Home संपादकीय विशेष लेख कमळाच्या ‘राजयोगा’ला मिळाले आणखी बळ

कमळाच्या ‘राजयोगा’ला मिळाले आणखी बळ

0

ठाण्यात भाजपाच्या बाबतीत मागील काही दिवसांत घडत असलेल्या घडामोडी पाहता ठाणे भाजपाच्या पत्रिकेत राजयोग आल्यासारखे वाटते. 

ठाण्यात भाजपाच्या बाबतीत मागील काही दिवसांत घडत असलेल्या घडामोडी पाहता ठाणे भाजपाच्या पत्रिकेत राजयोग आल्यासारखे वाटते. लोकसभेला भाजपाच्या जीवावर जिंकूनही विधानसभेत वेगळे लढणा-या शिवसेनेच्या नाकावर टिच्चून भाजपाने ठाण्यातून आमदार निवडून आणला, त्याचवेळी ठाणे शहरातून भाजपाला थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल १ लाख ७० हजार मतेही मिळाली, त्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वबळाच्या वल्गना सुरू केल्या आणि त्यातच शब्द पाळण्यासाठी शिवसेनेने ऐन शेवटच्या वर्षी भाजपाला स्थायी समितीचे सभापतीपदही दिले.

त्यामुळे हा राजयोग असाच कायम राहिल्यास भाजपाला ठाणे पालिकेत तिस-या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर येण्यास वेळ लागणार नाही, त्यासाठी कुठल्या जिन्याने जायचे, हे भाजपाला एव्हाना चांगलेच ठाऊक झालेले आहे. शिवाय हा जिना दुस-या मजल्यावरूनच जात असून तिथेही सध्या कमळासाठी अनुकूल वातावरण आहे.

ठाणे महापालिकेवर मागील अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यात भाजपाही त्यांच्यासोबत असली, तरी शहरात भाजपाचे फार दखल घेण्यासारखे अस्तित्व नव्हते. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जीवावर शिवसेना सगळीकडे निवडून आली आणि आपल्या पक्षाची ताकद आणि लोकप्रियता किती वाढली आहे, याची काहीशा साशंक असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना प्रचिती आली.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीपुरता शिवसेना-भाजपाचा काडीमोड झाला आणि त्यातही भाजपाने ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातून आपला आमदार निवडून आणत शिवसेनेला जोरका झटका दिला. यावेळी ठाणे शहरातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून भाजपाला एकंदरीत १ लाख ७० हजार मते पडली.

ही मते आगामी पालिका निवडणुकीत आणखी वाढूही शकतात. त्यासाठी भाजपाचे सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेत मागील काही दिवसांत घडलेल्या काही घटनांवरून सातत्याने अस्वस्थता पाहायला मिळत आहे. ठाणे शहरात शिवसेनेची आत्तापर्यंत मोठी ताकद होती. शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही स्वत:ची वेगळी ताकद असली, तरी ते ठाणे पालिकेची सत्ता मिळवतील, इतकी ताकद निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेली नाही.

मात्र यंदा भाजपाने आपली मोच्रेबांधणी फार आधीपासूनच सुरू केलेली आहे. ठाणे पालिकेच्या निवडणुका वेगळ्या लढणार की एकत्र? वेगळ्या लढल्या तरी नंतर युती होणार का? हे तत्कालीन प्रश्न असले, तरी सध्या ठाणे पालिकेत भाजपाचा महापौर बसवण्यासाठी भाजपाची मोच्रेबांधणी सुरू आहे. राज्यात सरकारमध्ये एकत्र असले आणि ठाणे पालिकेत प्रामुख्याने सेनेचे राज्य असले, तरी पालिकेच्या प्रशासनावर मात्र भाजपाची छाप आहे.

अनेक निर्णय हे सत्ताधारी पक्षाला बायपास करून घेतले जात असल्याचा आरोप शिवसेनेनेच मागे केला होता. यामागेही वेगळी रणनीती असू शकते. अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाला आलेल्या मुख्यमंत्र्यांना ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांनी मेट्रोची प्रतिकृती भेट देत आपण मेट्रोसाठी प्रयत्नशील आहोत, मात्र भाजपा त्याला दाद देत नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाला यामुळे कितपत झटका बसला हे माहीत नाही.

मात्र या संमेलनातून एका परदेशी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी म्हणून निघालेले मुख्यमंत्री थेट ठाणे महापालिका आयुक्तांच्या घरी गेल्याने शिवसेनेला ४४० व्होल्टचा झटका बसला. अर्थात नंतर याबाबत प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी विदर्भात काम केलेले असल्यामुळे त्यांचे चांगले स्नेहसंबंध असल्याचे शिवसेनेने सांगितले, तरी हे वरवरचेच होते, हे कुणीही सांगेल.

यानिमित्ताने भाजपा ठाणे काबीज करण्यासाठी काय मोच्रेबांधणी करतोय, याची फक्त एक छोटीशी झलक पाहायला मिळाली. हे कमी म्हणून की काय, ठाणे महापालिकेत शिवसेनेचेच काही नगरसेवक स्वपक्षाचाच वारंवार जाहीर उद्धार करत असतात. महापौर, सभागृह नेते यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी मागील काही दिवसांत त्यांनी सोडलेली नाही.

विरोधी पक्षही सध्या प्रभावीपणे काम करत आहे. त्यामुळे शिवसेनेला साडेसाती सुरू झाली आहे की काय? असे वाटून जाते. या सगळ्यात स्वपक्षीयांचे आव्हान थोपवावे, भाजपाकडे लक्ष द्यावे? की विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर द्यावे? अशा कात्रीत पालिकेतील शिवसेनेचे नेते अडकले आहेत.

त्यात आणखी भर म्हणून यंदा शेवटच्या वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाला देण्याची मजबुरी शिवसेनेवर आली आहे. कारण तसा शब्द शिवसेनेने भाजपाला दिला होता. शब्द दिला की तो पाळायलाच हवा, मात्र तेच जर मागील वर्षी दिले असते, तर शेवटच्या वर्षी निवडणुकांच्या तोंडावर तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे राहिल्या असत्या. मात्र नियोजनाच्या अभावाने किंवा शिवसेनेतील नगरसेवकांच्या आततायीपणामुळे असे करावे लागले असू शकते.

स्थायी समितीची निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती सभागृहाच्या बाहेर मोठया प्रमाणावर भाजपा कार्यकत्रे जमले होते. तिथे संजय वाघुले यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय होताच भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विजयी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी वाघुले यांना स्वत: कार्यकर्त्यांना युतीच्या विजयाच्या घोषणा द्या, असे सांगावे लागले.

वरकरणी ही गोष्ट फारच क्षुल्लक आहे. मात्र ज्याप्रकारे काही दिवसांत भाजपा नेते, कार्यकत्रे यांना त्यांच्या वरिष्ठांनी मार्गदर्शन केले असेल, त्यामुळे किंवा मागील काही दिवसांत ठाण्यातील भाजपाच्या पत्रिकेत आलेल्या राजयोगामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आम्ही स्वबळावर लढायचे की नाही हा निर्णय वरिष्ठच घेतील, असे सांगितले होते.

मात्र त्याचवेळी कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असून ठाणे पालिकेवर भाजपाचा महापौर बसावा, असे कार्यकर्त्यांना वाटत असल्याचे त्यांनी म्हटले होते. ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटा होती. ठाणे शहरात भाजपाकडे सध्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. लोकसभा आणि विधानसभेनंतर अनेक पक्षांतून भाजपात इच्छुक आले आहेत. यात अनेक सक्षम कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

शिवाय भाजपात बंडखोरीचे प्रमाणही जास्त नाही. जरी झालीच तरी ती थोपवण्यात पक्षाला नेहमीच यश येत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे स्वबळावर लढून ज्या जागा निवडून येतील, अशांनाच भाजपाने उमेदवारी दिल्यास प्रस्थापितांची डोकेदुखी वाढू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा, त्यांचे प्रभाग हे चांगल्याप्रकारे बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता नाही. उलट सध्याच्या सत्ताधा-यांविरोधात योग्य प्रकारे प्रचार झाल्यास त्यात वाढच होईल.

ठाणे शहरात अजूनही नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याकडे शिवसेनेने केलेल्या दुर्लक्षामुळे ठाणेकरांच्या संतापात भर पडली आहे. आजवर आत्मियतेने हा मुद्दा कुठल्याही नेत्याने प्रभावीपणे लावून धरलेला नाही. त्यात भरीस भर म्हणून ठाणेकरांच्या हाता-तोंडाशी आलेले रेल्वेचे पाणी शिवसेनेच्याच खासदारांनी नवी मुंबईकडे फिरवले. त्यामुळे शिवसेनेला नागरिकांच्या समस्यांबाबत आत्मीयता नसल्याची टीका झाली.

दुसरीकडे शहरातीलही अनेक प्रश्न छोटे वाटत असले, तरी आजच्या घडीला ते गंभीर बनले आहेत. त्याकडेही आजवर पालिकेतील शिवसेनेच्या एकही नेत्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत या सगळयाविरोधात प्रभावीपणे बाजू लावून धरली गेल्यास विरोधी पक्ष आणि मित्रपक्षालाही त्याचा फायदा होऊ शकतो. पालिकेत सत्तेसाठी हे पक्ष मित्रपक्ष म्हणून नांदत असले, तरी या सगळ्यात फटका फक्त एकाच पक्षाला बसणार आहे. थोडक्यात, कमळाचा हा राजयोग धनुष्यबाणासाठी मात्र डोकेदुखी ठरणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version