Home संपादकीय विशेष लेख कार्यकर्त्यांनी युती आधीच फेटाळली

कार्यकर्त्यांनी युती आधीच फेटाळली

0

जगायला मिळते आहे, यालाच ‘अच्छे दिन’ म्हणायची वेळ आली आहे. इतक्या सडेतोड शब्दात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. कपटी मित्र असेही भाजपाचे वर्णन त्यांनी केले होते. उद्धव ठाकरे हे माफिया आहेत. अशा आशयाची टीका भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर सोमय्या यांना मारहाण करण्याचा आणि त्यांचा पुतळाही जाळण्याचा प्रकार घडला होता.

इतके सगळे ज्या दोन पक्षात चालू आहे, लोकांनी ते ऐकले आहे. त्या दोन पक्षांचे नेते आता देशातील सर्वात मोठी महापालिका असे जिचे वर्णन केले जाते आणि जिचा अर्थसंकल्प काही राज्यांच्या तोडीस तोड आहे, ती मुंबई महापालिका, आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात यावी यासाठी काहीही करू या, पण युती करूनच लढू या, असा निर्धार करून एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसू लागले आहेत. गेली बरोबर २५ वर्षे याच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीची सत्ता मुंबईकरांच्या मानगुटीवर बसली आहे. शिवसेना नेत्यांनी मुंबई महापालिकेत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते करीत असले तरी महापालिकेत ते शिवसेनेबरोबरच युती म्हणून सत्तेत बसत होते. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेने जो काही भ्रष्टाचार केला असेल त्यात बरोबरीचे हिस्सेदार म्हणून भाजपाचेही नाव घ्यावेच लागते.

मुंबईची जनता २५ वर्षातील आपल्या कारभाराला पूर्णपणे विटली आहे. त्यामुळे आता युती करून कधी हिंदुत्व, कधी मराठी माणूस, कधी गुजराती बांधव, तर कधी परप्रांतीय ही सगळी कार्डे वापरून काहीही करून यावेळी पुन्हा एकदा महापालिका ताब्यात घेऊ या, मग महापालिकेत गेल्यावर मुंबईची, मुंबईकरांची नव्या कारभाराने पुन्हा एकदा वाट लावू या, असे दोन्ही पक्षांचे नेते बहुधा बोलत असावेत. दोन्ही पक्षात जागा वाटपासाठी शिवसेनेकडून चर्चेसाठी अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर या तिघांची नियुक्ती करण्यात आली होती. यातील अनिल देसाई राज्यसभेवर खासदार आहेत. अनिल परब विधान परिषदेचे आमदार आहेत, तर रवींद्र मिर्लेकर विधान परिषदेचेच माजी आमदार आहेत. तिघांचीही पदे शिवसेनेकडून नियुक्त करण्यात आली आहेत. याचा अर्थ या तिघांपैकी कुणालाही लोकांतून निवडून जाण्याचा अनुभव नाही. ज्यांना लढाया लढण्याचा कसलाही अनुभव नाही, त्यांना एका मोठय़ा लढाईसाठी डावपेच लढवावेत म्हणून का नियुक्त करण्यात आले, याचे उत्तर कदाचित शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडेच असावे. वातानुकूलित दालनात डायफ्रुटचा आस्वाद घेत युतीचे नेते चर्चेच्या फे-या पार पाडतील. कागदोपत्री आकडेमोड होईल आणि कदाचित प्रभागही निश्चित करण्यात येतील, पण युतीचे जागावाटप दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आधीच निश्चित केले आहे. नेते काही म्हणत असले तरी कार्यकर्त्यांना युती अजिबात मान्य नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते, खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या कृतीतून हे स्पष्ट केले आहे. ज्याला शिवसेना आपला कथित बालेकिल्ला मानते, त्या शिवाजी पार्क प्रभागामधून किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्नीची उमेदवारी जाहीरही करून टाकली. त्याच परिसरातील शिवसेनेचे आमदार आणि विभागप्रमुख सदा सरवणकर यांनीही मग सोमय्या यांच्या पत्नीविरुद्ध माजी महापौर विशाखा राऊत यांची उमेदवारी जाहीर केली. आमदार आणि खासदारच असा आदर्श कार्यकर्त्यांपुढे ठेवत असतील तर कार्यकर्त्यांनीही आपापल्या प्रभागात युतीचे तीनतेरा वाजवून आपल्या मर्जीचे उमेदवार उभे करण्याचा सपाटा लावला तर नेत्यांनी बंद खोल्यातून आकडेमोडीचे कितीही कागदी घोडे नाचविले तर त्याला काय अर्थ राहिला?

युतीचा खेळ आपल्या अंगाशी येतो, याचा अनुभव शिवसेना नेत्यांनी २००९ साली झालेल्या जागा वाटपाच्या वेळीच घेतला होता. विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीला ११७ जागा देऊ केल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी खूप पडती बाजू घेऊन काही जागा वाढवून देण्याचा आग्रह केला, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अवघ्या दोन जागा म्हणजे ११९ जागा भारतीय जनता पार्टीला देण्याचे मान्य केले. पण या दोन जागांनीच चमत्कार घडविला. १७१ जागा लढविणा-या शिवसेनेला सगळ्या महाराष्ट्रातून केवळ ४४ जागांवर विजय मिळाला, तर ११९ जागा लढविणा-या भारतीय जनता पार्टीने ४६ जागांवर विजय मिळवून चमत्कार घडविला आणि तोपर्यंत विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची शिवसेनेकडून आपल्याकडे हिसकावून घेतली. याच भीतीने शिवसेना नेत्यांच्या मनात घर केले असावे. भारतीय जनता पार्टीला जागा वाढवून दिल्या आणि हा पक्ष आपल्या पुढे निघून गेला तर राजकारणात मान वर करायलाही जागा उरणार नाही.

मुंबईतील प्रत्येक प्रभागात जशी शिवसेनेची ताकद आहे तशी ती भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातच दोन्ही पक्षांकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असणे साहजिक आहे. त्यामुळे जिथे खरोखरच सेनेची ताकद आहे, तिथे त्या पक्षाच्या इच्छुकालाच तिकीट मिळायला हवे. भाजपाबाबतही असेच म्हणता येईल. पण नेत्यांनी केलेल्या जागा वाटपात कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. त्यातून एक तर सरळ बंडखोरी होईल किंवा न झाल्यास दोन्ही पक्षांचे कट्टर समर्थक युतीचा विचार न करता सरळ तिस-याच पक्षाला मते देऊन मोकळे होतील. मुळात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कितीही नाके मुरडली आणि काँग्रेसची मुंबईत अजिबात ताकद नाही, त्यामुळे सत्तेचे दावेदार आम्हीच आहोत असे सांगितले, तरी या निवडणुकीत काँग्रेसला नगण्य मानून अजिबात चालणार नाही. महापालिकेतील सत्ताधा-यांनी गेल्या २५ वर्षात केलेला भ्रष्टाचार, रस्त्यांची नीट न केलेली बांधणी त्यामुळे सा-या मुंबईभर रस्त्यावर पडलेले खड्डे, नालेसफाईचे तीनतेरा अशा अनेक कारणांमुळे मुंबईकर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपावर कमालीचे नाराज आहेत. यावेळी भाकरी न फिरविल्यास हे सेना-भाजपावाले करपलेल्या भाक-या आपल्या तोंडात कोंबल्याशिवाय राहणार नाहीत, असे मुंबईकरांना वाटू लागले आहे. त्यामुळे मतदारांनी यावेळी काँग्रेसच्या हातावर पसंतीची मोहोर उठविल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी आपल्या चर्चेपासून रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना जाणवण्याइतपत दूर ठेवले आहे. यामुळे भीमसैनिक बिथरले आणि त्यांनी ऐन मतदानाच्या वेळी धनुष्यबाण आणि कमळावर राग काढला तर आश्चर्य वाटू नये. सांगायचा मुद्दा इतकाच की, सेना आणि भाजपाचे नेते युतीची चर्चा करीत असले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केवळ मुंबईतच नव्हे तर ठाणे, पुणे, नाशिक आणि अन्य सर्वत्र युती आधीच फेटाळली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version