Home क्रीडा विराट कोहलीची दुस-या स्थानी झेप

विराट कोहलीची दुस-या स्थानी झेप

0

आयसीसी वनडे क्रमवारीत (रँकिंग) फलंदाजीत भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने दुस-या स्थानी झेप घेतली.

दुबई – आयसीसी वनडे क्रमवारीत (रँकिंग) फलंदाजीत भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने दुस-या स्थानी झेप घेतली. गोलंदाजीत मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने अव्वल दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले. कारकीर्दीत त्याला प्रथमच ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावता आले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या अर्धवट राहिलेल्या मालिकेत कोहलीला सूर गवसला. त्याने तीन लढतीत एका शतकासह १९१ धावा करताना मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. बहरलेल्या फलंदाजीमुळे विराटने दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमलाला तिस-या स्थानी ढकलत दुसरे रँकिंग मिळवले. अव्वल दहा फलंदाजांमध्ये कर्णधार महेंद्रसिंग ढोणीसह (सहावा) डावखुरा सलामीवीर शिखर धवन (आठवा) या भारतीयांचाही समावेश आहे. ताज्या क्रमवारीत ढोणीने रँकिंग कायम राखले तर धवनचे एका स्थानाने घसरले. डावखुरा सुरेश रैनाच्या स्थानांत तीनने वाढ झाली. सध्या तो १५व्या स्थानी आहे. फलंदाजी क्रमवारीत भारतानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व राखले आहे. अव्वल दहामध्ये त्यांचे तीन फलंदाज आहे. एबी डेविलियर्सने पहिले स्थान टिकवले आहे.

मध्यमगती भुवनेश्वर कुमारला विंडिजविरुद्ध तीन लढतीत केवळ घेता आल्या तरी त्याने किफायतशीर मारा केला. परिणामी भुवीचे स्थान सात अंकांनी वाढले. सध्या तो सातव्या स्थानी आहे. कारकीर्दीतील प्रथमच त्याला अव्वल दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवता आले. गोलंदाजीत भारतातर्फे सर्वाधिक रँकिंग डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाचे (सहावे) आहे. त्याच्यासह भुवनेश्वरने आता पहिल्या दहामध्ये आहेत. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाने (चौथे) अव्वल दहामध्ये स्थान राखले आहे.  वनडे क्रमवारीत भारत हा दक्षिण आफ्रिकेसह (११३ गुण) संयुक्तरित्या दुस-या स्थानी आहे. अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलिया तसेच त्यांच्यात केवळ एका गुणाचा फरक आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version