Home देश केरळमध्ये ‘जनरक्षा’ यात्रेत अमित शहांना योगींची साथ

केरळमध्ये ‘जनरक्षा’ यात्रेत अमित शहांना योगींची साथ

0

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले योगी आदित्यनाथ केरळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी केरळमधील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या कथित राजकीय हत्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेत सहभाग घेतला. केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांविरोधात भाजपकडून ‘जनरक्षा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी मंगळवारी कन्नूर जिल्ह्यातून यात्रेची सुरुवात केली असून यामध्ये पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारीदेखील सहभागी होणार आहेत. भाजपची ही यात्रा १४ दिवस चालणार आहे.

केरळमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसेकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ‘जनरक्षा यात्रा’ आयोजित करण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ‘लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मात्र केरळमध्ये राजकीय हत्या सुरुच आहेत. भाजपकडून काढण्यात आलेली यात्रा केरळ, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरातील कम्युनिस्ट सरकारसाठी आरसा आहेत. येथील सरकारने राजकीय हत्या रोखायला हव्यात,’ असेही ते म्हणाले. दिल्ली भाजपकडूनही राजधानीत यात्रेचे आयोजन करण्यात आले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यामध्ये जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन कन्नूर जिल्ह्यातूनच निवडून येतात. केरळमध्ये आतापर्यंत कधीही हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणाच्या मूळ प्रवाहात नव्हता. मात्र तरीही भाजपने केरळमध्ये हातपाय पसरण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगी आदित्यनाथ यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या विरोधात ‘जनरक्षा यात्रे’चे आयोजन करत केरळमध्ये वातावरणनिर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या १२० हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचा भाजपचा दावा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version