Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती एकता प्रेमभाव जपणारा गोपाळकाला

एकता प्रेमभाव जपणारा गोपाळकाला

0

आपल्या आयुष्यात सणवारांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. सणवार साजरे करण्यामागचं खरं कारण जरी आपल्याला माहीत नसेल तरी ही आपण ते अगदी उत्साहात साजरे करतो. नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधनानंतर श्रावणात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, गोपाळकाला का करायचा या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न..

पुराणकाळात पृथ्वीवर असुरांचं राज्य होतं. हे असुर क्षत्रिय कुळातले असून देखील ते पृथ्वीवर स्वामित्व करू पाहत होते. पृथ्वीवर असुरांच्या राज्यात अन्याय, अत्याचार वाढत होता. असुरांना धडा शिकवण्यासाठी भूमी देवतेनं गाईचे रूप धारण केलं व ती ब्रह्मदेवांकडे गेली. गाईच्या रूपात असलेली भूमी देवता ब्रह्मदेवासमोर रडत होती.

अंर्तध्यानात बसून ब्रह्मदेवांनी तिच्या त्रासाचं व रडण्याचं कारण जाणलं. त्यावेळी ब्रह्मदेव भूमीदेवीला सोबत घेऊन श्रीविष्णूकडे निघाले यावेळी श्री शंकर ही ब्रह्मदेवांसोबत क्षीरसागराकडे निघाले. तसंच श्रीविष्णूच्या निवासस्थानी क्षीर म्हणजे दुधाचा समुद्र होता. या समुद्राच्या काठावर देव वर्षानुर्वष तिष्ठत उभे राहायचे, पण भूमी देवीची समस्या मोठी असल्यामुळे त्यांना क्षीरसागरात तात्काळ प्रवेश मिळाला.

ब्रह्मदेवांनी समस्याकथन केल्यानंतर श्रीविष्णूंनी स्मितहास्य केलं व म्हणाले, ‘लवकरच असुरांचं राज्य मोडीत निघणार आहे. आता माझा हा आठवा अवतार धरतीवर अवतरणार आहे.’ श्रीविष्णूंनी ब्रह्मदेवाला आदेश दिले की, ‘आता मी यदुकुळात जन्म घेणार आहे तरी सर्व देवतांनी मला साहाय्यभूत व्हावं व आपण ही इतर कुळांत जन्म घेऊन त्या-त्या कुळांचा उद्धार करावा.’

।। अनंत ब्रह्मांडे उदरी।
हरि हा बालक नंदाघरी।।
।। नवल केव्हडे केव्हडे।
न कळे कान्होबाचे कोडे।।
।। पृथ्वी जेणे तृप्ती केली।
त्यासी यशोदा भोजन घाली।।
।। विश्वव्यापक कमळापती।
त्यासी गौळणी कडिये घेती।।
।। तुका म्हणे नटधारी।
भोग भोगून ब्रम्हचारी।।

श्रीकृष्ण जन्म वेळ व दिवस :

देवांना काहीही कळू न देता भगवंतानी देवकीच्या गर्भात प्रवेश केला आणि त्यानंतर श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रातल्या मध्यरात्री (बुधवारी) गोकुळात कृष्ण जन्म झाला. खालील गवळणीत यांचा स्पष्ट उल्लेख आहे.

।। गोकुळी आनंद झाला।
रामकृष्ण घरा आला।।
।। श्रावण वद्य अष्टमीसी।
रोहिणी नक्षत्र त्यादिवशी।।
।। बुधवार परियेसी।
देवाची मूर्ती हो प्रकटली।।

श्रीकृष्ण जन्म तर झाला पण याच्यामागे कारण काय, देवकीच्या उदरी जन्म घेऊन कृष्ण यशोदेला ‘आई’ का म्हणत होते, गोपगडयांसह त्यांनी दहीकाला, रासक्रिडा आणि चेंडूफळी असे खेळ का खेळले आणि स्वत:च्या कंस मामाला का ठार मारलं. याची कारणही तशीच गहन आहेत. देवांनी कोणताही अवतार घेतला की, त्यामागे काहीतरी कारण असतंच, असं सांगणारी ही

तुकोबारायांची पंक्ती-

।। अवतार तुम्हां धराया कारणे।
उद्धराया जनजड जीवन।।

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर असत्य वाढेल आणि सत्य संपुष्टात येईल, तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेईन, असं श्रीकृष्णांनी महाभारतात स्वत: सांगितलं आणि त्यामुळेच भगवंतांना यदुकुळात जन्म घ्यावा लागला.

देवकीचा विवाह आणि श्रीकृष्ण जन्म : (संदर्भ : श्रीकृष्ण पूर्ण परमात्मा भगवान)

देवकीचे पिता यांनी देवकीचा विवाह वसुदेवाशी केला. देवकीचं लग्न झाल्यावर तिच्या लग्नाची रथयात्रा काढण्यात आली होती. ज्या रथात देवकी वसुदेव बसले होते, त्या रथाचा सारथी कंस होता. हा कंस म्हणजे देवकीचा भाऊ.

रथयात्रा सुरू असताना कंसाच्या नावाची आकाशवाणी झाली. या आकाशवाणीमुळे कंस अगदी अस्वस्थ झाला आणि त्याने देवकीचे केस ओढले. हा सगळा प्रसंग पाहून वसुदेव घाबरले. प्रसंग कळताच देवकीच्या वडिलांनी कंसाला दरबारात बोलावले आणि जाब विचारला. यानंतर कंसाचा राग अनावर झाला आणि आकाशवाणी झाल्याची भीती त्याला सदैव सतावत होती. या भीतीचा समूळ नाश करायचा असेल तर देवकीला बंदिवासात ठेवावेच लागेल, असा कंसानं विचार केला आणि ठरल्याप्रमाणे देवकीला बंदिवासात ठेवलं.

देवकी-वसुदेवाला पहिला पुत्र बंदीशाळेत झाला. ही वार्ता कंसाला कळली देवकीचा पुत्र म्हणजे त्याचं मरणचं, हे कंसाला माहीत होतं म्हणून त्याने वेळ न दवडता बंदीशाळा गाठली आणि देवकीच्या पुत्राचा दगडावर आपटून जीव घेतला. देवकी कंसासमोर गयावया करत होती. पण कंसाने तिचं काही ऐकलं नाही.

देवकी म्हणाली, ‘कंसा, अरे तुला माझा आठवा पुत्र मारणार आहे. मग या निरागस बालका तू का मारलंस?’ यावर कंस म्हणाला, ‘पुत्र पहिला होता की, आठवा हे मला माहीत नाही, तुझ्या आठव्या मुलाला तर मारायचं आहेच. त्यामुळे मी तुझ्या आठही बालकांचा वध करणार आहे’, असं कंसाने देवकीला सांगितलं. आता मात्र देवकी नवीन गर्भ धारण करायला घाबरत होती. पण पुन्हा तिची कुस उजवली आणि यावेळेस ही कंसाने तिच्या चिमुकल्याचा प्राण घेतला.

सात गर्भ झाले प्रत्येक गर्भाच्या वेळी कंसाने तिच्या पुत्रांचा व कन्यांचा वध केला, पण आता आठवा गर्भ धारण झाला आणि कंसाची चिंता वाढली. कसेबसे ९ महिने गेले आणि कृष्णावतार धरतीवर होणार आहे, असे देवकीला कळले. गर्भधारणेत असताना देवकीला पर्वत उचलावे, खेळ खेळावे असे डोहाळे लागले. कृष्ण जन्मा अगोदर एक आकाशवाणी झाली.

‘देवकी-वसुदेव हे तुम्ही लक्षात ठेवा की, कंसाने किती ही वाचण्याचा प्रयत्न केला तरी तो आता वाचणार नाही. कारण मी त्याला मारण्यासाठीच जन्म घेतोय. वसुदेवा, माझा जन्म या बंदीशाळेत होईल, पण लालन पालन गोकुळात नंद-यशोदेच्या घरी होईल. माझा जन्म झाला की, तू मला गोकुळात नेशील आणि गोकुळात नंदा-यशोदेच्या घरी सोडशील आणि माझ्या जन्माच्या वेळेस गोकुळात यशोदेला कन्या रत्न होईल. तू मला यशोदेच्या कुशीत ठेऊन तिची कन्या बंदीशाळेत आण. आता फार कमी अवधी राहिला आहे. कारण येणा-या वद्य अष्टमीस मध्यरात्री मी देवकीचा गर्भ सोडून पृथ्वीवर येणार आहे.

वसुदेवाने ठरल्याप्रमाणे भगवंतास गोकुळात नेले आणि यशोदेची कन्या बंदीशाळेत आणली. पण हे सगळं करताना वसुदेवाला भगवंताची मिठी सोडवत नव्हती. अश्रूने पाणवलेले डोळे एकटक बाळाकडे पाहत होते. ते बाळ इतकं तेजस्वी होतं की, त्याचं तेज त्रिभुवनात मावत नव्हतं. पण जन्मलेल्या बालकाला यशोदेच्या घरी सोडून येणं, हे देवकी-वसुदेवाला जमणारं नव्हतं. पण जर आठवा पुत्र कंसाने मारला तर आपल्या पुत्राला आपण वाचवू शकलो नाही, अशी सल मनात राहण्यापेक्षा यशोदेकडे आपला पुत्र सोपवावा असं दोघांनी ठरवलं आणि वसुदेवाने आपला पुत्र यशोदेच्या कुशीत सोडला. याचं वर्णन करणारी ही गवळण..

।। सोडा सोडा सोडा मिठी।
लपवा लपवा तो जगजेठी।।
।। वसुदेवा चिंता मनी।
तेज न समाये त्रिभुवनी।। सोडा मिठी।।
।। झणी कंसाला कळेल।
माझ्या बाळाला मारेल।। सोडा मिठी।।

या गवळणीतून देवकी-वसुदेवाला तिच्या तान्हुल्याची मिठी सोडायला सांगते, कारण तिला त्या आठव्या पुत्राचा जीव वाचवायचा आहे.

देवकीच्याच पोटी कृष्ण का?

देवकीचा विवाह झाल्यानंतर उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपल्याच बहिणीला बंदिवासात ठेवले आणि तिच्या सर्व पुत्रांना मारले. पुत्रवियोगामुळे देवकी हिरमुसली होती. तिच्या चेहे-यावरचं तेज हरवलं होतं. जेव्हा भगवंतानी तिच्या गर्भात प्रवेश केला, तेव्हा तिच्या चेहे-यावर एक दिव्य तेज दिसू लागलं. कंसाला याचं भय वाटू लागलं. गर्भात असताना देवकीने भगवंतास विचारलं की, ‘भगवंता तू माझ्या पोटी का जन्म घेतो आहेस.’ यावर भगवंतानी तिला सांगितलं, ‘माते गेल्या तीन युगापासूनच मी तुझा पुत्र आहे.

काही हजार वर्षापूर्वी तुम्ही दोघं ‘सुतपा आणि पृश्नी’ म्हणून जन्म घेतला होता. ब्रह्मदेवांनी तुम्हाला प्रजनन करायला सांगितले. तेव्हा तुम्ही विषयसुखाला वाव न देता माझ्या भक्तीचा मार्ग स्वीकारलात आणि तपश्चर्येला सुरुवात केलीत.

तपश्चर्येदरम्यान तुम्ही ऊन, वादळ, पाऊस याचा जराही विचार केला नाही आणि या तपश्चर्येदरम्यान तुम्ही फक्त जमिनीवर पडलेली वृक्षाची पानं खाल्लीत आणि मला प्रसन्न करून घेतलेत. किमान बारा हजार वर्षानी मी तुम्हाला प्रसन्न झालो आणि तेव्हा तुम्ही माझ्याकडे ‘आमच्या पोटी जन्मला ये’, असा वर मागितला होता.

खरंतर तुम्ही संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी मला प्रसन्न करत असाल, असं मला वाटलं. पण तुम्ही तुमच्या उदरी जन्माला ये, असं सांगितलं आणि त्यामुळे मला हा जन्म घ्यावा लागत आहे. गेल्या दोन युगांमध्येही मी तुमचाच पुत्र होतो. तुम्ही जेव्हा सुतपा आणि पृश्नी होता, तेव्हा मी ‘पृश्नीगर्भ’ म्हणून जन्माला आलो आणि दुस-या युगात तुम्ही ‘आदिती आणि कश्यप’ होता, तेव्हा मी ‘उपेंद्र’ म्हणून जन्माला आलो आणि आता तुम्ही ‘वसुदेव-देवकी’ आहात, म्हणून मी ‘कृष्ण’ म्हणून जन्माला येणार आहे.

‘गोवर्धन गिरधारी’

कृष्ण लहान असताना एकदा गावकरी नंद महाराजाकडे आले आणि म्हणाले, ‘नंद महाराज, यावेळी पाऊस पडण्याची चिन्ह दिसत नाहीत. बहुतेक आपल्याला वरुणदेवतेचा यज्ञ करावा लागणार.’ ही वार्ता लहान कान्हाच्या कानी पडली असता त्यांनी नंदराजास सांगितले की, ‘पिताश्री आपण तर गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे, कारण आपली गाय-वासरं गोवर्धन पर्वताच्या कुशीतला चारा खातात आणि गोवर्धन पर्वतामुळे आपल्याला लाकूडफाटाही मिळतो.

खरंतर गोवर्धन आपला पालक आहे. वरुणदेवतेचं काम पर्जन्यवृष्टी करणं आहे आणि त्यानं ते केले पाहिजे, उगाचच वृक्षाची आहुती देऊन यज्ञ करण्यापेक्षा गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. जर वृक्ष नसतील तर पाऊस येणार कुठून आणि जर गोवर्धन नसेल तर त्यांची वृक्ष ही नसतील आणि त्यामुळे आपल्यावर दुष्काळाची परिस्थिती आली असती. खरं तर गोवर्धन हाच आपला खरा पालक आहे. पूजा करायची असेल तर गोवर्धनाची करा.’ असं कृष्णाने सांगितलं यावर नंद महाराजांना व गावक-यांनाही ते पटलं आणि वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी आलेले लोक गोवर्धनाकडे निघाले.

वरुण देवतेला याचा क्रोध आला, त्यांनी इंद्र दरबार गाठला. मग इंद्रांनी त्याला सांगितलं की, गोकुळात सर्वत्र पूर आण लोकांना राहायला सुद्धा जागा ठेवू नको. इंद्राच्या सांगण्याप्रमाणे वरुणदेवतेने अतिवृष्टी केली आणि मग गोकुळवासीयांना वाटलं, हा वरुण देवतेचा कोप आहे. त्यामुळे ते सर्व नंदाच्या घरी गेले.

सर्व लोक बेघर झालेले पाहून कृष्णाने त्यांना गोवर्धनाकडे जायला सांगितले, भरपावसात लोक गोवर्धनाकडे गेली. मग कृष्णाने करंगळीवर गोवर्धन उचलला आणि सर्व लोकांना त्याखाली उभे राहण्यास सांगितले शेवटी वरुणदेवतेला त्यांची चूक कळली आणि त्यांनी भगवंताची क्षमा मागितली. या प्रसंगातून कृष्ण भगवंतानी सांगितलं की, ‘देवतेला प्रसन्न करण्यासाठी वृक्षाची आहुती देण्यापेक्षा वृक्ष लावा आणि जगवा. मग कोणत्याही देवतेकडे हात पसरण्याची गरज लागणार नाही’, असा सगळा संदेश देण्यासाठीच भगवंतानी गोवर्धन उचलला असावा.

तुकाराम महाराजांनी या क्षणाचं वर्णन काही असं केलं आहे.

।। वेडावली काय करावे या काळी।
म्हणे वनमाळी गोपाळासी।।
।। गोवर्धन धरु शिरी उचलुनी।
म्हणे तुम्ही कोणी भिऊ नका।।

गोकुळात जेव्हा पूर आला होता, तेव्हा तुकाराम महाराजांनी या क्षणाचं वर्णन असं केलं आहे.

।। गोकुळीची गती कोण झाली परी।
पाहो आला वरी इंद्रराव।।
।। इंद्रापाशी मेघ बोलती बडिवार।
सकळ संहार करुनी आलो।।
।। आतां जीव नाही सांगाया त्या रानी।
पुरिलें पाषाणी शिळाधारी।।
।। रिता कोठें नाही उरो दिला ठाव।
जल्पती तो भाव न कळता।।

कृष्णलीला :

श्रीकृष्ण हे परमात्मा यशोदेच्या घरी राहत होते. तेव्हा त्यांनी अनेक लीला केल्या या लीला करण्यामागे त्याचा काहीतरी हेतु नक्कीच असावा. कारण त्यांनी रासलीला सुरू केली, मग चोरी करायला सुरुवात केली, मग बाजाराला दूध, दही, लोणी घेऊन जाणा-या गौळणींचे माठ फोडले. पण गौळणीही हुशार झाल्या, त्या कृष्णाचा कावा ओळखून, मडक्यातलं लोणी, दही कृष्णाला देईनात. मग त्याने दूध-दही कसं मिळवायचं, यासाठी कृष्णाने घरातच शिंक्यावर टांगलेलं दह्या-लोण्याचं मडकं काढून खाण्यासाठी दंहीहंडी करायला ही सुरुवात केली. तेव्हापासूनच दहीहंडीला सुरुवात झाली, असं मानलं जातं.

रासलीला करण्यामागचे कारण :

जेव्हा श्रीकृष्ण आपला मंजुळ पावा वाजवायचे, त्यावेळी गौळणीची शुद्ध हरवायची आणि त्या आपली कामं सोडून कृष्णाच्या बासरीच्या आवाजाकडे आकर्षित व्हायच्या आणि आपलं देहभान विसरून कृष्णासभोवती सा-या गौळणी फेर धरायच्या, गाणी गायच्या आणि विविध क्रीडा करायच्या, हे सारं वर्णन करणारी ही गवळण

।। तुझ्या मुरलीचा ध्वनी।
आकल्पित पडता कानी।।
।। विव्हळ झाले अंतकरणी।
घरधंदा मी विसरले ।।
।। आहा रे सावळीया।
कान्हा ने कैसी वाजवली मुरली।।
।। तुझ्या मुरलीचा सुरतान।
मी विसरले देहभान।।
।। संसार केला दानादान।
येऊनी हृदयी संचरली।।

या गवळणीतून आपल्याला कळलंच असेल की, कशाप्रकारे गवळणी वेडय़ा होऊन कृष्ण सहवासात रमायच्या आणि कशाप्रकारे भगवंत त्यांच्याबरोबर क्रीडा करायचे!

दहीकाला करण्यामागचं कारण :

गोकुळात दहीकाल्याची सुरुवात कृष्णाने केली कारण, गोकुळात दही, दूध, लोणी, तूप असे पदार्थ सगळ्यांच्या घरी असायचेच. पण कधी गोपाळांना ते मनोसोक्त खायला मिळालेच नाही आणि यामुळे कृष्ण-सवंगडयांनी काला करायचं ठरवलं, पण यासाठी पदार्थ कुठून आणायचे, हा प्रश्न होता. तेव्हा आपल्याच घरात आपण चोरी करायची, असं सा-यांनी ठरवलं आणि मग भगवंतानी त्यांना आपल्या मागे येण्यास सांगितलं, याचं वर्णन करणारी ही गवळण

।। याल तरी या रे लागे।
अवघे माझ्या मागे मागे।।
।। आजी देतो पोटभरी।
पुरे म्हणाल तोवरी।।
।। हळूहळू चाला।
कोणी कोणासी न बोला।।

ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ हळूहळू भगवंताच्या मागे गेले आणि मग कोणाचं शिकं, तर कोणाचं मडकं फोडून त्यांनी दह्या-दुधावर ताव मारला आणि शिदोरी घेऊन रानात आले आणि एकमेकांचे पदार्थ मिसळून काला तयार केला. या काल्यामुळे देवाना त्यांची क्षुधा आवरता आली नाही. मग देवही पृथ्वीवर अवतरले.

।। आजी ओस अमरावती।
काला पहावया येती।।

भगवंतानी काला करताना देवांना काल्याचा एकही घास मिळू नये, यासाठी गोपाळांना आपल्या वस्त्राला हात पुसण्यास सांगितले. काल्याचा उष्टा घास तरी खाता यावा, यासाठी देव मासे होऊन सरोवरात गेले, पण त्यांना काला मिळाला नाही.

।। काल्याचिये आसे। देव जळी जाले मासे।।

असा सगळा काला भगवंतानी गोपगडयांसह केला आणि श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी हंडी फोडून जनमानसात एकता राहावी, यासाठी दहीहंडी केली जाते आणि दहीहंडीत सर्वाना चांगलं खायला मिळावं आणि एकमेकांत प्रेमभाव वाढावा, यासाठी भगवंतानी दहीहंडी सुरू केली असावी..

दहीहंडीचं बदलतं स्वरूप

दहीहंडी हा गोकुळात सुरू झालेला खेळ. आज विशेषत: मुंबईत अतिशय उत्साहात केला जातो. पण आजकाल मोठमोठय़ा बक्षीसामुळे खेळाची स्पर्धा झाली आहे आणि दहीहंडीचा उद्देश बाजूला ठेवून फक्त पैशासाठी हा खेळ खेळला जातो. आजवर फक्त पाच ते सहा थर पाहिले, पण गेल्या काही वर्षापासून आठ-नऊ-दहा असे गगनाला भिडणारे थरही पाहायला मिळतात. कारण दहीहंडी का करायची, यामागचा उद्देश आपल्याला माहीत नाही आणि आपण उत्सव साजरे करतो.

काही दिवसांनी सरकारच या खेळावर बंदी आणेल, कारण या खेळामुळे सामाजिक एकतेचा भंग होतो आहे आणि फक्त पैशासाठी माणसं तोडली जात आहेत. खरं तर माणसांची एकजूट व्हावं, यासाठी हे सगळे सण असतात, पण माणसांना याचा विसर पडलेला दिसतो आहे. उंच थरावरून पडून आजवर अनेक गोविंदाचे प्राण गेले आहेत, पण अजून किती प्राण गेल्यावर आयोजक व गोविंदा पथकं जागी होणार आहेत, हे देवालाच ठाऊक..!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version