Home कोलाज एकनिष्ठता आणि मालकीहक्क

एकनिष्ठता आणि मालकीहक्क

0

एखादी व्यक्ती आवडत असते तेव्हा तिचा विचार मनात आला की आपल्याला अधिक ताजेतवाने वाटते, असं वर्णन अनेक जण करतात. आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून प्रेरणा मिळते म्हणजे काय? थोडक्यात त्या व्यक्तीचा विचार मनात आला की तुम्हाला ऊर्जा मिळते.

एखादी व्यक्ती आवडत असते तेव्हा तिचा विचार मनात आला की आपल्याला अधिक ताजेतवाने वाटते, असं वर्णन अनेक जण करतात.

आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून प्रेरणा मिळते म्हणजे काय? थोडक्यात त्या व्यक्तीचा विचार मनात आला की तुम्हाला ऊर्जा मिळते.

मनातले निराशेचे विचार जातात, तुम्ही जोमाने प्रयत्न करता, अडचणींवर मात करता. प्रेरणा मिळते, इन्स्पिरेशन मिळतं. सर्वच व्यक्ती आपल्या होऊ शकत नाहीत. हे आपल्याला माहिती असते.

तसेच आपल्या जवळच्या अनेक व्यक्ती आपल्याला प्रेरणादायी वाटत नाहीत, हे सुद्धा असतेच. पण काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि प्रेरणादायी ठरतात.

त्याच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत, अशी भावना जेव्हा दोन्ही बाजूने असते तेव्हा त्याला दोघेही प्रेमात बुडले आहेत, असं म्हणतात.

कालांतराने हीच आपली झालेली, प्रेमात होतो ती व्यक्ती तेवढी प्रेरणादायी वा आवश्यक वाटत नाही, ही वस्तुस्थिती असते. अशा वेळी नातं बंधन वाटतं. ते अपुरं वाटतं. जोडीदाराशिवाय इतर व्यक्ती ऊर्जेचा स्त्रोत ठरणे म्हणजे एकनिष्ठता नाही, असं तुमच्या मनात येतं का?

आपलं प्रेम जिच्यावर असतं ती व्यक्ती फक्त आपलीच असावी, असं अनेकांना वाटतं. साहित्यातून वा सिनेमातून त्या ‘सिर्फ मेरा वा सिर्फ मेरी’ असण्याचं फार कौतुक होतं.

कोणतीही प्रतारणा न करणारी व्यक्तीसुद्धा अशी फक्त आपली असते का? आपल्या जोडीदाराच्या वा प्रियाच्या सर्वच गरजा फक्त आपणच पूर्ण करू शकतो का? त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे.

ऑफिसात कुणाचा बॉस, कुणाची असिस्टंट, बाहेर एखाद्या सोसायटीचा चेअरमन, एखाद्या संघटनेचा कार्यकर्ता, समुपदेशन करण्यामधली एक अशा विविध भूमिका जोडीदार घेत असतात.

आई-वडील, सून-जावई वा इतर नातेसंबंध तर आहेतच. कोणत्याही एका वेळेला व्यक्ती विभागलेली असते. त्या व्यक्तीला सहवासात आलेल्या अनेकांकडून नवी दिशा, नव्या कल्पना वा प्रेरणा मिळत असते.

किंबहुना जोडीदारच जन्मभर एकमेकांसाठी सतत प्रेरणादायी ठरतील, असे नाहीच. ते कधी एकमेकांशी स्पर्धाही करतात. कधी अगदी एकमेकांचे विचार विरुद्ध टोकाचे असतात.

दोन वेगळ्या व्यक्ती एकत्र नांदत असल्यामुळे त्यात भिन्नता आली. त्यांच्या गरजा वा अपेक्षा फक्त तेच पूर्ण करू शकणार नाहीत, हे वास्तवही आले. हे वास्तव नाकारणं सोपं असतं. ते स्वीकारायला जास्त कष्ट, जास्त तडजोड लागते.

ही तडजोड करायची आहे, याची जाणीव आपल्याला करून दिली जात नाही, जाणीव असेल तरी त्याप्रमाणे वागणं आपल्याला आवडत नाही. अशी अनेक कारणं असतात. त्यामुळे या ‘सिर्फ’ माझ्यामध्ये फक्त शरीरानं एकनिष्ठ राहणंच शक्य होऊ शकतं.

ज्या कामात व्यक्ती गढली आहे त्याचा व त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींचा विचार आपण करतोच. मनाच्या निष्ठासुद्धा विभागल्या जाऊ शकतात. मग राहिलं शरीर. त्या शरीराकरता हा असतो मालकीहक्क!

प्रेमापेक्षा या मालकीहक्कात सत्तेची भावना असते वा असुरक्षिततेची, असं दिसतं. म्हणूनच एखाद्या माणसावर असा मालकीहक्क असावा, असं वाटणं ही निकोप भावना वाटत नाही.

त्या व्यक्तीने आपल्याशी एकनिष्ठ असावं, हे मी समजू शकते; पण त्याशिवाय तिला दुसरे जग नसावे, ही भावना मी समजू शकत नाही. आजच्या वेगवान काळात स्त्रीपुरुष विविध ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या सहवासात येतात. त्यामुळे जोडीदार एकनिष्ठ राहील का, असा संशय मनात येऊ शकतो.

पण मालकीहक्क पूर्णपणे नसतो. त्यामुळे जी व्यक्ती आपली नाही ती हरवण्याची वा आपण तिला गमवण्याची शक्यता कशी असेल? हे लक्षात घ्यायला हवे. आपली प्रिय व्यक्ती मुळातच अनेक व्यक्तींनी वाटून घेतलेली असते, या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे नात्यात अनेकदा गरसमज निर्माण होतात.

समजा तुम्हाला एखादी मुलगी वा मुलगा खूप आवडतो. त्या व्यक्तींनं तुमची आठवण काढावी, तुमच्यावर कुठल्या तरी प्रकारे अवलंबून राहावं, असं सुप्तपणे आपल्या मनात असतं. हे मनात येतं कारण आपलं मन त्या व्यक्तीला हरएकप्रकारे बांधून ठेवायचा प्रयत्न करत असतं. आपल्याविना त्या व्यक्तीला अपूर्ण आहोत, असं वाटावं असंही आपल्या मनात येतं.

थोडा जास्त विचार करून पाहा बरं. तुम्ही नाही म्हणून स्वत:ची अस्तित्व मान्य न करणारी, कोलमडून पडणारी, शोकाकूल होणारी व्यक्ती तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती म्हणून आवडेल का? उलट हिमतीनं परिस्थितीचा सामना करणारी व्यक्ती हवी असं त्यावेळी मनात येईल.

म्हणूनच एकदा एखादी व्यक्ती प्रिय झाली, आपली झाली तर त्या व्यक्तीनं आपल्यासाठी वा आपल्यानंतर झुरावं, तिनं डगमगून जावं अशी अपेक्षा चुकीची आहे. किंबहुना त्या व्यक्तीला अधिक सक्षम करण्याकरता तुमचा कल असावा.

प्रेमाची ताकद ही सकारात्मक ऊर्जा असावी..  साहित्यातून आपल्यासमोर आदर्श पती, आदर्श पत्नी, आदर्श सून इत्यादी संकल्पना येतात. त्या ठोकळेबाज आणि टोकाच्या असतात असं मला वाटतं.

आपल्या आदर्शवादाच्या संकल्पना या सर्वसमावेशक करता आल्या तर जास्त चांगल्या होतील. जिथे दोघेही कमावते आहेत, तिथं सून-मुलगा या दोघांनी दोन्ही घरची जबाबदारी वाटून घ्यावी, अशी अपेक्षा रास्त.

हमरीतुमरीवर न येता एकमेकांना सांभाळून घेणं अधिक योग्य. या संशयाच्या वातावरणापेक्षा, गरसमजाच्या चिखलापेक्षा मोकळा संवाद आणि व्यक्तीविषयी मत्सर नसणे हे नात्याला बळकट करणारे आहे.

जोडीदाराने शरीराने एकनिष्ठ राहणे हा विश्वासाचा भाग. तो कायम राहील, असे प्रयत्न करा. विश्वासाला तडा न जाऊ देणे हे दोघांचेही कर्तव्य. पण बळकट करणारा ऊर्जेचा प्रेरणेचा स्त्रोत कुणीही असू शकतं, हे मान्य आहे ना?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version