Home महामुंबई काँग्रेसचा महामोर्चा : किती काळे धन जमा केलेत?

काँग्रेसचा महामोर्चा : किती काळे धन जमा केलेत?

0

नोटाबंदी निर्णयामुळे त्रासलेल्या जनतेच्या वतीने शनिवारी मुंबई काँग्रेसने वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयामुळे त्रासलेल्या जनतेच्या वतीने शनिवारी मुंबई काँग्रेसने वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी सभेला संबोधित करताना ६० दिवसात किती काळे धन जमा झाले, असा सवाल करीत त्याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला द्यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी अकरा वाजता मुंबईतील हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांंसमवेत खेरवाडी जंक्शन ते वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर नोटाबंदी विरोधात विशाल मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये काँग्रेसचे मुंबईतील खासदार, आमदार तसेच माजी मंत्री सहभागी झाले होते. पुढे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना आपले निवेदन सादर करून येथील डॉ. आंबेडकर उद्यान येथे जाहीर सभेने आपल्या मोर्चाची सांगता केली.

या वेळी बोलताना निरुपम म्हणाले की, नोटबंदी होऊन ६० दिवस झाले. अजूनही देशातील स्थिती नियंत्रणात आलेली नाही. या दिवसांमध्ये भाजपा सरकारने आयकर विभागाला वेठीस धरून काळ्या धनाविरोधात धाडसत्र सुरू केले.

या धाडसत्रामध्ये भाजपाच्या ३७ नेत्यांकडे तब्बल ६४९ कोटी रुपये सापडले. हा सर्व पैसा दोन हजार नोटांच्या स्वरूपात होता. लोकांना आपल्या खात्यातून साधे दहा हजार रुपये काढता येत नाहीत. तर या नेत्यांकडे एवढे पैसे कुठून आले. ४५ लाख कोटी रुपयांचे चलन या सरकारने क्षणात बाद केले. मग ६० दिवसात नवीन नोटा का छापल्या नाहीत, असा सवाल त्यांनी मोदींना केला. याबाबत जनतेचे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारने त्वरित द्यावीत. या मागण्यांचे एक निवेदनही जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version