Home महामुंबई ‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये महिला सुरक्षा अभियान!

‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये महिला सुरक्षा अभियान!

0

देशातील महिलांच्या सुरक्षा, त्यांचे अधिकार यांची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह देशातील विविध शाखांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यासोबतच इतर नागरिकांना आवश्यक आहे.

मुंबई- देशातील महिलांच्या सुरक्षा, त्यांचे अधिकार यांची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह देशातील विविध शाखांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यासोबतच इतर नागरिकांना आवश्यक आहे. मात्र त्यासाठीची नेमकी परिस्थिती काय आहे, याची चाचपणी करण्यासाठी आयआयटी मुंबईकडून जानेवारी महिन्यात होत असलेल्या ‘टेकफेस्ट’मध्ये ‘महिला सुरक्षा’ नावाचे देशव्यापी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आदींसाठी विविध विषय देऊन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी देशभरातील मुख्य शहरांत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी राबवण्यात आलेल्या स्पध्रेत यशस्वी ठरलेल्या विजेत्यांना दोन लाखांचे पारितोषिकही देण्यात येणार आहे.

महिला सुरक्षा आणि अधिकार अभियान मुख्यत: चार टप्प्यांत आयोजित करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात त्यांच्या अधिकारांसंदर्भात खुली चर्चा विविध शहरांत होणार असून, यात परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे.  मुंबई, दिल्ली, चेन्नई आदी शहरांत हे परिसंवाद होतील. दुस-या टप्प्यात विविध प्रकारचे पथनाटय़, चौकसभा यांच्यासोबतच फ्लॅशमॉब, नृत्य, नाटक आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या अधिकारांसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. तिसरा टप्पा या अभियानाचा महत्त्वाचा असून, यात महिलांच्या एकूणच अधिकार आणि विकासाचे नेमके चित्र कसे असावे, यासाठी एक लोगो निश्चित करण्यात येणार आहे.

या लोगोचा शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रांत भविष्यात वापर  महत्त्वाचा ठरेल. शेवटच्या टप्प्यात देशभरातील विविध संस्था, संघटना अथवा विद्यार्थ्यांकडून शंभर मिनिटांचे व्हडिओ तयार करण्यात येणार आहेत. यात महिलांऐवजी जनसामान्यांचे चित्रण असून, ते महिलांच्या अधिकार आणि हक्कांसंदर्भात काय बोलतात, त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, हा विषय प्रामुख्याने हाताळला जाणार आहे. यासाठी देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापक, तज्ज्ञ विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले नामवंत, विचारवंतांकडून याविषयी माहितीही घेण्यात येणार आहे.

२५ ऑक्टोबपर्यंत नाव नोंदणी

टेकफेस्टच्या या महिला सुरक्षा आणि अधिकार अभियानात सहभागी होण्यासाठी शिक्षण अथवा वयाची अट ठेवण्यात आलेली नाही. कोणत्याही व्यक्तीला यात सहभागी होता येईल. यासाठी येत्या २५ ऑक्टोबपर्यंत टेकफेस्टच्या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी करणे मात्र अनिवार्य असल्याची माहिती टेकफेस्टच्या अधिका-यांकडून देण्यात आली.

अनेक संस्थांचा सहभाग

आयआयटी मुंबईत २ ते ४ जानेवारीदरम्यान ‘टेकफेस्ट-२०१५’ या तंत्रज्ञानाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या अभियानाच्या प्रभावासंदर्भात अंतिम निर्णय आणि माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानासाठी लाडली, क्लिन अँड क्लिनर अँड स्वाइप टेलिकॉम आदी संस्थांही सहभागी होणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version