Home महाराष्ट्र आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्याचे धिंडवडे!

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्याचे धिंडवडे!

0

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवरच टांगली गेली.

कणकवली- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवरच टांगली गेली. राज्यभरात १८०० नवीन वैद्यकीय अधिका-यांची भरती होऊनसुद्धा चार वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्गात येऊ शकले नाहीत. २१२ वैद्यकीय अधिका-यांच्या खातेअंतर्गत बदल्या करूनसुद्धा जिल्ह्याबाहेरील एकही वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्गात दिला गेला नाही.

ज्या देवगड तालुक्याचे सुपुत्र डॉ. दीपक सावंत हे आरोग्यमंत्री आहेत; त्या देवगड तालुक्याची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्याची ही शोकांतिका आहे. उलट आहे त्या स्थितीत सेवा देत असलेल्या डॉक्टरांची अदलाबदल करून मनाविरुद्ध बदल्या करून त्यांना डिस्टर्ब करण्याचे काम आरोग्य यंत्रणा करत आहे.

सिंधुदुर्गात अनेक डॉक्टर्स सेवा देण्यास उत्सुक आहेत, मात्र त्यांच्या इच्छेविरुद्ध अन्य जिल्ह्यांत नेमणुका द्यायच्या आणि ऐच्छिक ठिकाणी जावयाचे असेल तर आर्थिक व्यवहार करायचा, असा अशोभनीय प्रकार आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून घडत आहे.

आरोग्य विभागात भ्रष्टाचार

आरोग्य विभागात होणारा भ्रष्टाचार सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. नुकत्याच १ हजार ८०० वैद्यकीय अधिका-यांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या भरतीचा मागोवा घेतला असता फक्त ४०० डॉक्टर्स राज्यभरात रूजू झालेत. १ हजार २०० डॉक्टर्सनी अद्याप कॉल लेटर स्वीकारलेलेच नाहीत.

भरतीनंतर या डॉक्टरांची ऑनलाईन जाहीर होणारी लिस्ट आणि त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली नियुक्ती फार विसंगत असते. जी व्यक्ती कोकणातील असेल त्याला विदर्भ, मराठवाडयात नियुक्ती आणि खान्देश, मराठवाडयातील व्यक्तीला कोल्हापूर, कोकणात बदली. ही प्रक्रिया मुद्दामहून केली जाते.

ज्यांना रूजू व्हायचे असेल त्यांनी ही नियुक्ती रद्द करण्यासाठी आर्थिक व्यवहार करावा लागतो. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात चालणारा हा भ्रष्टाचार आणि पैसे देऊन पाहिजे तिथे होणारी नियुक्ती यामुळेच डॉक्टर्स सरकारी सेवेत रूजू होत नाही आणि याचे उत्कृष्ट उदाहरण या नव्या भरतीत महाराष्ट्राला पाहावयास मिळाले आहे.

सिंधुदुर्गात डॉक्टरांची भरती कशी करणार?

उपजिल्हा रुग्णालय कणकवली, शिरोडा, सावंतवाडी आणि जिल्हा रुग्णालय ओरोस या ठिकाणी रुग्ण मोठया प्रमाणात असतात. वैभववाडी, देवगड, कट्टा, मालवण, दोडामार्ग, वेंगुर्ले या ठिकाणी शहरी भाग असल्याने नित्याने रुग्ण तपासणीसाठी येत असतात. मोठया रुग्णालयांत दोन नाही तर चार वैद्यकीय अधिकारी सध्या नियुक्त आहेत.

कणकवली, सावंतवाडी या दोन रुग्णालयांत १८ वैद्यकीय अधिका-यांची गरज आहे. देवगड हे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे गाव आहे, मात्र या रुग्णालयात आठ दिवसांच्या फरकाने कोल्हापूरहून नवीन वैद्यकीय अधिकारी येतो. आठ दिवसांनी पुन्हा तो गावी जातो. वैभववाडी, कट्टा, मालवण यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.

नव्या भरतीत तेलही गेले आणि तूपही!

नव्या भरतीत एकूण चार डॉक्टरांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यापैकी वैभववाडी येथे तात्पुरत्या स्वरूपात काम करत असलेल्या डॉक्टरांना कायमस्वरूपी करून ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशा दोन ठिकाणी नियुक्त्या दिल्या.

कट्टा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर गोडबोले म्हणून तात्पुरत्या स्वरूपात काम करत होते. त्यांना कायमस्वरूपी जिल्हा रुग्णालयात नियुक्ती देण्यात आली. वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एक वैद्यकीय अधिकारी स्वत:हून हजर झाला, तर मराठवाडयातील एका वैद्यकीय अधिका-याची जिल्हा रुग्णालयात केलेली नियुक्ती त्या डॉक्टरनी स्वीकारली नाही. एकूण ४ नियुक्त्यांपैकी २ डॉक्टर्स हे यापूर्वीच सेवा देत होते. फक्त १ डॉक्टर जिल्ह्याबाहेरून आला.

बदलीचा फार्स, सेवेला लागला फास!

२१२ जणांची राज्यात बदली झाली. या बदलीतील एक तरी डॉक्टर बदली होऊन सिंधुदुर्गात आला काय? नव्या १ हजार ८०० डॉक्टरांच्या भरतीत फक्त १ डॉक्टर सिंधुदुर्गाला मिळाले. हे आरोग्य मंत्र्यांचे यश म्हणावे की अपयश? दीडशे डॉक्टरांची ज्या ठिकाणी गरज आहे; त्या ठिकाणी फक्त २५ डॉक्टर काम करतात आणि ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात सेवा देतात.

योग्य पद्धतीने सेवा देत असलेल्या डॉक्टरांची मागणी नसताना अदलाबदल करून त्यांना मनस्ताप देण्याची गरज काय? असा मनस्ताप जिल्ह्यातील चार डॉक्टरांना आरोग्य विभागाने दिला. डॉ. शिकलगार कणकवली उपजिल्हा रुग्णालयात काम करत होते; त्यांची मालवण येथे बदली केली.

दोडामार्गमधील डॉ. आयवळे यांची सावंतवाडीत बदली केली आणि सावंतवाडीतील डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांची कणकवलीत बदली केली. या बदलीत आरोग्य विभागाने असे कोणते शौर्य मिळवले. आरोग्य विभागाच्या कारभाराचा अशोभनीय असा हा नमुना आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version