Home महामुंबई ठाणे कर्जत एस. टी. आगार उत्पन्नात महाराष्ट्रात पहिले

कर्जत एस. टी. आगार उत्पन्नात महाराष्ट्रात पहिले

0

चार, पाच वर्षापूर्वी कर्जतचे एस. टी. आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

कर्जत- चार, पाच वर्षापूर्वी कर्जतचे एस. टी. आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध उपाय करून आगार वाचवून उत्पन्नही वाढविले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पुन्हा आगाराचे उत्पन्न घटले व लाखो रुपयांचा तोटा होऊ लागला.

त्यानंतर एक चालक असलेल्या कामगाराकडे आगार व्यवस्थापकाचा पदभार देण्यात आला आणि त्याच्या कल्पकतेमुळे आगाराचे आíथक उत्पन्न वाढले व मागील एप्रिल ते मार्च महिन्यात एक कोटी ६९ लाख ५८ हजार रुपयांचा तोटा असलेले आगार यंदा ती तूट भरून काढीत ३५ लाख २३ हजार रुपये फायद्यात आले.

शिवाय गतवर्षाच्या तुलनेत तीन लाख किलोमीटर प्रवासात वाढ झाली असून प्रवासी संख्याही लक्षणीय वाढली आहे. गत वर्षी रायगड जिल्ह्यात कर्जत आगार प्रथम क्रमांकावर होते. यंदा महाराष्ट्रात कर्जत आगार प्रथम क्रमांकावर आले आहे. याचे सारे श्रेय आगार व्यवस्थापकाचा पदभार सांभाळणा-या चालक आणि त्यांच्या टीमचे आहे.

तीस ते बत्तीस वर्षापूर्वी तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांनी कर्जत आगार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यावेळी एस.टी. हे एकच प्रवासाचे साधन होते. त्यामुळे एस.टी. फायद्यात होती. कालांतराने रिक्षा, सहा आसनी रिक्षा आल्या आणि एस.टी.ची घरघर सुरू झाली. त्यातच एसटी कर्मचा-यांच्या उदासीन व ढिसाळ कारभारामुळे एसटी तोटयात जाऊ लागली.

काही मार्गावरच्या एस.टी. बसेस बंद कराव्या लागल्या. त्यामुळे कर्जतचे आगार बंद होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु तत्कालीन आगार व्यवस्थापक बी. डी. मगदूम यांनी अनेक उपाय करून विविध मार्गावर गाडया सुरू करून कर्जत आगाराला चांगले दिवस आणले. आमदार सुरेश लाड यांनीही वेळोवेळी आगार वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मगदुम निवृत्त झाले व त्यानंतर आलेल्या आगार व्यवस्थापकांनी एसटीच्या विकासासाठी प्रयत्न न केल्यामुळे आगार पुन्हा आर्थिक अडचणीत आले.

अखेर आगार व्यवस्थापकांची बदली झाली आणि प्रभारी आगार व्यवस्थापक पद आगारात चालक असलेल्या डी. एस. देशमुख यांच्याकडे गेले. देशमुख यांनी विविध संघटनांमध्ये काम केले होते. सर्वच कर्मचा-यांशी त्यांचा उत्तम संपर्क होता. सर्व सहका-यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम सुरू केले.

उत्पन्नाचे विविध पर्याय शोधून आगार सुस्थितीत आणले. लाखोंचा तोटा भरून काढून लाखो रुपये फायद्यामध्ये आगार आले आणि बघता बघता गत वर्षी रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आणले.

यंदाच्या आíथक वर्षात १२४.३६ या उच्चांकी गुण क्रमांकाने महाराष्ट्रात उत्पन्नात सर्व प्रथम येण्याचा मान आगाराने पटकावला. विशेष म्हणजे यातील दुस-या क्रमांकाच्या आगाराचा गुण क्रमांक खूपच मागे आहे.

हे सारे श्रेय आगार व्यवस्थापकाची धुरा सांभाळणा-या डी. एस. देशमुख आणि त्यांच्या टीमचे आहे. देशमुख यांनी त्यानंतर कामगारांसाठी कबड्डी, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी आगारच्या दुर्लक्षित जागेवर मैदाने उपलब्ध करून दिली. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये आगारविषयी आपुलकी निर्माण झाली.

व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न

शिवाय संपूर्ण आगार व्यसनमुक्त करण्याची किमयासुद्धा देशमुखांनी केली असून शासकीय आदेशांचे पालन करून विविध उपक्रम राबविण्यातही कर्जत आगाराचे सर्व कर्मचारी पुढे आहेत. काही दिवसांपूर्वी आगारात निवृत्त कर्मचा-यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे निवृत्ती कर्मचा-यांनाही एसटीशी तुटल्याची भावना राहिली नाही. देशमुख यांनी मात्र, एसटीच्या या प्रगतीचे श्रेय, कर्मचारी व प्रवाशांना दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version