Home महामुंबई कल्याण महापालिकेच्या ‘बीओटी’ प्रकल्पात घोटाळा

कल्याण महापालिकेच्या ‘बीओटी’ प्रकल्पात घोटाळा

0

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) प्रकल्पात गैरव्यवहार केल्याची तक्रार सरकारकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण स्पोर्ट्स क्लब अंतर्गत जलक्रीडा व मनोरंजन केंद्र, आधारवाडी येथील मल्टीप्लेक्स, लालचौकी येथील कम्युनिटी सेंटर व व्यापारी संकुल, दुर्गामाता चौक येथील ट्रक टर्मिनस व पार्किंग प्लाझा, रुक्मिणीबाई रुग्णालयाजवळील मल्टिप्लेक्स, विठ्ठलवाडी येथील भाजी मंडई व व्यापारी संकुल आणि डोंबिवली क्रीडा संकुलातील व्यापारी गाळे हे प्रकल्प बीओटी तत्त्वावर मंजूर करण्यात आले होते.

कल्याण स्पोर्ट्स क्लबचा प्रकल्प वादात सापडला होता. हा प्रकल्प २० वर्षाऐवजी ६० वर्षासाठी नियमबाह्य देण्यात आला होता. त्याच्या कंत्राटदाराकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना पालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला अटक करण्यात आली होती. ट्रक टर्मिनल व मल्टीप्लेक्स प्रकल्पाच्या जागा प्रत्यक्ष ताब्यात नसताना मंजूर करण्यात आल्याने हे प्रकल्प रखडलेले आहेत. डोंबिवली क्रीडा संकुलातील गाळय़ांचा वाद चांगलाच पेटला आहे. बीओटी प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल सरकारने घेतल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version