच

उपांत्यपूर्व फेरीच्या दुस-या लेगमध्ये बेन्फिकाविरुद्ध २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले तरी पहिल्या लेगमधील (१-०) विजयाच्या जोरावर बायर्न म्युनिचने उपांत्य फेरी गाठली.

पाच वेळच्या विजेत्या बायर्नने मागील सातपैकी सहा मोसमांमध्ये अंतिम चार संघांत स्थान मिळवले आहे. अ‍ॅट्लेटिको माद्रिद आणि बायर्न म्युनिचने रेआल माद्रिद, मँचेस्टर सिटीप्रमाणे उपांत्य फेरीत स्थान मिळवले. उपांत्य फेरीचा ‘ड्रॉ’ शुक्रवारी (१५ एप्रिल) काढला जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version