Home व्यक्तिविशेष गंगाधर गाडगीळ

गंगाधर गाडगीळ

0

मराठी कथेला नवे वळण देणारे कथाकार आणि नामवंत अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा आज जन्मदिन. दि. २५ ऑगस्ट १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांनी कथा – कादंबऱ्या – समीक्षा – नाटके – बालसाहित्य – आत्मचरित्र अशा सर्व साहित्यप्रांतात लेखणी चालवली. पण प्रामुख्याने ते गाजले ते नवकथेचे जनक म्हणूनच! साचेबंद घटनाप्रवणता कमी करून मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा सन १९४५ पासून रूढ झाली, तिचे अध्वर्यू समजले जाणाऱ्या गाडगीळांनी यंत्रयुगातील शहरी जीवनाच्या ताणतणावाचे सूक्ष्मदर्शन आपल्या कथांतून घडवले. ‘मानसचित्रे’, ‘कडू आणि गोड’, ‘नव्या वाटा’, ‘तलावातील चांदणे’, ‘पाळणे’, ‘वेगळे जग’, ‘गुणाकार’, ‘गाडगीळांच्या कथा’हे त्यांचे कथासंग्रह. मानवाचे बाह्यवर्तन व अंतर्गत भावविश्व यांतील विसंगत भावनांचा, त्यामागील सूक्ष्म तरल भावना व संवेदना यांचा वेध घेणारा हा नवकथाकार. विकारी प्रवृत्तींचा वास्तव संघर्ष चित्रित करणारी ‘लीलीचे फूल’ही कादंबरी, लो. टिळकांवर ‘दुर्दम्य’ नावाची द्विखंडात्मक चरित्र कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करणारे ‘खडक आणि पाणी’, विविध साहित्य प्रकारातल्या मराठी ग्रंथाचे रहस्योद्घटन करणारे ‘साहित्याचे मानदंड’, मुंबईतील लोकजीवनाची जडणघडण शब्दबद्ध केलेले ‘मुंबई आणि मुंबईकर’हे त्यांचे अन्य प्रसिद्ध ग्रंथ. सन १९८२ मध्ये रायपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे हे गंगाधर गाडगीळ! आज त्यांचा जन्मदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version