Home महामुंबई कार रेसिंग करणा-यांवर कारवाई कधी?

कार रेसिंग करणा-यांवर कारवाई कधी?

0

नियम धाब्यावर बसवत माथेरानमधील संरक्षित वनक्षेत्रात ‘महामान्सून 2012’ हा कार रेसिंगचा इव्हेंट आयोजित करणा-यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न विचारला जातोय. 
नेरळ – नियम धाब्यावर बसवत माथेरानमधील संरक्षित वनक्षेत्रात ‘महामान्सून 2012’ हा कार रेसिंगचा इव्हेंट आयोजित करणा-यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील ठरवण्यात आलेल्या या क्षेत्रात ही स्पर्धा घेऊन वायू आणि ध्वनिप्रदूषण करणा-या 59 महागड्या जीप वनविभागाने ताब्यात घेतल्या होत्या. त्याला महिना उलटला तरीही कारवाई पुढे सरकलेली नाही.

बेडीस गावच्या संरक्षित वनक्षेत्रात वाहनबंदी असूनही 16 जुलैला धनाडय़ांनी आपले वाहने आणली होती. त्यांनी या भागात प्रचंड धिंगाणा घातला. वाहनबंदी धुडकावून लावल्यामुळे वनविभागाने त्यांच्यावर कारवाई केली, मात्र पकडण्यात आलेल्या 59 गाडय़ा लगेच दुस-या दिवशी सोडून देण्यात आल्या. ही वाहने वनविभागाच्या डेपोमध्ये न नेता थेट पंचतारांकित हॉटेलांमध्ये नेण्यात आली. त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि वाहने सोडून देण्यात आली. पनवेल येथील अधिकारी परब यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. कारवाई सुरू असतानाच ठाणे येथील सीसीएफ अधिकाऱ्यांनी वाहने सोडू नयेत असे आदेश दिले. केवळ एक हजार रुपये दंड ठोठावून वाहने सोडण्यात आली.

वनविभागाच्या जागेत बेकायदा वापरली जाणारी वाहने वन खात्याकडून जप्त केली जातात. मात्र बेडिसगाव येथील कार रेसिंगसाठी वापरण्यात आलेली वाहने सोडून देण्यात आल्यामुळे कारवाई कोणाच्या आदेशांमुळे टाळण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेरळचे प्रभारी अधिकारी रजेवर असल्यामुळे अलिबाग कार्यालयातील अधिका-यावरही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कार रेसिंग करणा-यावरील कारवाईला विलंब होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही स्पर्धा आयोजित करणा-या ‘मॅडकॅट’च्या कोणत्याही अधिका-याचा शोध घेण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर वनविभाग गुन्हे दाखल करू शकलेला नाही. ‘महामान्सून 2012’ या रेसिंग इव्हेंटची तयारी मे 2012 पासून सुरू होती. दोन महिन्यांत वनविभागाला त्याची गंधवार्ताही कशी मिळाली नाही, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version