Home महामुंबई आम्ही संविधान वाचविण्यासाठी लढत आहोत!

आम्ही संविधान वाचविण्यासाठी लढत आहोत!

0

मुंबई – आमचा लढा कुणाही व्यक्तीशी नाही. तर संविधानाच्या विरोधात जे आहेत, त्यांच्याशी आहे. आम्ही मनू स्मृती वाचविण्यासाठी लढत नाहीत, तर संविधान वाचविण्यासाठी लढत आहोत, असे मत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने व्यक्त केले. पेट्रोल महाग झाले तरी त्यासाठी औरंगजेबला दोषी कसे धरणार, असा सवाल करत  मोदी सरकारने राफेल विमानांची किंमत जाहीर करावी अशी मागणीही  त्यांनी केली.

मुंबई दौ-यावर आलेल्या कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, पतंप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करणे हे आमचे काम नाही. आम्ही मनू स्मृती वाचवण्यासाठी लढत नाही. आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत. आम्ही फक्त संविधानाचे संरक्षण करण्यासाठी लढत आहोत. लोकशाहीची मूल्ये मजबूत असायला हवीत.

पण दिवसेंदिवस ती संकटात येत असून पायदळी तुडवली जात आहेत. आता धुव्रीकरण केले जात आहे. चुकीचा ‘प्रपोगंडा’ राबवला जात आहे. अमर्त्य सेन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांवरही राष्ट्र विरोधी म्हणून शिक्का बसवला जातो. सध्या पत्रकारांनाही आपले काम गमवावे लागत आहे. जेएनयूमध्ये पत्रकारिता विभाग आहे. पण जेव्हा गौरी लंकेश यांची हत्या झाली, तेव्हा तिथे साधी शोकसभा होऊ शकली नाही. लोकांना ठरवू द्या काय चुकीचे आणि काय बरोबर, असे त्यांनी म्हटले.

कन्हैया कुमार म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात मालक आणि व्यवस्थापन वरचढ ठरू लागले आहेत. ही वेळ का आली याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मी जर देशद्रोही आणि दहशतवादी असेन तर मला तुरुंगात टाका, अन्यथा माझी माफी मागा. या सरकारने नोटाबंदी केली. त्यावेळी भ्रष्टाचार बंद होईल, दहशतवाद संपुष्टात येईल, असे म्हटले होते. मग नोटाबंदी होऊनही मेजर राणे शहीद कसे झाले, असा सवाल त्यांनी केला.

जेएनयूवर नेहमी आरोप केले जातात. जर जेएनयू देशविरोधी असेल तर त्याच विद्यापीठाच्या विद्यार्थी असलेल्या निर्मला सीतारामन यांना संरक्षण मंत्रिपदी का नियुक्त केले, असा सवाल केला. एका विद्यापीठाला गुन्हेगार कसे ठरवले जाते? मूळ मुद्यावरील चर्चा टाळण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version