Home एक्सक्लूसीव्ह खासगी टँकर पळवतात महापालिकेचे पाणी

खासगी टँकर पळवतात महापालिकेचे पाणी

0

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमधील पाण्याची पातळी आटत चालली असली तरी जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका साठा असल्याचा दावा महापालिकेच्या अधिका-यांकडून केला जात आहे. 

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमधील पाण्याची पातळी आटत चालली असली तरी जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका साठा असल्याचा दावा महापालिकेच्या अधिका-यांकडून केला जात आहे. एकीकडे पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केले जात असल्याचे म्हटले जात असतानाच महापालिकेच्या जलकुंभातून ‘फिलिंग सेंटर’ खासगी टँकरवाल्यांकडून पाण्याची लूट सुरू आहे.

महापालिकेच्या फिलिंग सेंटरमधून खासगी टँकरवाल्यांना पाणी देत नाही, असे म्हटले जात असतानाच मागील तीन महिन्यांतच महापालिकेच्या १८ फिलिंग सेंटरमधून तब्बल ३९ हजार खासगी टँकर भरले गेले असल्याची धक्कादायक माहिती हाती आहे.

खासगी टँकरच्या तुलनेत महापालिकेच्या स्वत:च्या केवळ ९ हजार टँकरमधूनच पाण्याचा भरणा झालेला आहे. त्यामुळे महिन्याला सरासरी १३ हजार खासगी टँकरमधून महापालिकेचे पाणी पळवले जात असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबईत पाणीपुरवठा करणा-या सर्व धरण परिसरात पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याचा साठा कमी प्रमाणात जमा झालेला आहे. त्यामुळे मुंबईत ऑगस्टमध्ये पाणीपुरवठयात १५ टक्के व वेळेत २० टक्के कपात करण्याचा घेतलेला निर्णय ऑक्टोबरपासून पुढे कायम ठेवण्यात आला. त्यामुळे मुंबईला दरदिवशी पुरवठा करण्यात येणा-या ३३७० दशलक्ष लिटर्स पाण्याऐवजी सध्या ३४०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

मात्र, मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत असतानाही महापालिकेच्या १८ फिलिंग सेंटरमधून पाण्याची लूट सुरू आहे. १ जानेवारी ते १० एप्रिल २०१६ या कालावधीत ४८ हजार १८० पाण्याचे टँकर भरण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

यामध्ये महापालिकेच्या टँकरची संख्या ९ हजार १८१ आहे, तर खासगी टँकरची संख्या ३९ हजार ९९९ एवढी आहे. तब्बल शंभर दिवसांमध्येच सुमारे ३९ हजार खासगी पाण्याचे टँकर भरले जाऊन एक प्रकारे पाण्याची लूट केली जात असल्याचे स्पष्ट
होत आहे

सर्वाधिक पाण्याची लूट गोवंडी, मानखुर्द, अंधेरी पश्चिम आणि घाटकोपरमध्ये महापालिकेच्या १८ फिलिंग सेंटरमधून २४ विभागांमध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये सर्वाधिक टँकरमधून पाण्याचा पुरवठा गोवंडी, देवनार, मानखुर्द या एम/पूर्व प्रभागात झाला आहे.

या प्रभागात महापालिकेचे केवळ ९१५ टँकर भरले गेले, तर १३ हजार ४२४ खासगी टँकर अशा प्रकारे एकूण १४ हजार ३३९ टँकरमधून पाणी घेतले गेले. त्याखालोखाल विलेपार्ले, अंधेरी व जोगेश्वरी या के/ पश्चिम भागात ६ हजार ७९७ टँकरमधून पाणी घेण्यात आले. यामध्ये महापालिकेचे केवळ ३२१ टँकर आहेत, तर ६४७६ खासगी टँकर आहेत.

घाटकोपरच्या ‘एन’ प्रभागातही ६ हजार ५२२ टँकर भरले गेले. यामध्ये माहपालिकेचे ५७४ टँकर तर खासगी टँकरची संख्या ५ हजार ९४८ एवढी आहे. त्यामुळे या तीन प्रभागांमध्ये खासगी टँकरवाल्यांकडून मोठया प्रमाणात लूट चालली असल्याची दिसून येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version