Home देश कन्हैयाची हत्या करणा-यास ११ लाखांचे बक्षीस

कन्हैयाची हत्या करणा-यास ११ लाखांचे बक्षीस

0

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली – जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कन्हैयाची हत्या करणा-यास ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी पोस्टर्स दिल्लीत झळकल्याने खळबळ माजली आहे.

जेएनयू संघटनेचा अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारला ठार केल्यास ११ लाख देण्यात येतील, असे पोस्टरमध्ये म्हटले आहे. ही पोस्टर्स हिंदीत असून तिच्यावर पूर्वाचल सेना असे नाव लिहिले आहे. उत्तर प्रदेश व बिहारच्या जनतेसाठी ही संस्था काम करत असल्याचा दावा त्यात केला आहे.

या संस्थेचा अध्यक्ष आनंद शर्मा म्हणाला की, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. आम्हाला तातडीने न्याय हवा आहे. कन्हैया कुमारने भारतमातेचा अपमान केला असून त्याने देशविरोधी घोषणा दिल्या आहेत. न्यायालयावर आमची श्रद्धा असली तरी न्याय मिळण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळेच त्याची हत्या करणा-यास आम्ही ११ लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत. यासाठी आम्ही दिल्लीच्या विविध भागात कन्हैया कुमारच्या हत्या करण्याचे आवाहन करणारी पोस्टर्स लावली आहेत, असे तो म्हणाला.

बिहारमध्ये कन्हैयाचे घर माझ्या घरापासून अवघ्या १० किलोमीटरवर आहे. आमच्या भूमीत देशविरोधी जन्माला येत नाहीत. त्यामुळे आपण त्याच्या हत्येची घोषणा केली, असे शर्मा म्हणाला. पोलीस अधिका-यांनी सांगितले की, या प्रकरणाची आम्ही प्राथमिक चौकशी करत आहोत. ही पोस्टर्स लावणा-यांच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आहोत. या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल केला जाईल. विद्यापीठाच्या बाहेर कुमारच्या सर्व हालचालींची माहिती देण्याचे आदेश दिल्ली पोलिसांनी जेएनयूच्या अधिका-यांना दिले आहेत.

 कन्हैया कुमारची जीभ कापा, पाच लाख रुपये घ्या

बदायून (उत्तर प्रदेश) – जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारची जीभ कापून देणा-यास पाच लाख रुपये देण्याची घोषणा भाजपाच्या युवा नेत्याला चांगलीच महागात पडली. पक्षाने याची गंभीर दखल घेऊन त्याची पक्षातूनच हकालपट्टी केली आहे. पंतप्रधान व भाजपाच्या विरोधात बोलणा-या कन्हैया कुमारची जीभ कापणा-यास पाच लाख देण्याची घोषणा भाजपा युवा नेता कुलदीप वाष्र्णेय याने केली. यामुळे खळबळ उडाली. त्यामुळे पक्षाने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. वाष्र्णेय याचे वक्तव्य वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. पक्षाची परवानगी न घेता हे वक्तव्य केल्याने त्याची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version