Home क्रीडा कबड्डीमध्ये ‘थोडी खुशी,ज्यादा गम’

कबड्डीमध्ये ‘थोडी खुशी,ज्यादा गम’

0

पुरुष संघ उपांत्य फेरीत पराभूत, महिला संघ अंतिम फेरीत

जकार्ता – भारताच्या कबड्डीसाठी गुरुवारचा दिवस ‘थोडी खुशी ज्यादा गम’ असा ठरला. उपांत्य फेरीमध्ये आशियाई स्पर्धेत भारताला गुरुवारी मोठा धक्का बसला. सात वेळच्या सुवर्णपदक विजेत्या संघाला उपांत्य फेरीत इराणकडून १७-२७ अशी मात खावी लागली. आशियाई स्पर्धेतील कबड्डीच्या समावेशानंतर प्रथमच भारताचा संघ अंतिम फेरी गाठू शकलेला नाही. दुसरीकडे, महिला संघाने सातत्य राखताना अंतिम फेरी गाठली. त्यांना सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

आजवरची कामगिरी पाहता गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारताचे पारडे जड होते. मात्र इराणने सुरुवातीपासून कडवी झुंज दिली. त्यामुळे मध्यंतराला ९-९ अशी बरोबरी होती. उत्तरार्धामध्ये इराणने खेळ उंचावला आणि १४-११ अशी आघाडी घेतली. यशस्वी चढाया करताना त्यांनी आघाडी वाढवली. दुस-या सत्रात इराणने तब्बल १८ गुण मिळवले. यावरून त्यांच्या सर्वोत्कृष्ट खेळाची कल्पना येते. दुसरीकडे, भारताने सर्व आघाडय़ांवर निराशा केली.

गटवार साखळीमध्ये भारताला दक्षिण कोरियाने हरवले होते. गतविजेत्यांसाठी तो धोक्याचा इशारा होता. गटात दुसरे स्थान मिळवत भारताने आगेकूच केली तरी इराणने प्रतिस्पध्र्याची कमकुवत बाजू हेरताना मोठय़ा फरकाने विजय मिळवला. अंतिम फेरीत इराणसमोर दक्षिण कोरियाचे आव्हान आहे.  ११९० बीजिंग आशियाई स्पर्धामध्ये कबड्डीचा समावेश झाला. त्यानंतर भारताच्या पुरुषांनी प्रत्येक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे.

भारतासह पाकिस्तानला कांस्य
भारतासह पाकिस्तानला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत पाकिस्तानला हरवत दक्षिण कोरियाने अंतिम फेरी गाठली.

महिला संघाला ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिकची संधी
भारताच्या महिला संघाला सलग तिसरे सुवर्णपदक पटकावण्याची संधी आहे. उपांत्य फेरीत भारताने चायनीज तैपेइवर २७-१४ असा सहज विजय मिळवत ‘फायनल’ प्रवेश केला.
भारताने यापूर्वीच्या दोन्ही खेपेस सुवर्णपदक जिंकले आहे. यंदा अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इराण किंवा थायलंडचे आव्हान आहे. आशियाई स्पर्धेप्रमाणे विश्वचषक स्पर्धेतही महिला कबड्डी संघाने सातत्य राखले आहे. त्यांनी २०१२, २०१३ आणि २०१४ अशा सलग तीनदा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version