Home महामुंबई कांदिवलीतील मराठी शाळा बंद करण्याचा घाट

कांदिवलीतील मराठी शाळा बंद करण्याचा घाट

0
कांदिवलीतील एकवीरा शिक्षण संस्थेच्या रवींद्र बालनिकेतन या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचे सत्र पालकांना पूर्वसूचना न देताच बदलण्यात आले आहे. 
मुंबई- कांदिवलीतील एकवीरा शिक्षण संस्थेच्या रवींद्र बालनिकेतन या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचे सत्र पालकांना पूर्वसूचना न देताच बदलण्यात आले आहे. याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे (परिमंडळ 7) तक्रार केल्यानंतर त्यांनी सत्र पूर्वीच्याच वेळेत भरवण्याचे आदेश देऊनही शाळेने त्याचे पालन केलेले नाही. यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच संस्थाचालकांनी मराठी माध्यमच बंद करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.
रवींद्र बालनिकेतन ही मराठी माध्यमाची अनुदानित शाळा 30 वर्षे चालू आहे. तर याच संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा विनाअनुदानित असून, 16 वर्षे सुरू आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाने शाळेच्या पहिल्या दिवशी 13 जून रोजी मराठी माध्यमाचे सत्र बदलून दुपारी केले. याबाबत संस्थाचालकांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाही माहिती दिली नव्हती. त्याला पालकांनी विरोध करताच मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागाची वेळ पूर्वीप्रमाणे करण्यात आली. मात्र प्राथमिक विभागाची वेळ दुपारचीच ठेवली.
‘प्राथमिक आणि माध्यमिक विभागात मुले असलेल्या पालकांना पूर्णवेळ त्यांना शाळेत नेण्या-आणण्यातच जातो. तसेच शाळेने दोन मोठे प्रवेशद्वार इंग्रजी माध्यमाला दिले आहेत. तर मराठी माध्यमासाठी एक लहान प्रवेशद्वार ठेवले आहे. खेळाचे मैदानही इंग्रजी माध्यमासाठी राखून ठेवले असून, शारीरिक शिक्षणासाठी छोटे व्यासपीठ दिले आहे,’ यावरून मराठी शाळा बंद करण्याचा संस्थाचालकांचा डाव असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
————————–
30 एप्रिलपूर्वी पालकसभा घेऊन पालकांना सत्र बदलण्याची सूचना देणे आवश्यक होते. पालकांची संमती मिळाल्यानंतर उपायुक्तांकडे (शिक्षण) अर्ज करून मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र त्यांची परवानगी न घेताच परस्पर सत्र बदलल्याने पालकांचा वेळ व पैसाही खर्च होत आहे. – दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
सत्र पुढच्या वर्षीपासून पूर्ववत होईल. शाळेत प्रवेश करताना एकमेकांना होणा-या धक्काबुक्कीमुळे मोठय़ा विद्यार्थ्यांची होणारी भांडणे टाळण्यासाठी त्यांना दोन मोठे प्रवेशद्वार उपलब्ध करून दिले आहेत. लहान मुलांना दिलेले प्रवेशद्वार छोटे नसून, मोठेच आहे. – मनीषा शिर्के, मुख्याध्यापिका
बहुतांश पालकांच्या संमतीनेच सत्र बदलले आहे. मात्र काही मोजके पालक वैयक्तिक कारणास्तव शाळेला वेठीस धरत आहेत. त्यांना त्यांच्या सोयीच्या वेळा हव्या आहेत. – विनायक पाटील, कार्यवाह, एकवीरा शिक्षण संस्था

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version