Home क्रीडा ‘बाउन्सर’ आदळून क्रिकेटपटू कोमात

‘बाउन्सर’ आदळून क्रिकेटपटू कोमात

0

ऑस्ट्रेलियात शेफील्ड शील्ड स्पर्धेदरम्यान मंगळवारी दक्षिण ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजेस डोक्याला बाऊंसर चेंडू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.

सिडनी – ऑस्ट्रेलियात शेफील्ड शील्ड स्पर्धेदरम्यान मंगळवारी दक्षिण ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजेस डोक्याला बाऊंसर चेंडू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. फिलला सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

फिलवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुढचे २४ ते ४८ तास फिलसाठी महत्वाचे आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यूसाऊथ वेल्समध्ये सामना सुरु असताना, सीन अबॉटच्या उसळत्या चेंडूवर फिलचा अंदाज चुकला आणि चेंडू फिलच्या डोक्यावर आदळला.

फिलने यावेळी हेल्मेट घातले होते. हा चेंडू इतक्या वेगात आदळला की, फील काही क्षणात मैदानावर कोसळला. अन्य खेळाडूंनी फिलला शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र फिलकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्याला मैदानातूनच स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने फिलवर शस्त्रक्रिया केली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क अनफीट असल्यामुळे फिलची भारता विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड होण्याची शक्यता होती. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी फिल ६३ धावांवर खेळत होता.

फिलच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी या क्षणाला आमच्या प्रार्थना फिलसोबत आहेत असे दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार मायकल क्लार्क फिलच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी लगेचच रुग्णालयात पोहोचला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version