Home ऐसपैस औरंगाबाद, नाशिकचं लेणीवैभव!

औरंगाबाद, नाशिकचं लेणीवैभव!

0

महाराष्ट्रात लेण्यांचं वैभवकथन आपण अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांपासून केलं होतं. महाराष्ट्रात ऐतिहासिक वैभव समजल्या जाणा-या औरंगाबाद आणि नाशिक येथे वेगवेगळ्या लेण्या आहेत. त्याविषयीची माहिती या भागात घेऊ या.

औरंगाबाद जिल्हय़ातील अजिंठा-वेरूळ प्रमाणेच औरंगाबादनजीक असलेल्या लेण्याही प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या लेण्यांना पांडव लेण्या म्हणतात. औरंगाबादच्या लेण्यांमध्ये काही ठिकाणी पडझड झाली आहे तर या नाशिकच्या पांडव लेण्या काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या लेण्यांचे जतन करण्यात आपण दुर्लक्ष करीत आहोत, असंच म्हणावं लागेल.

औरंगाबादच्या लेण्या

औरंगाबाद शहरालगत ‘बीबी का मकबरा’पासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डोंगरात या लेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्या बौद्ध लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इसवी सनाच्या सहाव्या ते सातव्या शतकात ही लेणी खोदण्यात आली. त्यांची समकालीन संख्या १२ इतकी आहे. बसाल्ट हा खडक इतर खडकांच्या तुलनेत मृदू खडक म्हणून ओळखला जातो. अशा या बसाल्ट खडकांत या लेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्या पूर्व-पश्चिम डोंगररांगेत दोन गटांत विभागलेल्या आहेत. यात एकूण नऊ लेण्या आहेत. यात लेणी क्रमांक ५ मध्ये भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती तर क्रमांक ६ मध्ये श्रीगणेशाची मूर्ती आहे.

एक लेणी हीनयान असून उर्वरित आठ लेण्या महायान पंथाच्या आहेत. लेणी क्रमांक चारमध्ये चैत्यगृह असून ही हीनयान पंथाची आहे. हे एक चैत्यगृह सोडल्यास बाकी सगळे विहार आहेत. ही लेणी प्राचीन असून तिस-या शतकात कोरलेली असावी. तर उर्वरित लेण्या सातव्या शतकापर्यंत खोदण्यात आल्या. लेणी क्रमांक १ ते ७ आणि ९ या लेण्या प्रेक्षणीय आहेत. येथे हीनयान, महायान आणि वज्रयान अशा लेण्या आढळतात. बोधिसत्त्व पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी यांच्या भव्य मूर्ती आहेत. पद्मपाणीच्या हातात कमळ, अवलोकितेश्वराच्या मुकुटात बुद्धांची मूती आणि वज्रपाणीच्या मुकुटात स्तूप असते. पहिल्या गटापासून दुस-या गटाचे अंतर अंदाजे एक किलोमीटर आहे.

अजिंठा, वेरूळ येथील लेण्यांप्रमाणे याही लेण्या रंगीत होत्या. रंगकामाचे अवशेष आजही येथे पाहायला मिळतात. क्रमांक दोन या लेणीमध्ये दीर्घिका, मध्यवर्ती दालन आणि प्रदक्षिणा मार्ग आहेत. यातील गाभा-यात भगवान गौतमबुद्धाची आसनस्थ भव्य मूर्ती आहे. उजवीकडे विविध आसनातील बुद्ध मूर्ती आहेत. यात शिल्पकाम भरपूर आहे, परंतु त्याची झीज झालेली आहे. लेणी क्रमांक तीन हे प्रेक्षणीय विहार आहे. यातील सभामंडपात बारा सुशोभित स्तंभ आहेत. सर्व स्तंभ वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजवलेले आहेत. एका स्तंभाच्या तुळईवर सूतसोम जातक कथेचे शिल्प कोरलेलं आहे. गाभा-यात आसनातील सिंहासनावर बसलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला अनुयायी दाखवले आहेत.

चौथी लेणी ही सर्वात प्राचीन लेणी आहे. इसवी सनाच्या तिस-या शतकातील असावीत. हीनयान पंथाचे हे चैत्यगृह आहे. यातील तुळ्याचे छत आणि स्तुपावरील कोरीव काम अतिशय कुशलतेने केलेलं आहे. पाचव्या क्रमांकाच्या लेणीत जैन र्तीथकर भगवान पार्श्वनाथ यांची ध्यानस्थ मूर्ती आहे. सहाव्या क्रमांकाच्या लेणीपासून पूर्वेकडील गटास आरंभ होतो. या लेणीची दोन दालनं आहेत. पहिल्या दालनात गणेशाची मूती आहे. त्यासोबत सप्तमातृका कोरलेल्या आहेत. बाजूला गौतम बुद्धाची मूर्ती आहे. दुस-या दालनात भगवान बुद्धाची मूर्ती आणि काही बौद्ध शिल्प आहेत. त्या काळातील शिल्पकलेचे काही अप्रतिम नमुने आजही सातव्या क्रमांकाच्या लेणीत पाहायला मिळतात.

गाभा-यात भगवान बुद्धाची मूर्ती आहे. मूर्तीच्या एका बाजूला नर्तकीचा एक अलौकिक शिल्पपट आहे. हा शिल्पपट शिल्पकलेच्या इतिहासातील एक मानबिंदू समजला जातो. यात नृत्यात तल्लीन झालेली नर्तिका आणि वाद्यवृंदासह साथ देणारी तरुणी कोरलेली आढळते. हा शिल्पपट अंधारात असून, प्रकाश परावर्तीत करणारे बोर्ड सर्वत्र लावण्यात आले आहेत. त्यामुळेच शिल्प पाहता येतात. गाभा-यातील प्रवेशद्वारावर पद्मपाणी अवलोकितेश्वर यांची उभी मूर्ती असून त्यांच्या दोन्ही बाजूला महाभयाचे अष्ट प्रसंग कोरलेले आहेत.

डावीकडील दालनात ध्यानस्थ गौतम बुद्धांचे शिल्प कोरलेले आहे. ही लेणी वेरूळच्या रामेश्वर लेणीशी मिळतीजुळती असल्याचं सांगितलं जातं. पुढे व्हरांडा असून मागील भिंतीत गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत भिक्षूंच्या खोल्या आहेत. क्रमांक नऊची लेणी ही सर्वात भव्य लेणी आहे. यात भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणाचे विशाल शिल्प आहे. हे शिल्प अर्धवट आणि जीर्ण अवस्थेत आहे. लेणीतील काही मूर्तीच्या डोक्यावरील नागफणीचे काम अतिशय उत्कृष्ट समजलं जातं. अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेण्यांचा संबंध लावला जातो.

पांडव लेणी

नाशिक जिल्हय़ातील या लेण्या ‘त्रिरश्मी लेण्या’ म्हणून प्रसिद्ध आहेत. पांडव लेणी ही सुमारे इ. स १२००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहे. भारत सरकारने या लेणीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिलं आहे, असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो. यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्र अतिशय कलाकुसरींनी कोरलेली आढळतात.

या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे. काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येतं. या लेण्या पाहण्यासाठी फी आकारली जाते. या टेकडीवर पाण्याची टाकं आहेत. या टेकडीवर वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे. या लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसतं. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. या लेण्यांवर जाण्यासाठी पाय-यांची वाट असून वर जाण्यासाठी सुमारे तीस मिनिटं वेळ लागतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version