Home महाराष्ट्र कोकण कर्नाटक पोलिसांची मालवणात दंडूकशाही

कर्नाटक पोलिसांची मालवणात दंडूकशाही

0

सीमाभागात मराठी माणसांची मुस्कटदाबी करणा-या कर्नाटक पोलिसांनी मालवणात येऊन दंडूकशाही केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मालवण – सीमाभागात मराठी माणसांची मुस्कटदाबी करणा-या कर्नाटक पोलिसांनी मालवणात येऊन दंडूकशाही केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजापूर येथील अल्पवयीन युवतीस फूस लावून पळवल्या प्रकरणी तपासासाठी येथे आलेल्या कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसलेल्या विजापूरच्या कामगारास मारहाण करून त्याच्याकडील २ हजार रुपये व मोबाइल लंपास केला. हा मारहाणीचा प्रकार मालवण पोलिस ठाण्यात घडला असताना येथील पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या या दंडुकेशाहील पाठबळ दिल्याच्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

विजापूर येथील एका अल्पवयीन युवतीस तेथीलच एका युवकाने फूस लावून पळवल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत दाखल आहे. या युवकाचा भाऊ मालवण येथे कामानिमित्त आलेल्या दशरथ पांडू शिंदे (२३, मूळ रा. विजापूर, सध्या रा. कुंभारमाठ) याच्या किरकोळ परिचयाचा आहे. दोन दिवसांपूर्वी दशरथ शिंदे हा कुडाळ येथे अन्य एका विजापूरच्याच कामगाराबरोबर गेला असता संबंधित युवकाचा भाऊ त्याला भेटला. संबंधिताच्या भावाने केलेल्या कृत्याबाबत दशरथ याला कोणतीही माहिती नव्हती. मात्र, एकाच गावचे रहिवासी असल्याने या युवकाशी दशरथ याने संवाद साधून विचारपूस केली.

हा प्रकार दशरथच्या मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेल्या दुस-या  कामगाराने पाहून याची माहिती संबंधित युवतीच्या नातेवाइकांना दिली. त्यामुळे युवतीस पळवून नेलेल्या युवकाबाबत दशरथ याला ठोस माहिती असेल या शक्यतेने कर्नाटकचे पोलिस खासगी गाडीने युवतीच्या नातेवाइकांसह मालवणात पोहोचले. त्यांनी कुंभारमाठ येथे जाऊन दशरथ याला आपल्या ताब्यात घेतले व संबंधित युवकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याविषयी कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे त्याने सांगताच कर्नाटकच्या पोलिसांनी त्याच्याकडील मोबाइल व २ हजार रुपये काढून घेत रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याला मालवण पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी युवकाबाबत माहिती घेण्यासाठी मालवण पोलिसांच्या सहकार्याने कर्नाटक पोलिसांनी दशरथ शिंदे याला मारहाण केली. मात्र, दशरथ याला संबंधित युवकाविषयी खरोखरच कोणती माहिती नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला सोडून देण्यात आले. मात्र, त्याच्याकडून काढून घेतलेली रक्कम व मोबाइल कर्नाटक पोलिसांनी आपल्याकडेच ठेवला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version