Home प्रतिबिंब चर्चेतला चेहरा कशाला ‘टेक्निक’ची बात?

कशाला ‘टेक्निक’ची बात?

0

51 शतके, 65 अर्धशतके, 190 सामने, 314 डाव, 67 षटकार, 55ची सरासरी, बेहिशेबी चौकार, बेहिशेबी चेंडू.. याच महाकादंबरीत (जी संपलेली नाही!) एक पान म्हणावे तर 51 वेळा त्रिफळाचीत आणि त्या पानाच्या तळाशी न्यूझीलंडविरुद्ध तीन वेळा सलग त्रिफळाचीत. सचिन तेंडुलकर नामक महाकादंबरीच्या एका पानावरून त्या कादंबरीच्या अस्सलपणावर शंका घेण्याचा अनाकलनीय उद्योग सध्या काही मंडळींनी सुरू केलेला दिसतो. त्याला वाचा फोडली महान विक्रमवीर फलंदाज सुनील गावस्कर यांनी. म्हणजे तसा दावा इतरांनी केलेला दिसतो. त्या दिवशी म्हणजे शनिवारी पहिल्या सचिन बाद झाल्यानंतर त्याच्या विकेटविषयी गावस्कर आणि संजय मांजरेकर यांच्यात अतिशय अभ्यासपूर्ण आणि रोचक चर्चा सुरू होती. ती बहुतेकांनी ऐकलेली नाही असे दिसते. कारण ज्यांनी ती ऐकली असेल, त्यांना गावस्कर नेमके काय म्हणाले, हे समजले असते. आपल्याकडे बातम्यांचीदेखील एक ‘चेन रिअ‍ॅक्शन’ असते. संबंधित व्यक्ती नेमके काय बोलली याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही. गावस्कर तेंडुलकरच्या तंत्राविषयी, वयाविषयी काही बोलले खरे, पण ‘तेंडुलकर म्हातारा झालाय नि त्याने त्वरित निवृत्त व्हावे’ असा त्याचा अर्थ नक्कीच नव्हता. दुसरे म्हणजे, सचिनच्या किंवा कोणत्याही फलंदाजाच्या तंत्राविषयी बोलण्याचा गावस्करांना अधिकार आहे! कारण अनुभव आणि कर्तृत्व या दोन्ही आघाड्यांवर त्यांचे क्रिकेटमधील स्थान वादातीत आहे. राहता राहिला विषय सचिनचा. त्याचे वय आज 39 वर्षे आहे आणि घरच्या मैदानांवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर तो पाठोपाठच्या डावांमध्ये त्रिफळाचीत झाला हे खरे असले, तरी अजूनही मधल्या फळीत त्याच्यासारख्या अनुभवी फलंदाजाची गरज आहे. विराट कोहली वगळता एकही ताज्या दमाचा फलंदाज (गंभीर, रैना) अजून स्थिरावलेला वाटत नाही. चेटेश्वर पुजाराला अनुभवाची गरज आहे. येथून पुढे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी नि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या देशात कसोटी मालिका व्हायच्या आहेत. या तगडय़ा प्रतिस्पध्र्यासमोर अजूनही सचिनसारख्या अनुभवी फलंदाजाची गरज नक्कीच आहे. या बाबतीत त्याने राहुल द्रविडचे अनुकरण करावे, असेही काहींनी सुचवले आहे. कारण द्रविडही असाच त्रिफळाचीत होत होता, म्हणे. द्रविडच्या हातातून झेलही सुटत होते आणि आता थांबावे असे त्याला स्वत:लाही वाटू लागले होते. सचिनच्या बाबतीत तसे झालेले नाही. त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत काही वेळा तांत्रिक त्रुटींचा सामना सचिनला करावा लागला हे खरे असले, तरी त्यांवर मात करून प्रत्येक वेळी नवा आणि अधिक धोकादायक सचिन उदयाला दिसून येतो. याही वेळी ते घडणार नाही, असे मानण्याचे कारण नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version