Home महाराष्ट्र कासचे पठार ७ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुले!

कासचे पठार ७ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुले!

0

साता-यानजीकच्या पुष्पसृष्टीचे अर्थात जागतिक वारशाचा दर्जा मिळालेले कासचे पुष्प पठार येत्या ७ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे.

राजापूर- साता-यानजीकच्या पुष्पसृष्टीचे अर्थात जागतिक वारशाचा दर्जा मिळालेले कासचे पुष्प पठार येत्या ७ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. हे पुष्प पठार दरवर्षी पर्यटकांचा नवा उच्चांक स्थापित करत असून, मागील वर्षी पाच लाख पर्यटकांनी या पठाराला भेट दिल्याची माहिती वनखात्याने दिली आहे.

सौंदर्याची खाण समजल्या जाणा-या कासच्या पुष्प पठाराला पश्चिम घाटासह ‘वर्ल्ड हेरिटेज’ म्हणजेच जागतिक वारसा स्थळांत युनेस्कोने समाविष्ट केले आहे. साता-यापासून २३ कि.मी. अंतरावर हा धरतीवरचा स्वर्ग अवतरत असतो. फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणूनदेखील या पठाराची ओळख आता देशविदेशी पोहोचली आहे.

कास पुष्प पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १२१३ मीटर असून १७९२ हेक्टरवर हे पसरले आहे. यात वनखात्याची ११४२ हेक्टर तर ६५० हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मीळ असलेल्या ८५० पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार येथे आढळले आहेत. तसेच कीटक व विविध ३२ प्रकारच्या फुलपाखरांचे प्रकार येथे आढळतात.

या पठारावरून असंख्य फुलांच्या सोबतीने दिसणारे आणि फुलांवर पसरणा-या इंद्रधनुषी छटा म्हणजे स्वप्नसृष्टीचा भासच असतो. या पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत रानफुले येतात. दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी ही त्यापैकी कास पठाराचे वैशिष्टय़ गणले जाते. येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र तर कधी लाल, निळा, जांभळी, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांची फुले पर्यटकांच्या डोळय़ांचे पारणे फेडतात. येथील फुलांच्या हंगामाला अद्याप वेळ असला तरी नुकत्याच उमलू लागलेल्या फुलांच्या संरक्षणासाठी वनविभागाने विशेष मोहीम आखली आहे.

दरम्यान, शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी कास पठाराला भेट देण्याची योजना आखणा-या पर्यटकांना गर्दी टाळण्यासाठी आता ऑनलाईन बुकिंगचा आधार घ्यावा लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी व वाहनांच्या कोंडीवर उपाययोजना म्हणून सुट्टीच्या दिवशी केवळ अडीच हजार पर्यटकांना या पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.

पर्यटकांवर नियंत्रण, शिस्त व पर्यावरण संरक्षण व्हावे म्हणून वनविभाग व कास भागातील चार गावांच्या झालेल्या बैठकीत उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी कास पठारावर भेट देणा-या पर्यटकांनी www.kaas.ind.in या संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करूनच प्रवेश करायचा आहे. या ठिकाणी जाणा-या बससाठी १५० रुपये, मिनी बससाठी १०० रुपये, चारचाकी वाहनांसाठी ४० रुपये कर आकारला जाणार आहे.

छायाचित्रे काढण्यासाठीही सशुल्क परवानगी दिली जाणार आहे. यातून जमा होणारे पैसे हे कास, कासणी, अटाळी व एकीव या गावांच्या विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहेत. प्लास्टिक पिशव्या तसेच पाण्याच्या बाटल्यांशिवाय खाद्यपदार्थाचा व्यवसाय करण्यासही पठारावर बंदी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version