Home महामुंबई ‘कोल्हारे-बोपेले योजना’ विद्युतजोडणीअभावी बंद

‘कोल्हारे-बोपेले योजना’ विद्युतजोडणीअभावी बंद

0

कोल्हारे-बोपेले पाणीपुरवठा योजनेला विद्युतपुरवठा देण्याबाबत कार्यवाही न करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे उपअभियंता गुल्हाने यांनी दिली आहे.

नेरळ – नेरळजवळील कोल्हारे-बोपेले येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम ३ महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. पण महावितरण कंपनीने विद्युतजोडणी न दिल्याने अद्याप ही योजना कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी येथील महिलांना पायपीट करून उल्हास नदीतून पाणी भरावे लागत आहे. दरम्यान, कोल्हारे-बोपेले पाणीपुरवठा योजनेला विद्युतपुरवठा देण्याबाबत कार्यवाही न करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे उपअभियंता गुल्हाने यांनी दिली आहे.

कोल्हारे ग्रामपंचायतीमधील बोपेले या १५ ते २० घरांची लोकवस्ती असलेल्या वस्तीला पूर्वी धामोते नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा होत होता. मात्र, धामोते योजना वेगळी झाल्याने बोपेले गावाचा समावेश स्वजलधारा योजनेत करण्यात आला. त्यामुळे आता बोपेले गावाला कोल्हारे नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पण दोन जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल संपून गेला तरी नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने तालुक्यातील रखडलेल्या नळपाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करून अनेक योजनांच्या कामांना गती दिली आहे.

या अंतर्गतच कोल्हारे-बोपेले नळपाणी योजनेचे कामदेखील गतीने सुरू झाले. ४९-६५ लाख रुपयांची  ही योजना २०१३ मध्ये पूर्ण झाली. त्यानुसार उल्हासनदीवरील उद्भव विहीर, पाणी साठवण टाक्या (कोल्हारे, बोपेले) आणि वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यात आली. तर अन्य किरकोळ कामे आणि दोन्ही गावांत मिळून तीन ठिकाणी असलेले सार्वजनिक स्टँड पोस्टची कामे अशी काही कामे पूर्ण होत आहेत. एप्रिल-मे महिन्यांतील कडाक्याच्या उन्हात महिलांना डोक्यावर हंडे घेऊन उल्हास नदीवर पाणी भरण्यासाठी जावे लागू नये म्हणून पाणीपुरवठा समितीने जानेवारी २०१३ मध्ये नेरळ महावितरण कार्यालयाकडे नळ पाणीपुरवठा योजनेला विद्युतजोडणी देण्यासाठी अर्ज दाखल केला. महावितरणच्या नेरळ कार्यालयाने या जोडणीसाठी अंदाजपत्रक दिल्यानंतर त्याचे ३० हजार रुपयांचे देयकदेखील भरण्यात आले. तरी तीन महिन्यांनंतरही कंपनीकडून विद्युतजोडणी मिळू शकली नाही.

त्यामुळे पाणी योजनेची तपासणी आणि प्रत्यक्ष नळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे काम मे महिन्यातदेखील सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, याबाबत महावितरण कंपनीचे कर्जतचे उपअभियंता गुल्हाने यांच्याशी संपर्क साधला असता, पाणी योजनांचे काम कधीही खोळंबून ठेवले जात नाही. पण कोल्हारे-बोपेने नळ पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युतजोडणी न देणा-या अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version