Home विदेश उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्ब चाचणी

उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्ब चाचणी

0

उत्तर कोरियाचा पुन्हा धमाका

नवी दिल्ली- युद्धखोर स्वभावाच्या राज्यकर्त्यांमुळे कायम जगाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर कोरियाकडून रविवारी हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा करण्यात आला. उत्तर कोरियातील सरकारी प्रसारमाध्यमांकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राद्वारे डागता येईल, असा हायड्रोजन बॉम्ब विकसित केल्याचे समजते. तत्पूर्वी आज सकाळी अनेक प्रसारमाध्यमांनी उत्तर कोरियात ६.३ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंप झाल्याचे वृत्त दिले होते. मात्र, हा भूकंप नसून उत्तर कोरियाने सहाव्यांदा केलेल्या अणुचाचणीचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काहीवेळातच उत्तर कोरियाने अधिकृतरित्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याची माहिती दिली. ज्या परिसरात आज सकाळी भूकंपसदृश धक्के जाणवले तेथे उत्तर कोरियाने यापूर्वीही काही अणूचाचण्या केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जपानने उत्तर कोरियाने सहाव्यांदा यशस्वी अणुचाचणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने चाचणी केलेला हायड्रोजन बॉम्बमध्ये अणुबॉम्बपेक्षा शंभर पट संहारक क्षमता आहे. दरम्यान, या भूकंपाच्या काही तासांपूर्वीच उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांची हायड्रोजन बॉम्बसोबतचे छायाचित्र शेअर केले होते. या छायाचित्रात काळा पोशाख परिधान केलेले किम जोंग उन हायड्रोजन बॉम्बचे निरीक्षण करताना दिसत आहेत. ‘केसीएनए’च्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी शास्त्रज्ञांबरोबर अण्वस्त्र संस्थेचा दौरा केला आणि त्यांना काही सूचना केल्या. विशेष म्हणजे हा बॉम्ब क्षेपणास्त्राद्वारे डागता येऊ शकतो. खूप मोठी संहारकशक्ती असलेला हायड्रोजन बॉम्ब उत्तर कोरियाने केलेल्या अथक संशोधन आणि तंत्रज्ञानाचे अविष्कार असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाविरोधात लष्करी कारवाईचे संकेत दिले होते. लष्करी कारवाईच्या पर्यायावर विचार झाला असून तो संवेदनशील मुद्दा आहे. उत्तर कोरियाने नव्याने अण्वस्त्र चाचणी केली, तर त्या देशावर कारवाई होऊ शकते असे अमेरिकेने म्हटले होते. मात्र, अमेरिकेचा दबाव झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. त्यामुळे आता अमेरिका काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version