Home मध्यंतर उमंग काळजी घ्या! अनमोल आयुष्याची

काळजी घ्या! अनमोल आयुष्याची

0

जीवाची पर्वा न करता धाडस करणं, मित्रांसोबत पैजा लावणं, व्यसनांच्या आहारी जाणं आणि चुकीचे निर्णय घेणं या गोष्टी कधी कधी असीम आनंद देणा-या ठरतात. कधी कधी सारं जग जिंकल्याचा अनुभवही देत असतील, पण कधी कधी याच गोष्टी जीवावर बेतणा-या ठरून लाख मोलाच्या आयुष्याशी खेळही करणा-या आहेत.

तारुण्य म्हणजे जोष, उत्साह..! पण अगदीच योग्य, परिपूर्ण निर्णय घेण्याची परिपक्वता नव्हे. कॉलेजच्या कालखंडात ब-याचशा गोष्टी मित्र-मैत्रिणींसोबत शेअर केल्या जातात. पालकांपासून बरंच काही लपवलं जातं. काही गोष्टींचा थांगपत्ताही नसतो पालकांना. कॉलेजच्या फीसपासून प्रेझेंटी ते परीक्षेच्या निकालापर्यंत. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत? तो कॉलेजला नीट जातो का? त्याला कोणती व्यसनं आहेत? आदी गोष्टींपासून बरेच पालक अनभिज्ञ असतात. अशा वेळी आपण स्वतंत्र आहोत ही भावना तरुणांच्या मनात निर्माण झालेली असते.

अशा वेळी खरी व्यसनाची सुरुवात झालेली असते. मजा-मस्ती उत्साहाचं हे वय चुकीच्या निर्णयाने या वळणांवर जीवनाचा मार्ग चुकलेलं असतं. आपल्या समस्या तरुण मुलं पालकांना सांगू शकत नाहीत. मित्रांसोबत शेअर करतात आणि निर्णय घेऊन मोकळे होतात. जे निर्णय प्राणांवर बेतणारे असतात. आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत ही मुलं येऊन ठेपलेली असतात. जेव्हा पालकांना याचा सुगावा लागतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.

कधी मुलं व्यसनापायी कर्जबाजारी, कधी प्रेमभंग, कधी पैजांचा नाद, कधी शैक्षणिक समस्या, कधी मित्रांतील वाद, कधी नेतृत्वाची धडपड, कधी किरकोळ तर कधी टोकाच्या भूमिका अशा गोष्टी समाजात समस्यांचं जाळं निर्माण करतात. एखादी घटना घडली तर थरकाप उडतो. थेट बिल्डिंगच्या चौथ्या-पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या तर कधी आणखी काही.. या घटना मन ढवळून निघणा-या आहेत. आपल्या मुलाने आपल्याला विश्वासात न घेता चुकीचा निर्णय घेऊन आयुष्य गमावलं ही खंत पालकांना आयुष्यभरासाठी लागतेच, शिवाय मुलगा गमावल्याचं दु:ख असतं ते वेगळंच!

स्टंट :
इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची ऊर्मी आजच्या तरुण पिढीमध्ये दिसून येते, पण यातून काही चांगले निष्पन्न झाले तर ठीकच नाहीतर पश्चात्ताप! विशेष: ट्रेनमध्ये धाडसी बाणा दाखवताना तो जीवावर किती बेतू शकतो याचा अंदाज आजूबाजूला घडणा-या घटनांवरून येऊ शकतो, पण स्वत: धाडस केल्याशिवाय आजच्या पिढीला स्वस्थ बसवत नाही. चालत्या ट्रेनमध्ये चढणे, ट्रेन सुरू झाल्यावर ती प्लॅटफॉर्मवरून पुढे मार्गस्थ होईपर्यंत दरवाजातून खाली रेलून पाय घासत निघणं. एक हात बाहेर काढून जोष उत्साहात ओरडणं, सेल्फी घेणं. आदींतून हात निसटला, तोल गेला तर विचित्र अपघाती घटनांना सामोरे जाण्याची वेळ येते. ट्रेन स्टंट अ‍ॅक्सिडंटच्या घटना पाहता आजच्या पिढीला यातून शहाणपण सूचत नाही तर असे स्टंट करण्याची अधिक उत्सुकता दिसून येते.

ट्रेन समोरून स्वत:ला झोकून देणं, ट्रेनच्या ट्रॅकवर झोपणं, व्हीडिओ बनविणं, मित्रा-मित्रांच्या पैजांमध्ये जीवाची पर्वा न करता असे धाडस करण्याकडे विशेष कल दिसून येतो. ट्रेनच्या वर बसून प्रवास करणं, अशामुळे ओव्हरहेड वायरशी संपर्क होऊन जीव गमावण्याच्या घटना घडतात हे माहीत असूनही असे धाडस तरुण करताना दिसतात. ट्रेनच्या दोन डब्यांमधील गॅपमध्ये बसूनही प्रवास करण्यात तरुणांना मजा वाटते. ट्रेन समोरून येता-येता ट्रॅकवरून उडी मारण्याचं धाडस तरुण दाखवतात.

ट्रॅकवर झोपून अंगावरून ट्रेन गेली तरी आपण जिवंत राहू शकतो. असा कयास काही जणांमध्ये दिसून येतो. ट्रॅकच्या गॅपमध्ये झोपून राहणं, पण असे धाडसी निर्णय घेण्याआधी जरा मागे वळून आपल्या मागे परिवार आहे, जन्मदाते आई-वडील आहेत याचा विचार मनात आला तरी पुरेसा आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढणं, उतरणं आदी प्रकार मुलांप्रमाणे मुलींमध्येही दिसून येतात. ट्रेनच्या दरवाजात उभं राहून धावत्या ट्रेनमधून झोकून देण्याचे प्रकारही घडताना दिसतात.

व्यसनाचं वाढतं प्रमाण :
>> आज व्यसन म्हणजे फॅशन बनली आहे. या व्यसनाची सुरुवात म्हणजे ख-या मैत्रीचा परिस स्पर्श असा समज असतो. मित्राने शब्दाला मान देऊन ड्रिंक केलं की खरी दोस्ती निभावल्याचं वचन तेथे मिळतं.
>> मित्रांसोबत पार्टीच्या निमित्ताने, समारंभाच्या निमित्ताने पिकनिक किंवा अन्य काही कारणांच्या निमित्ताने ड्रिंक घेणं, पैजा लावणं, व्यसनाच्या आहारी जाणं आणि त्यातच गुरफटणं म्हणजे आयुष्य पणाला लावण्यासारखं आहे.
>> तारुण्याच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवताना यशस्वी भवितव्याची वाट आपल्याला खुणावत असते, मात्र एकदा का चुकीचं पाऊल पडलं तर ही वाट सापडणं मुश्कील होऊन जातं. कॉलेज जीवनापासूनच जर करिअरचा ध्यास घेऊन योग्य निर्णय घेतले तर आयुष्य सुखकर होतंच आणि नव्या दिशा, ध्येय गाठण्यासाठीही मदत होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version