Home संपादकीय अग्रलेख कोकणाची शैक्षणिक आघाडी

कोकणाची शैक्षणिक आघाडी

0

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि उच्च शिक्षणाची नवी दालने उघडणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला व आपणाला हव्या असणा-या नव्या शैक्षणिक दालनांमध्ये आपल्या निवडीप्रमाणे व कुवतीप्रमाणे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि उच्च शिक्षणाची नवी दालने उघडणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला व आपणाला हव्या असणा-या नव्या शैक्षणिक दालनांमध्ये आपल्या निवडीप्रमाणे व कुवतीप्रमाणे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरवर्षीच्या निकालांची काही वैशिष्टये असतात. यंदाच्या निकालाची वैशिष्टये ही की, यंदाही कोकण विभागाने गेल्या वर्षाप्रमाणे बाजी मारून निकालात पहिला क्रमांक पटकावला आहे तर एकूण नऊ विभागांमध्ये मुंबईचा क्रमांक आठवा म्हणजे शेवटून दुसरा आला आहे. मात्र, यंदा या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी जरी वाढली असली तरी गुणवत्ता घसरली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोकणचे ८५.८८ विद्यार्था उत्तीर्ण झाले असून त्यांनी आपल्या या धवल यशाचा झेंडा उंच फडकत ठेवला आहे. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ८९.६४ असून रत्नागिरीची टक्केवारी ८३.६९ इतकी आहे. कोकण विभागाच्या या यशाच्या सातत्याने कोकणसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत, उलट शहरी भागांची मक्तेदारी मोडून काढून आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. अर्थात कोकणातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा ध्यास, अभ्यासूवृत्ती, प्रयत्न करण्याची जिद्द, सर्वत्र उपलब्ध झालेले उच्च दर्जाचे लिखित व मौखिक मार्गदर्शन यामुळे हे विद्यार्थी आज परीक्षेत आघाडीवर आहेत. कोकणच्या खालोखाल औरंगाबाद ८५.२६ टक्के व त्या खालोखाल कोल्हापूर ९४.१४ टक्के यांचा क्रमांक आहे. लातूर पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरचा निकाल ८३.५४ असून त्याचा क्रमांक पाचवा आहे. राज्याचा एकूण निकाल ७९.९५ म्हणजे जवळजवळ ८० टक्के आहे. हा निकाल काही कमी नाही. यातही इतर अनेक परीक्षांप्रमाणे विद्यार्थिनीनींच बाजी मारली असून विद्यार्थिनी ८४.०४ टक्के व विद्यार्थी ७६.६२ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व विभागात मुलीच मुलांपेक्षा टक्केवारीत आघाडीवर आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना काही पेपर कठीण गेल्याने या विद्यार्थ्यांना निकालाची धास्ती वा टक्केवारीत घसरण होईल, अशी भीती होती. पण विज्ञान शाखेचाच निकाल सर्वात जास्त म्हणजे ९१.३० इतका लागला. त्याखालोखाल वाणीज्य आणि कला शाखेची टक्केवारी आहे. बारावीच्या परीक्षेला राज्यात १० लाख ९८ हजार ७०९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी आठ लाख ७० हजार ४३० उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मुंबई विभागाचा क्रमांक आठवा आहे व या विभागातील ठाण्याचा क्रमांक पहिला तर मुंबई शहराचा क्रमांक तिसरा आहे. याचा अर्थ एके काळी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये आघाडी घेण्याची मक्तेदारी असलेल्या मुंबईची मक्तेदारी सध्यातरी ‘निकाला’त निघाली आहे. या परीक्षेचे आणखी एक वैशिष्टय असे की, यंदा इंग्रजी आणि मराठी विषयात उत्तीर्ण होणा-या विद्यार्थाची टक्केवारी गेल्या वर्षीपेक्षा वाढली आहे. यंदा मराठी या विषयात ९४.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर इंग्रजी या विषयात ८५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी जरी चांगली असली तरी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पार घसरली आहे. याचे एक कारण असे की, यंदा विद्यार्थी विज्ञान आणि गणित विषयांच्या नव्या अभ्यासक्रमाला प्रथमच सामोरे जात होते. शिवाय विज्ञानाच्या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका या कठीण होत्या. त्यातही भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका बरीच कठीण होती. यामुळे विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना खूपच कमी गुण मिळाले. यामुळे या विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी चांगलीच घसरली. त्यामुळे ज्यांना दहावीत ९० टक्के गुण मिळाले त्यांना पहिला वर्गही मिळाला नाही. डोंबिवलीत दहावीत ९४ टक्के गुण मिळवलेला एक हुशार विद्यार्थी नापासच झाला. असे अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांना भोतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका कठीण गेली होती. अनेक विद्यार्थी ही उत्तरपत्रिका देऊन बाहेर आल्यावर अगदी रडवेले आणि हताश झाले होते. त्यामुळे गुरुवारी परीक्षेचा निकाल लागेपर्यंत अनेकांची छाती भीतीने धपापत होती. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका खूप कठीण होती, अशी जरी विद्यार्थ्यांची तक्रार होती तरी त्याला इतरही बाबी कारणीभूत होत्या. एक म्हणजे यंदा परीक्षेची पद्धत नवीन होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे उपलब्ध नव्हती. दुसरे कारण म्हणजे मुंबई शिक्षण मंडळाच्या पदाधिका-यांच्या मते, विद्यार्थी अलीकडे पाठयपुस्तकांकडे अजिबात दुर्लक्ष करून खासगी शिकवण्यांमधून मिळणा-या मार्गदर्शनावर व तेथे मिळणा-या यशस्वी सूत्रांवर भर देतात. त्यामुळे यंदा पाठयपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काढलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थी गोंधळून गेले व त्यांना ती प्रश्नपत्रिका कठीण वाटली. विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. विज्ञान विषयात कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची खूपच पंचाईत होणार आहे, यात शंका नाही. कारण या विषयात काठावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सामायिक प्रवेश परीक्षेला (सीईटी) बसण्याचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता आहे. इंजिनीयरिंगची यंदा अखेरची प्रवेश परीक्षा ‘एमटी-सीईटी’ पार पडली आहे. त्यातील गुणांसोबत बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र मिळून विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. या तिन्ही विषयात मिळून १३५ गुण मिळणे आवश्यक आहे. हे जमले नाही तर या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाकडे वळावे लागणार आहे. ‘सीईटी’साठी लागणा-या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांची अनिवार्य टक्केवारी गेल्या वर्षी ५० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत शिथील करण्यात आली होती. यंदा भौतिकशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना खूप कठीण गेल्याने आवश्यक गुणांची टक्केवारी शिक्षण मंडळ आणखी कमी करणार का, हे पाहावे लागेल. हे विद्यार्थी आता विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्यता असल्याने तेथे विद्यार्थ्यांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शालेय शिक्षण विभागाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला व कॉपीमध्ये खूप घट झाली आहे. बारावीची ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे नव्या क्षितीजाकडे पावले टाकण्याची संधी. या संधी खूप आहेत. म्हणून कुणी निराश होण्याचे कारण नाही. यश तुमचेच आहे. मुंबई शहरासारख्या उत्तम शैक्षणिक सुविधांची वानवा असतानाही कोकण विभागाने शैक्षणिक क्षेत्रात सलग दुस-या वर्षी आघाडी घेतली असून कोकणातील नवीन पिढीची वाटचाल खूपच आशादायी आहे.

[EPSB]

दुष्काळाचा ससेमिरा कायमचा थांबवा!

नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या दुष्काळाच्या आणि अभूतपूर्व पाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यातून महाराष्ट्र जात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने व पडलेला पाऊसही अवकाळी झाल्याने पिकांचे नुकसान तर झालेच पण पाणी आणि गुरांच्या दाणा-वैरणीची टंचाई निर्माण झाल्याने शेतक-यांना आपली गुरेढोरेही वाचवणे बरेच कठीण गेले. विशेषत: मराठवाडयात परिस्थिती तीव्र आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version