Home महाराष्ट्र कर्जत तालुक्यातील जनावरांच्या ७ छावण्या बंद

कर्जत तालुक्यातील जनावरांच्या ७ छावण्या बंद

0

कर्जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पुरेसा चारा उपलब्ध झाल्याचे कारण देऊन तहसीलदारांनी तालुक्यातील जनावरांच्या ७ छावण्या तात्पुरत्या बंद करण्याचा आदेश दिल्याने अडीच हजार जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पुरेसा चारा उपलब्ध झाल्याचे कारण देऊन तहसीलदारांनी तालुक्यातील जनावरांच्या ७ छावण्या तात्पुरत्या बंद करण्याचा आदेश दिल्याने अडीच हजार जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसीलदारांच्या या आदेशाने शेतकरी व छावणीचालक मात्र चांगलेच संतापले आहेत.

कर्जतचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार एस. व्ही. थोरात यांनी छावण्या १५ दिवसांकरिता बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. परिसरात पुरेसा व समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चा-याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. नैसर्गिकरीत्या चारा उपलब्ध झाल्याने जनावरांच्या छावण्या तात्पुरत्या बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. छावणी बंदचा आदेश सुरुवातीला १५ दिवसांकरिता देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा व चा-याच्या उपलब्धतेबाबत विचार करून पुन्हा निर्णय घेतला जाणार आहे.

तहसीलदार थोरात यांनी काढलेल्या आदेशानुसार कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द येथील छावणीत २७२, राक्षसवाडी बुद्रुक येथील छावणीत ३०४, शिंदे येथील छावणीत २९७, कुळधरण येथे २८१, कोपर्डी येथील छावणीत ६१०, पिंपळवाडी येथे २५३, बाभाळगाव खालसा येथील छावणीत २९१ याप्रमाणे २ हजार ३८३ जनावरे असून, शेतक-यांनी आपापली जनावरे परत घेऊन जावीत, असे आदेशात म्हटले आहे. प्रशासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयाने जनावरांचे मालक असलेले शेतकरी व छावणी चालक मात्र चांगलेच संकटात सापडले आहेत.

प्रशासनाच्या दृष्टीने पुरेसा पाऊस होऊन चारा उपलब्ध झालेला असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे छावण्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्याचे आदेशात म्हटले असले तरी पुन्हा या छावण्या सुरू होण्याची शक्यता नाही. तसेच अद्यापही चाऱ्याची तीव्र टंचाई असल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version