Home टॉप स्टोरी ‘लोकपाल’वर मोहर

‘लोकपाल’वर मोहर

0

गेल्या साडेचार दशकांमध्ये आठ वेळा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर भ्रष्टाचारमुक्तीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे बहुचर्चित लोकपाल व लोकायुक्त विधेयक अखेर बुधवारी आवाजी मतदानाने लोकसभेत मंजूर करण्यात आले. 

नवी दिल्ली/राळेगणसिद्धी – गेल्या साडेचार दशकांमध्ये आठ वेळा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर भ्रष्टाचारमुक्तीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे बहुचर्चित लोकपाल व लोकायुक्त विधेयक अखेर बुधवारी आवाजी मतदानाने लोकसभेत मंजूर करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशातील एक उत्तुंग नेते यशवंतराव चव्हाण यांनी १९६८मध्ये लोकपाल विधेयक संसदेत प्रथम मांडले होते.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. तर समाजवादी पक्ष व शिवसेनेच्या सदस्यांनी या विधेयकाला विरोध करत सभात्याग केला. हे विधेयक धोकादायक असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी सांगितले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला भ्रष्टाचारविरोधी विधेयकांशी निगडित आणखी सहा विधेयकांना मंजुरी मिळवायची आहे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान केली.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी केवळ लोकपाल विधेयक पुरेसे नाही. आपल्याला सर्वसमावेशक लढय़ाचा आराखडा हवा असून यूपीए सरकारने तो आखला असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वसमावेशक आराखडय़ातील एक लोकपाल विधेयक आहे. या यादीतील माहितीचा अधिकार हा केंद्र सरकारचा पहिला कायदा होता. मात्र भ्रष्टाचारविरोधातील आणखी कायदे प्रलंबित असल्याचे राहुल म्हणाले.

अण्णांनी सोडले उपोषण

लोकसभेत लोकपाल विधेयकाला मान्यता मिळाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू केलेले उपोषण राळेगणसिद्धी येथे फळांचा रस घेऊन सोडले. समाजवादी पक्षाला वगळता या विधेयकाला पाठिंबा देणा-या सर्व पक्षांचे अण्णांनी आभार मानले. मात्र या विधेयकाला ‘जोकपाल’ म्हणून संबोधणा-या आम आदमी पक्षावर त्यांनी टीका केली. लोकपाल विधेयक संमत झाल्यानंतर राळेगणसिद्धीमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा अण्णा यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान, सोनिया गांधी यांनी केले स्वागत

भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त करत याचे स्वागत केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version