Home क्रीडा इंग्लंडची घसरगुंडी

इंग्लंडची घसरगुंडी

0

ज्यो रूट, जॉनी बेअस्टरेच्या अर्धशतकांनंतर

बर्मिगहॅम – यजमान कर्णधार ज्यो रूट (८० धावा) आणि जॉनी बेअस्टरे (६५ धावा) त्याच्या संयमी अर्धशतकांच्या जोरावर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडने दमदार सुरुवात केली तरी ऑफस्पिनर अश्विनने (२ बळी) तिस-या सत्रामध्ये भेदक मारा केल्याने त्यांची अवस्था ६ बाद २३७ धावा अशी झाली. रूट आणि बेअस्टरेप्रमाणे कीटन जेनिंग्ज (४२ धावा) याने फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले.

इंग्लंडचा कर्णधार रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑफस्पिनर आर. अश्विन याने अनुभवी सलामीवीर अ‍ॅलिस्टर कुक (१३ धावा) याच्या यष्टय़ा उखडताना भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र रूट याने जेनिंग्ज याच्यासह दुस-या विकेटसाठी ७२ धावा जोडताना संघाला सावरले. या जोडीने तळ ठोकल्यामुळे उपाहाराला यजमानांनी १ बाद ८३ धावा केल्या होत्या. दुस-या सत्रामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने जेनिंग्जला त्रिफळा उडवत भागीदारी संपुष्टात आणली. जेनिंग्ज याने ९८ चेंडूंत ४ चौकारांसह ४२ धावा केल्या.

दुस-या सत्रात भारताला दोन विकेट घेता आल्या तरी रूट याने जॉनी बेअस्टरेसह चौथ्या विकेटसाठी शतकी (१०४ धावा) भागीदारी केली. रूटने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ३ बाद १६३ धावा केल्या होत्या.

स्थिरावलेली कुक आणि बेअस्टरे जोडी आणखी त्रासदायक ठरणार, असे वाटत असतानाच कर्णधार विराट कोहलीच्या अचूक फेकीसमोर रूट धावचीत झाला. यजमान कर्णधाराने १५६ चेंडूंत ९ चौकारांसह ८० धावा केल्या. त्याचे हे ४१वे अर्धशतक आहे.

रूटच्या सर्वात जलद ६ हजार धावा
दमदार अर्धशतक ठोकताना रूट याने कसोटी कारकिर्दीत वेळेच्या तुलनेत सर्वात वेगाने ६ हजार धावा पूर्ण केल्या. अश्विनला चौकार ठोकत त्याने ही मजल मारली. २७ वर्षीय रूट याने १२७ कसोटी डावांमध्ये तसेच पदार्पणापासून पाच वर्षे आणि २३१ दिवसांमध्ये सहा हजारी मजल मारली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version