Home महाराष्ट्र कोकण कोकणवासीयांना मुख्यमंत्रीपदी हवेत नारायण राणे!

कोकणवासीयांना मुख्यमंत्रीपदी हवेत नारायण राणे!

0

टीव्ही९ या खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा कोकणी जनतेने व्यक्त केली आहे.

रत्नागिरी- अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही९ या खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा कोकणी जनतेने व्यक्त केली आहे.

या सर्वेक्षणात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे, अजित पवार यांना जनतेने नाकारले आहे. तर २०१४ मध्ये केलेली चूक २०१९ मध्ये सुधारून निलेश राणे हेच पुन्हा खासदार होण्याचा कौल मतदारांनी दिला आहे.

आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशावेळी जनमताचा कानोसा घेण्यासाठी टीव्ही९ या खासगी वृत्तवाहिनीने एका खासगी संस्थेच्या सहकार्याने रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण केले. या मतदारसंघातील विविध भागांतील लोकांच्या मतांचा कल विविध प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेण्यात आला. त्यावर विविध पक्षातील राजकीय नेत्यांशी चर्चा आणि लोकांचे थेट प्रश्न असा कार्यक्रम सोमवारी रत्नागिरीमध्ये पार पडला.

कोकणाला आपला बालेकिल्ला म्हणणा-या शिवसेनेला मात्र अनेक मुद्यांवर जनतेने सपशेल नाकारल्याचे यावेळी दिसून आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोकणातील जनता कोणाला पसंती देते, या प्रश्नावर कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी तब्बल ३१ टक्के मतदारांनी कौल दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांना ११ टक्के, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० टक्के तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अवघ्या ३ टक्के मतदारांनी पसंती दिली.

याचवेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या कामावरही मतदारांनी नाराजी व्यक्त करताना माजी खासदार निलेश राणे हेच पुन्हा खासदार झाले पाहिजेत, असा कौल दिला आहे. याच सर्वेक्षणासोबतच अनेक थेट प्रश्नांवरही शिवसेनेचे नेते निरुत्तर झालेले दिसून आले. त्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, नाणार प्रकल्पाबाबतची सेनेची भूमिका, एसटी कामगार, जिल्ह्याचे आरोग्य यासह अनेक प्रश्न उपस्थित सर्वसामान्य जनतेने यावेळी विचारले.

या कार्यक्रमाला शिवसेनेकडून आ. राजन साळवी, भाजपकडून अॅड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अशोकराव जाधव, मनसेकडून जितेंद्र चव्हाण आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षाचे प्रवक्ते नित्यानंद दळवी उपस्थित होते.

निलेश राणेच खासदार!

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांना निवडून देऊन चूक केली. ती चूक २०१९ मध्ये मतदार सुधारणार आहे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे हेच पुन्हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार होणार आहेत, असा विश्वास या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला आणि त्याला उपस्थित जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version