Home क्रीडा ऑलिंपियाडमधील यश अभिमानास्पद

ऑलिंपियाडमधील यश अभिमानास्पद

0

भारताचे ग्रँडमास्टर प्रशिक्षक आर. बी. रमेश यांच्यासाठी गेल्या महिन्यात प्रशिक्षक म्हणून दोन संस्मरणीय घटना घडल्या.

प्रशिक्षक रमेश यांच्यामुळे अरविंद गेल्यावर्षी सुसान पोल्गर यांना चेन्नई येथे भेटू शकला.

मुंबई- भारताचे ग्रँडमास्टर प्रशिक्षक आर. बी. रमेश यांच्यासाठी गेल्या महिन्यात प्रशिक्षक म्हणून दोन संस्मरणीय घटना घडल्या. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला गेल्या महिन्यात ट्रॉम्सो (नॉर्वे) येथील बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक मिळाले. त्याच वेळी रमेश यांचा विद्यार्थी अरविंद चिदंबरम १५व्या वर्षी ग्रॅँडमास्टर बनला. प्रशिक्षक म्हणून या दोन्ही घटना अभिमानास्पद आहेत, असे रमेश यांनी ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत काढले. रमेश यांनी बुद्धिबळात त्यांची कारकीर्द गाजवली असली तरी ते जास्त प्रकाशझोतात आले ते आनंद-कार्लसन यांच्यात गेल्या वर्षी चेन्नई येथे झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत. त्यावेळी ग्रॅँडमास्टर सुसान पोल्गर यांच्यासह अधिकृत समालोचकांमध्ये रमेश यांचा समावेश होता.

बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये आतापर्यंत भारताच्या पुरुष संघाला एकदाही पदक जिंकता आले नव्हते. मात्र यंदा ती उणीव दूर झाली. त्यासाठी भरपूर मेहनत घेतल्याचे रमेश यांनी सांगितले. ‘‘बुद्धिबळ ऑलिंपियाडपूर्वी इराणमध्ये जवळपास एक महिना आम्ही आशिया नेशन्स कपमध्ये खेळलो. तेथे मला भारताच्या संघाचा एकप्रकारे अंदाज आहे. बुद्धिबळपटूंची खेळण्याची पद्धत, बोर्डवरील रणनीती ठरवण्याचे कौशल्य, ओपनिंगबाबतचा विचार आदी गोष्टी त्या स्पर्धेतून समजल्या. त्याचा ऑलिंपियाडच्या तयारीसाठी उपयोग झाला. त्यातच शशीकिरण आणि परिमार्जन नेगी हे यापूर्वीही ऑलिंपियाडमध्ये खेळले होते. सेथूरामन, अधिबान आणि ललिथ बाबूपेक्षा त्यांचा अनुभव निश्चित जास्त होता. ते पाहता ऑलिंपियाडचा संघ अनुभवी आणि युवा यांचा भरणा असलेला होता. आता या पाचही युवा बुद्धिबळपटूंसाठी उज्ज्वल भविष्य आहे. भारतीय बुद्धिबळ ही मंडळी गाजवतील, यात शंका नाही. त्यातच ऑलिंपियाडमध्ये यंदा सहभागी झालेले १७० देश हा कोणत्याही खेळातील स्पर्धेतला मोठा आकडा ठरेल. त्यावरूनच खेळातील चुरस आणि दर्जा दिसतो. त्यातच भारताचे रॅँकिंग १९वे होते. त्यास्थितीत प्रशिक्षक म्हणून भारताने ऐतिहासिक पदक जिंकणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण म्हणावा लागेल. भारतापेक्षा जास्त सीडिंग असलेल्या रशियालादेखील आमच्यापाठोपाठ चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. बुद्धिबळात भारत किती झपाटय़ाने प्रगती करत आहे, हे यातून दिसते,’’ याकडे रमेश यांनी लक्ष वेधले.

‘चेस गुरुकुल’चे मोठे योगदान

ग्रॅँडमास्टर रमेश यांनी त्यांची महिला ग्रॅँडमास्टर असलेली पत्नीच आरती रामास्वामीच्या सहकार्याने काही वर्षापूर्वी ‘चेस गुरुकुल’ची स्थापना केली. तेव्हापासून जागतिक युवा, आशिया युवा, राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा यामध्ये चमकणारे विविध ग्रॅँडमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टर, राष्ट्रीय विजेते, राज्य विजेते आदी बुद्धिबळपटू रमेश यांच्या अ‍ॅकॅडमीने घडवले होते. माझी पत्नी आरतीचे मोठे योगदान आहे. भविष्यात आमचे बुद्धिबळपटू भारताच्या सिनियर संघात वर्चस्व गाजवतील याची खात्री आहे. माझ्याकडून बुद्धिबळपटू म्हणून खेळताना झालेल्या चुका माझ्या विद्यार्थ्यांनी करू नयेत, ही प्रशिक्षक म्हणून माझी मुख्य अपेक्षा आहे,’’ असे रमेश म्हणतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version