Home महामुंबई ठाणे कर्जतमधील वीज ग्राहकांना शॉक!

कर्जतमधील वीज ग्राहकांना शॉक!

0

तालुक्यातील एकूण ५० हजार वीज ग्राहकांपैकी तब्बल १२ हजार ग्राहकांनी वीजबिले थकवल्याने महावितरणने या ग्राहकांची वीज कापली आहे.

नेरळ – तालुक्यातील एकूण ५० हजार वीज ग्राहकांपैकी तब्बल १२ हजार ग्राहकांनी वीजबिले थकवल्याने महावितरणने या ग्राहकांची वीज कापली आहे. यातील बडय़ा वीज ग्राहकांना महावितरणने न्यायालयातर्फे नोटिस बजावली आहे.

१३ डिसेंबरला कर्जत न्यायालयात होणा-या लोकअदालतमध्ये थकित देयके न भरल्यास महावितरण कंपनी या सर्वावर गुन्हे दाखल करणार आहे, अशी माहिती साहायक अभियंता वाघमोडे यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील एकूण ५० हजार वीज ग्राहकांकडून महिन्याला चार कोटींचा महसूल महावितरण कंपनी गोळा करते. मागील १५ वर्षात तालुक्यातील १२ हजार वीज ग्राहकांनी वीज बिले थकवली होती. त्यामुळे या ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने तोडला आहे. या सर्व ग्राहकांचा समावेश महावितरणने थकित ग्राहकांच्या यादीत केला आहे.

या सर्वाकडे साधारण पाच कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्याचे अधिकार सरकारने महावितरण कंपनीला न्यायालयच्या कक्षेत राहून वसूल करण्याची मुभा दिली आहे. लोकन्यायालयच्या अधिकारात यातील दोन कोटींची रक्कम वसूल व्हावी म्हणून २१७४ वीज ग्राहकांना नोटिस बजावण्यात आली आहे.

या ग्राहकांना न्यायालयाने नोटिस बजावली असल्याने विशेष बाब म्हणून आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी आणि थकित बिले भरण्यासाठी शेवटची संधी मिळणार आहे. दरम्यान, न्यायालयाने थकित बिले भरण्याची तयारी असलेल्या वीज ग्राहकांच्या बिलातील व्याजाची रक्कम महावितरणने माफ करावी, अशी सूचना केली आहे. अन्य ग्राहकांकडून थकित बिले वसूल करण्याची कार्यवाही सुरू असून थकित रक्कम भरण्याची तयारी नसेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version