Home महामुंबई आसलपाडा शाळेचे विद्यार्थी तहानलेले

आसलपाडा शाळेचे विद्यार्थी तहानलेले

0

पटपडताळणीच्या निकषांवरून काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने १००पेक्षा अधिक शाळांची मान्यता रद्द केली. तरी आजही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत.

नेरळ – पटपडताळणीच्या निकषांवरून काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने १००पेक्षा अधिक शाळांची मान्यता रद्द केली. तरी आजही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. आसल ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या आसलपाडा प्राथमिक शाळेतील कूपनलिका व नळांची गेल्या सात-आठ वर्षापासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी शाळेतील विद्यार्थी तहानेने व्याकूळ झाले आहेत.

आसलपाडा प्राथमिक शाळा १९७० मध्ये सुरू करण्यात आली. पहिली ते इयत्ता चौथीपर्यंतच्या या शाळेत लहानग्यांच्या सोयीसुविधांकडे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीकडून शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी कूपनलिका बसवण्यात आली होती. परंतु या कूपनलिकेची दुरवस्था झाल्यामुळे समितीच्या २००५पासून जमिनीतील पंपाद्वारे पाणी खेचले जात नाही. तसेच आसल ग्रामपंचायतीकडून बसवण्यात आलेल्या नळांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पाणी करत राहावे लागते.

आसलपाडा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा जोंधळे यांनी २६ जून २०१३ रोजी कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कूपनलिका दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र अद्याप त्यांच्या पत्राची दखल पंचायत समितीने घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समितीने शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आसलपाडा गावातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. कूपनलिकेच्या दुरुस्तीकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने याविरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील पालकांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीने लक्ष दिले पाहिजे. – सीमा जोंधळे, मुख्याध्यापिका,आसलपाडा प्राथमिक शाळा

आसलपाडा प्राथमिक शाळेतील पिण्याच्या पाण्याची सुविधा तातडीने उपलब्ध केली जाईल.- सुधाकर डंबाये, गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती,कर्जत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version