Home महामुंबई ठाणे कर्जतमधील भाडवल गावात विजेचा लपंडाव

कर्जतमधील भाडवल गावात विजेचा लपंडाव

0

कर्जत तालुक्यातील भाडवल गावातील एका भागात सहा महिन्यांपूर्वी जळालेले वीज रोहित्राची अद्याप पुरेशी दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

नेरळ- कर्जत तालुक्यातील भाडवल गावातील एका भागात सहा महिन्यांपूर्वी जळालेले वीज रोहित्राची अद्याप पुरेशी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. महावितरण कंपनीच्या नेरळ येथील शाखा अभियंता कार्यालयाने तेथील ग्रामस्थांना ममदापूर गावातील वीज रोहित्र मधून तात्पुरता वीजपुरवठा केला आहे.

मात्र, त्यातून खूपच कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने दोन्ही गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन परीक्षांच्या काळातच पुरेशी वीज नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे.

हे रोहित्र वेळीच दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थ नेरळ महावितरण कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा ग्रामस्थ किशोर घारे यांनी दिला आहे.

चारशे घरांची लोकवस्ती असलेल्या भाडवल गावाचे दोन भागात विभाजन झाले आहे. नव्याने निर्माण झालेल्या पातलीचा माळ (गणेश नगर) भागात सव्वाशे घरांची वस्ती आहे. त्या घरांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने १०० केव्हीएचे वीज रोहित्र बसविले होते. हे वीज रोहित्र मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जळाले.

या वेळी महावितरणने जवळच्या ममदापूर गावातील २०० केव्हीए क्षमतेच्या वीज रोहित्रामधून तात्पुरता वीजपुरवठा दिला होता. मात्र तात्पुरता वीजपुरवठा रात्रीच्या वेळी अत्यंत कमी दाबाने होत असल्याने ममदापूर ग्रामस्थही हैराण झाले होते.

ममदापूर वीज रोहित्रावर आता भाडवल गावाचाही भार असल्यामुळे हे रोहित्रही जादा वीज दबावामुळे जळून जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ही दोन्ही गावे अंधारात बुडतील. या बाबत दोन्ही गावातील ग्रामस्थांनी नेरळच्या महावितरण कार्यालयात जाऊन शाखा अभियंत्यांची भेट घेऊन तक्रार मांडली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version