Home महाराष्ट्र कोकण गणपती विशेष रेल्वे, रायगडवासीय प्रवासी नाराज

गणपती विशेष रेल्वे, रायगडवासीय प्रवासी नाराज

0

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून ४ सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. 
नागोठणे – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून ४ सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी पनवेल ते रोहा दरम्यान कोठेही थांबणार नाही. या गाडीला पेण आणि नागोठणे येथे थांबा न दिल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गाडीला नागोठणेत थांबा मिळावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

नागोठणे स्थानक मध्य रेल्वेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. मालगाडीद्वारे दर महिन्याला लाखो टन मालाची चढ-उतार या स्थानकातून केली जात असल्याने रेल्वे प्रशासनाला त्यातून कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळते. या स्थानकातून रोज पंचवीस ते तीस प्रवासी तसेच जलद गाडय़ा दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांकडे जातात. मात्र, एकाही गाडीला येथे थांबा नाही. रोहा-दिवा, दादर-रत्नागिरी, सावंतवाडी-दिवा, दिवा-रोहा, दिवा-सावंतवाडी आणि रत्नागिरी – दादर या आठच प्रवासी गाडय़ा येथे थांबत असल्याने परराज्यातून आलेल्या प्रवाशांना पनवेल, रोहे किंवा माणगाव या स्थानकात उतरून नागोठणेत यावे लागते.

१९८६ पासून या मार्गावर वाहतूक चालू झाल्यानंतर नागोठणेतील प्रवाशांची ही फरफट थांबलेली नाही. मात्र, कोणताही स्थानिक नेता आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.

नियमित नोकरीधंदा तसेच शिक्षणासाठी दररोज पनवेल, ठाणे, मुंबईकडे जाणारे पासधारक ही खंत बोलून दाखवत असले,तरी रेल्वेने पनवेल -चिपळूण गाडीला येथे थांबा न देत पुन्हा एकदा नागोठणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

पाली, खांब, आमडोशी, सांबरी, कोलेटी, रिलायन्स निवासी संकुल आदी भागांतील अनेक गावांमधील शेकडो प्रवासी नागोठणे स्थानकाचाच वापर करतात. ही विशेष गाडी या स्थानकात थांबविली तर शेकडो प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version