Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती करा कामधेनूचे संरक्षण

करा कामधेनूचे संरक्षण

0

गोरक्षेचा अर्थ केवळ सामान्य जीवाचं रक्षण नाही तर गावजीवनाचं रक्षण आहे. गाईला तहानलेलं-भुकेलं ठेवणं, न खाण्यासारखे पदार्थ (प्लॅस्टिक) खाण्यासाठी रस्त्यावर बेवारशी सोडणं हा एक अक्षम्य अपराध आहे. कारण घरात असलेली गाय ही ‘कल्पवृक्षा’प्रमाणे आपल्याला जीवनभरासाठी उपयोगी पडते. तिला कामधेनू हे दिलेलं नाव ती सार्थ ठरवते.

‘ग्रामीण विकास’ हा शब्द आपण सतत वापरल्या जाणा-या एखाद्या चलनी नाण्यासारखा सध्या वापरलेला पाहतो. जर आपणाला खरोखरच विकासाची कास धरायची असेल तर ग्रामविकासात गाईचं स्थान, महत्त्व काय आहे, ते नीट जाणून घ्यायला हवं. यासाठी आपण गाय विकासासाठी कशी काय उपयुक्त ठरू शकते, ते पाहूया –

गाईचं पोट (उदर) हे जणू एखाद्या कारखान्याप्रमाणे असतं. तिने खाल्लेला चारा, पालापाचोळा यांपासून पचन होऊन त्यापासून अनेक मानवोपयोगी पदार्थाची निर्मिती होते.
१) गोमय : जमिनीचं नसर्गिक खाद्यान्न गोमय (शेण) आहे. शेणापासून (गोमय) खत निर्माण करण्याच्या विविध पद्धती आहेत, ज्यांच्यापासून प्रत्येक शेतकरी अगदी घरच्या घरी खत निर्माण करून स्वावलंबी बनू शकतो.

गोबर गॅस : शेणापासून तयार होणा-या वायूचा इंधन म्हणून वापर केला जातो. गोबर गॅसचं उर्वरित मिश्रण (स्लरी) सर्वोत्तम जैविक खत आहे. इतर कच-याबरोबर हे स्लरीचं मिश्रण एकत्र केल्यानेही चांगल्या प्रतीचं कंपोस्ट खत बनतं.

मिथेन गॅसची निर्मिती : गाईच्या शेणापासून ‘मिथेन गॅस’ मिळवू शकतो. यामुळे जळणासाठी वृक्ष तोडण्याची गरज नाही. मिथेन वायूमुळे भोजन तयार करणा-या गृहिणींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. घराची स्वच्छता टिकून राहते.

नाडेप पद्धती : १० फूट बाय ५ फूट बाय ३ फूट या आकाराची एक टाकी करून त्यात विशिष्ट प्रकारे कचरा, गोमय (शेण) आणि माती टाकून ती भरली जाते. ३ ते ४ महिन्यांनंतर या मिश्रणातून अत्यंत उत्तम खत तयार होतं. प्रती किलो २ रुपये या भावाने विकल्यास ६००० रुपये मिळू शकतात. वर्षभरात साधारण १८ हजाराचं खत तयार होतं. एक किलो शेणापासून २० किलोग्रॅम खत तयार होतं.

काही कारणास्तव गाय मेल्यानंतर तिच्या दोन्ही शिंगांमध्ये शेण भरून सहा महिने जमिनीत पुरून (गाडून) ठेवल्यास ‘शिंगखत’ मिळतं. हे शिंगखत एक एकराला पुरेसं होतं. जमिनीत १२ फूट बाय ४ फूट बाय ३ फूट आकाराचे खड्डे तयार करून त्यात शेण, पालापाचोळा, विघटनशील कचरा टाकूनही खत तयार करावं. हे खत तयार होण्याचा कालावधी हा जवळपास १३० दिवसांचा असतो.

२) गोमूत्र : हे महारसायन आहे. गोमूत्र हा आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त ठरणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. गोमूत्रापासून अनेक प्रकारची औषधं, आसवं, अरिष्ट, वटिका, नेत्रबिंदूची औषधं तयार केली जातात. तसंच एका गाईच्या शेण आणि मूत्रापासून तयार होणारी महिलांसाठीची सौंदर्यप्रसाधनं, औषधनिर्मिती हा गावातील युवा-युवतींसाठी एक उत्तम लघुउद्योगही होऊ शकतो.

कीटकनाशक स्वरूपात वापरताना गोमूत्रात लिंबोळ्या व पाल्याचा उपयोग करून उत्तम प्रकारचं कीटकनाशक निर्माण केलं जातं. यामुळे पर्यावरण आणि उत्पादन प्रक्रिया प्रदूषणमुक्त होते.

गो अनुसंधान केंद्र देवलापार (महाराष्ट्र) म्हणजेच ‘आदर्श गो सेवा व अनुसंधान प्रकल्प, अकोला (महाराष्ट्र)’ इथे चालणा-या प्रयोगाने सिद्ध केलं की, भाकड गाईपासून (दूध न देणारी गाय) तयार होणा-या गोमय (शेण) आणि मूत्रापासून १६ हजार रुपयाचं साधन दरवर्षी मिळवू शकतो.

३) दूध : आईच्या दुधात आढळणारे सर्व उपयुक्त गुणधर्म गाईच्या दुधात असतात. गोरसापासून (गाईच्या दुधापासून) दही, तूप, ताक, साय, मिष्ठान्नाचे विविध प्रकार इत्यादी उत्तम पदार्थ तयार केले जातात. एका गाईपासून ५ ते ७ कुटुंबांचं पोषण उत्तम प्रकारे होऊ शकतं.

४) तूप : पर्यावरण-वातावरणशुद्धीसाठी केल्या जाणा-या होमामध्ये गाईच्या तुपाचा उपयोग केला जातो.

५) बैल : भारतात बैलाच्या सहाय्याने शेती करण्याची फार जुनी परंपरा आहे. एक गाय तिच्या एकूण जीवनकालावधीत १२ बैलांना जन्म देऊ शकते. प्रत्येक बैलाच्या विक्रीतून कमीत कमी ६० ते ७० हजार रुपयांचा फायदा होतो. वाहन आणि शेतीपूरक कामांसाठी बैलांचं महत्त्व (उपयुक्तता) अनन्यसाधारण आहे.
यावरून गाईची उपयुक्तता लक्षात येते. गाय वाचली तर मनुष्य वाचेल. ती नष्ट झाली तर आपण सर्व, अर्थात प्रकृती, पर्यावरणरक्षण व आपली सभ्यता, संस्कृती नष्ट होईल. गोरक्षणाचा अर्थ केवळ सामान्य जीवाचं रक्षण नाही तर गावजीवनाचं रक्षण आहे. गाईला तहानलेलं-भुकेलं ठेवणं, गल्लीमध्ये न खाण्यासारखं वा शरीरास घातक पदार्थ (प्लॅस्टिक) खाण्यासाठी बेवारशी सोडणं हा एक अक्षम्य अपराध आहे.

साधारणपणे एका सुदृढ गाईपासून १० ते १५ लिटर मूत्र प्रत्येक दिवशी मिळतं. हे गोमूत्र नीट संकलित केल्यास ते औषधी म्हणून उपयुक्त आहे. ३०० रुपये प्रती लिटर भावाने विकलं जाऊ शकतं. आसव, अरिष्ट, वटी, शॅम्पू, साबण इत्यादी प्रसाधनं आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये या गोमूत्राचा समावेश केला जातो. पंचगव्य प्राशन केल्याने शरीरातील संचित विष नष्ट होतं, असं ऋषिमुनींनी सांगितलं आहे. पोटातील कृमी, हृदयरोग, कर्करोग (कॅन्सर), जलोदर (बवासीर) आदी रोगांचे रुग्ण गोमूत्र प्राशनाने बरे झाल्याचे पुरावे आहेत. गोमयामध्ये वेगवेगळी १६ तत्त्वं आढळून येतात. गोमूत्रामध्ये २४ प्रकारची खनिजतत्त्वं असतात. शेण व गोमूत्र हा जमिनीचा आहार आहे. गावाच्या विकासात गाईच्या महतीबाबत चर्चा करताना, आपण विदेशी गाईंच्या प्रकारांचा समावेश केलेला नाही. विदेशामध्ये गाईचं महत्त्व तिचं मांस व दूध देण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं.

इंग्लंडमध्ये गाईंना भरपूर दूध येण्यासाठी त्यांना मांस खाण्यास दिलं गेलं. परिणामत: त्यांना Mad Cows Diseas हा रोग झाला. पर्यायी अशा विकारग्रस्त गाईंची हत्या (कत्तल) करण्यात आली. ‘गीर’, ‘कांक्रिज’, ‘थारपरकर’, ‘सिंधी’, ‘साहिवाल’, ‘मालवी’, ‘मांटगोमरी’ आदी देशी गाईंच्या प्रजातींची योग्य देखभाल करून त्यांना चांगला खुराक दिल्यास, कोणत्याही विदेशी गाईपेक्षा देशी गाय कमी नाही. जगातील सर्वश्रेष्ठ गाईंची जात भारतात आहे. तिच्या खांद्यावर काँघोर (Hump) असते. या गाईच्या दुधात सुवर्णाचा अंश असून तो एक पूर्ण आहार समजला जातो.

गावातील एक कुटुंब गोपालनाने उत्तम प्रकारे जीवन व्यतीत करू शकतं. वृद्ध, अपंग वा भाकड गाईदेखील त्यांच्यावर केलेल्या एकूण खर्चाच्या बदल्यात अधिक काही देतात. भारतीय शेतीमध्ये गाईला प्राधान्य देऊन गाईंचं रक्षण, त्यांचं संवर्धन आणि गोधनाचं महत्त्व लक्षात घेऊन पर्यायानं गावाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक पातळीवर सर्वार्थानं संपन्न केलं जाऊ शकतं.
मातर: सर्व भूतानां गाव: सर्व सुख प्रदा:।
वृद्धिमाकांक्षता नित्यं गाव: कार्या: प्रदक्षिणा।।

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version