Home संपादकीय विशेष लेख केजरीवाल-बेदींचा सामना रंगणार

केजरीवाल-बेदींचा सामना रंगणार

0

भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आपल्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ रामलीला मैदानावर जाहीर सभा आयोजित करून केला. स्वत: पंतप्रधान मोदी या सभेचे प्रमुख वक्ते होते. भाजपाच्या नेत्यांनीही सभेला दोन लाख लोक जमवण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले; पण मोदी यांची आश्वासने ऐकून कंटाळलेल्या दिल्लीतील नागरिकांनी या सभेस भाजपाला अपेक्षित असे असलेला प्रतिसाद दिला नाही.

सभेला सुमारे ४० हजार नागरिक उपस्थित होते. दिल्लीत विजय मिळवायचा तर एकटय़ा मोदी यांची जादू चालणार नाही. त्या एका सभेने भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याही लक्षात आले आणि मग नव्या चेह-याचा शोध सुरू झाला. या शोधमोहिमेत भाजपाला सापडल्या, भारतातील पहिल्या महिला ‘आयपीएस’ अधिकारी किरण बेदी. अण्णा हजारे यांनी दिल्लीत प्रथम जंतरमंतरवर आणि नंतर रामलीला मैदानावर केंद्र सरकारच्या विरोधात जी उपोषणे केली त्या उपोषणाच्या व्यासपीठांवरून लोकांच्या समोर जे दोन चेहरे आले त्यापैकी एक होता केजरीवाल यांचा तर दुसरा किरण बेदी यांचा. अण्णा हजारे यांना कुठे कधीच निवडणूक लढवायच्या नव्हती; पण केजरीवाल आणि बेदी हे दोघेही महत्त्वाकांक्षी होते. सकाळी ब्रेकफास्ट करून उपोषण स्थळी यायचे, तिरंगा झेंडा हातात घेऊन ‘भारत माता की जय आणि ‘अण्णा हजारे झिंदाबाद’च्या घोषणा द्यायच्या दुपारचे दीड दोन वाजले की, लंचला घरी जायचे. पुन्हा पाच वाजता उपोषणाच्या व्यासपीठावर येऊन त्याच घोषणा द्यायच्या आणि रात्री डिनरला घरी परतायचे, हाच दिनक्रम केजरीवाल आणि किरण बेदी यांच्या वागण्यातून दिसत होता. यातही केजरीवाल काही अंशी प्रामाणिक वाटत होते; पण किरण बेदी यांचा संधीसाधूपणा लपत नव्हता. उपोषणादरम्यान एकदा अण्णा हजारे यांना तुरुंगात ठेवण्याची वेळ आली तेव्हा ‘अण्णांऐवजी बेदींना तुरुंगात टाका,’ अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली होती. अण्णांचे उपोषण समाप्त झाल्यानंतर काही काळातच केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. या पक्षाला दखल घेण्याजोगे यश मिळाले ते दिल्लीतच. काँग्रेसने सहकार्याचा हात पुढे केल्याने सत्तेची संधीही मिळाली.

४९ दिवसांच्या अल्पशा सत्ताकाळात केजरीवाल यांनी आपला ठसा उमटवला. झोपडपट्टीवासीयांना दिलासा, पाणी माफियांना चाप आणि भ्रष्टाचाराला आळा ही त्रिसूत्री समोर ठेवून केजरीवाल काम करताना दिसत होते. दिल्लीत रिक्षा आणि टॅक्सीचालकांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. पोलिसांपासून ते अगदी काही रेल्वे स्थानकांच्या स्टेशन मास्तपर्यंत अनेकांना लाच दिली तरच धंदा करता येतो, हा या दोन्ही व्यवसायातील लोकांचा अनुभव होता; पण केजरीवाल यांनी हा भ्रष्टाचार अगदी १०० टक्के थांबवून दाखवला. त्यामुळे हा वर्ग त्यांच्यावर खूष आहे. सरकारी कर्मचा-यात सरकारी व्यवस्थेवर कायम नाराज असलेला एक वर्ग असतोच. आपण ज्या ज्या मागण्या करू त्या त्या सरकारने पूर्ण केल्याच पाहिजेत, अशी या कर्मचा-यांची इच्छा असते. सत्ता ताब्यात आली तर केजरीवाल अशा कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण करू शकतील की नाही, याबद्दल निश्चितपणे शंका घेता येईल; पण सध्यातरी केजरीवाल यांनी अशा असंतुष्ट कर्मचा-यांच्या इच्छेवर फुंकर घातल्याचे जाणवते. स्वत: नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी किरण बेदी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून त्यांना भाजपाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांना किरण बेदी यांचे नेतृत्व काही प्रमाणात भावण्याची शक्यता आहे; पण झोपडपट्टीत राहणा-या दिवसभर कमवून आणले तरच रात्रीची चूल पेटेल इतपत गरीब अवस्था असलेल्या तळागाळातील माणसांना किरण बेदी आपल्या वाटण्याची शक्यता आहे, असे मुळीच वाटत नाही. नवी दिल्लीत विविध राज्यांतील लोकांचे कामधंद्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. त्या त्या राज्यातील भाजपाच्या नेत्यांना, मंत्री असतील तर मंत्र्यांना दिल्लीत आणून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या राज्यांतील पण आता दिल्लीकर रहिवाशी असलेल्या नागरिकांना भाजपाकडे वळवून निवडणुकीत मतांची बेगमी वाढवण्याची चांगली म्हणता येईल, अशी कल्पना भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या एका भागात महाराष्ट्रातील सांगली व सातारा जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. भाजपाचे सांगली मतदारसंघातील खासदार संजय काका पाटील यांनी नुकताच या परिसरात दौरा करून या गावक-यांची भेट घेतली. सोन्या-चांदीच्या व्यवसायात प्रामुख्याने असलेल्या या लोकांना त्यांनी निवडणुकीत भाजपाला मतदान करावे म्हणून विनवणी केली. अर्थात हा प्रचारतंत्राचा एक भाग झाला. कुणाला मतदान करायचे, याबद्दलची लोकांची मते आधीपासूनच ठरलेली असतात. या लोकांमधील काहींना काँग्रेस किंवा आम आदमी पार्टीला मतदान करायचे असेल तर संजयकाकांच्या प्रचाराचा अगदी १०० टक्के उपयोग भाजपाला होईल, असे मानता येणार नाही.

गेल्या मे महिन्यात लोकसभेची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत देशभरातील मतदारांनी भाजपावर मतांचा अक्षरश: वर्षाव केला. स्वत: मोदी यांनाही अपेक्षित नसतील इतक्या लोकसभेच्या जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले. एकदा का मोदी पंतप्रधान झाले की, आपल्याला घराघरात दिवाळीच साजरी करायची आहे, अशा समजुतीत तमाम भारतातील जनता होती. इतका ‘अच्छे दिन आयेंगे’ या भाजपाच्या घोषणेचा लोकांवर प्रभाव होता. या लोकसभा विजयानंतर पुढच्या एक दोन महिन्यातच जर दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असती तर विधानसभेच्या ७० जागांपैकी पन्नासहून अधिक जागा एकटय़ा भाजपानेच जिंकल्या असत्या आणि ‘आप’चे नेते केजरीवाल यांना एक हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जागांवरही पक्षाला विजय मिळवून देणे कमालीचे अवघड झाले असते; पण लोकांनी मोदींच्या ‘अच्छे दिन’साठी महिना दोन महिने वाट पाहिली; पण बुरे दिनच नशिबी येतात की काय, असे लोकांना वाटावे इतपत पंतप्रधानांनी भ्रमनिरास केला. त्याचे पडसाद या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात उमटले तर आश्चर्य वाटायला नको. प्रत्येक राज्यात प्रत्येक पक्षात असते तसे गटातटाचे राजकारण नवी दिल्लीतील भाजपातही आहे. अनेक वर्षापासून या गटातील नेते आणि कार्यकर्ते एकमेकांना ओळखून आहेत. त्यांच्यात जमेल तेवढय़ा ताकदीने परस्परांवर कुरघोडी करण्याचे राजकारणही सुरू असते; पण आता अचानक दिल्ली भाजपामध्ये किरण बेदी या नवीन नेतृत्वाचा प्रवेश झाल्याने भाजपामधील जुने सगळेच गट हादरून गेले आहेत. बेदी यांची मुख्यमंत्री पदाच्या भाजपाच्या उमेदवार म्हणून निवड जाहीर केल्याने तर पक्षातील जुन्या नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. बेदी यांचे वागणे आणि बोलणे पोलिसी खाक्याचे असल्याने त्या पक्षातील इतर स्थानिक नेत्यांना फारशा जुमानतील, याची शक्यता अगदीच कमी आहे. थेट अमित शहा यांनीच किरण बेदी यांना पक्षात आणून त्यांच्याकडे निवडणुकीची सगळी सूत्रे सुपूर्द केल्यामुळे खाली मान घालून बेदी सांगतील ते ऐकण्यापलीकडे पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडे अन्य कोणता पर्याय असेल, असे वाटत नाही.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीची सत्ता भाजपाच्या ताब्यात असावी, अशी मोदींची इच्छा असणे स्वाभाविक आहे;  पण नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यात व्यग्र आहेत, हेच सध्या तरी जाणवत आहे. दिल्लीची ही निवडणूक कमालीची अटीतटीची होणार, याबद्दल कुठलीही शंका घेण्यास जागा नाही. मे महिन्यात लोकसभेसाठी भाजपा ज्या ताकदीने मैदानात उतरला होता, तशीच ताकद या एका निवडणुकीसाठीही भाजपा नेते लावतील; पण ‘आप’चे आव्हानही सोपे नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version