Home मध्यंतर उमंग खुर्द आणि बुद्रुक

खुर्द आणि बुद्रुक

0

महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी खुर्द आणि बुद्रुक असे शब्द गावांच्या नावापुढे दिसतात. संगमनेर खुर्द किंवा संगमनेर बुद्रुक, तसेच आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक किंवा वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक अशी दोन दोन गावे शेजारी शेजारी वसलेली दिसतात.

हा खुर्द आणि बुद्रुक काय प्रकार आहे ?
मला पडलेला हा प्रश्न एकदा ऐतिहासिक लिखाण वाचताना सुटला. त्यात असे लिहिले होते, पूर्वी मुसलमानी अंमल होता तेव्हा उर्दूमिश्रित किंवा फारसीमिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे. मोगल किंवा आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लीम अंमलात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात.

एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी, ओढा यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक भाग छोटा तर दुसरा मोठा असे. त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत. बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द किंवा बुद्रुक असे संबोधले जाई.

या ‘बुजुर्ग’चा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि ‘खुर्द’चा अपभ्रंश न होता तो तसाच राहिला. आजही आपण खिशात मोठय़ा किमतीच्या नोटा असल्या आणि छोटय़ा किमतीची नाणी खिशात असली तर खिशात पैशांचा खुर्दा वाजतोय असे म्हणतोच.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version