Home महामुंबई केईएममध्ये लवकरच ‘डे-केअर’ वॉर्ड

केईएममध्ये लवकरच ‘डे-केअर’ वॉर्ड

0

परळ येथील केईएम रुग्णालयात वृद्ध रुग्णांसाठी खास ‘डे-केअर वॉर्ड’ सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई- रक्ताचा आजार असणा-या ‘हिमोफेलिया’ व ‘थॅलेसिमिया’च्या रुग्णांमध्ये सध्या वाढ होत आहे. या रुग्णांना रक्त बदलावे लागते. पालिका व सरकारी रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अफाट गर्दीमुळे रुग्णांना तासन्तास रांगेत ताटकळत राहावे लागते. यात वयस्कर व्यक्तींचाही समावेश असतो. त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात वृद्ध रुग्णांसाठी खास ‘डे-केअर वॉर्ड’ सुरू करण्यात येणार आहे. या वॉर्डचे काम पूर्ण झाले असून येत्या आठ-दहा दिवसांत हा नवा वॉर्ड सुरू होईल. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे वयस्कर रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

केईएममध्ये राज्याच्या कानाकोप-यांतून रुग्ण उपचारासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणा-या रुग्णांची संख्या ४०० ते ५००च्या घरात आहे. यातील ब-याच रुग्णांना रक्तासंदर्भात आजार असतो. जसे, थॅलेसिमिया, रक्ताचा कर्करोग, हिमोफेलिया आदी.

खासगी रुग्णालयात या आजारांवरील उपचारांचा खर्च सर्वसामान्यांना परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे अनेक लोक पालिका रुग्णालयाचा आधार घेतात. अल्पदरात उत्तम सुविधा मिळावी, अशी अपेक्षा रुग्णांची असते. त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात खाटांची सोय उपलब्ध आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे दूरहून उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांना नाईलाजाने जमिनीवर उपचार घ्यावे लागतात. रुग्णांना सहन करावा लागणारा हा त्रास पाहून रुग्णालय प्रशासन आणखीन एक नवीन ‘डे-केअर वॉर्ड’ सुरू करणार आहे. हा नवा वॉर्ड अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.

कसा असेल ‘डे-केअर वॉर्ड’

रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या नव्या वॉर्डला ‘विशेष डे-केअर वॉर्ड’ या नावाने संबोधले जाईल. मागील दोन महिन्यांपासून या वॉर्डचे बांधकाम सुरू आहे. हा वॉर्ड केईएमच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या ११व्या मजल्यावर असेल. रक्तासंदर्भात गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात वॉर्ड उपलब्ध आहेत. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणखीन एक वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे काम पूर्ण झाले असून लवकरच येथे रुग्णसेवा सुरू करण्यात येईल.

दररोज २० रुग्णांवर होणार उपचार

या नव्या वॉर्डात दररोज २० रुग्णांना दाखल करून उपचार केले जातील. तसेच या वॉर्डात थॅलेसिमिया व हिमोफेलिया रुग्णांना रक्त बदलणे व नवीन रक्त चढवण्याची सुविधा उपलब्ध असेल. हा उपचार घेणा-या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

रक्ताचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये अनेक वयस्क व्यक्तींचा समावेश असतो. रुग्णांची वाढती संख्या पाहता खाटा अपु-या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी वाट पाहवी लागते. वयस्क रुग्णांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने नवीन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे काम पूर्ण झाले असून तो सुरू करण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल. या वॉर्डमध्ये रुग्णाला सकाळी दाखल करून उपचार केल्यानंतर सायंकाळपर्यंत त्याला घरी सोडले जाईल. – डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता,  केईएम रुग्णालय

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version