Home मध्यंतर उमंग आपणच इस्तेमाल होतोय!

आपणच इस्तेमाल होतोय!

0

‘पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो’च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय.. काल घेतलेल्या वस्तू, ‘एक्सपायर’ व्हायच्या अगोदरच ‘आऊटडेटेड..?’ होताहेत.. माणसांचंही तसंच आहे म्हणा..

सकाळी उठल्यापासून.. ‘टुथपेस्ट में नमक’ असायला पाहिजे, चारकोल असायला पाहिजे.. लवंग, दालचिनी, विलायची अजून काय काय टाकतील..! दात घासायचेत, का दातांना फोडणी द्यायचीय, काय माहिती?
आणि सगळ्याच टुथपेस्ट ‘डेंटिस्ट का सुझाया नंबर वन ब्रँड’ असतात.. रातभर ढिशूंम ढिशूंम..

टुथब्रशच्या ब्रिसल्सवर जितके संशोधन झालेय तितके संशोधन ‘नासा’त तरी होतेय का, नाही कुणास ठाऊक!! कोने कोने तक पहुँचने चाहिए म्हणून मग आडवेतिडवे उभे सगळे प्रकार आहेत.. असोत बापडे.. पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथो का असतो, हे मला अजून समजलं नाही..!
अंघोळीचा साबण वेगळा, चेहरा धुवायचा वेगळा.. जेल वेगळं.. फेसवॉश वेगळं.. दूध, हल्दी, चंदन आणि बादामने अंघोळ तर क्लिओपात्राने पण केली नसेल, पण आता गरिबातली गरीब मुलगी पण सहज करतेय.. आधी शिकेकाईनेसुद्धा काम भागायचं, मग शॅम्पू आला.. मग समजलं की, शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना भी जरुरी हैं..

भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे, पण चेह-याचा मेकअप फार महागात पडतो.. पण तो केलाच पाहिजे.. नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे.. दाग अच्छे हैं, हे इथं का नाही लागू होत काय माहिती.. मी ‘गॅस, नो गॅस’ करत सगळे डिओ वापरून बघितले.. पण ‘टेढा हैं, पर मेरा हैं’ म्हणत एकही पोरगी कधी जवळ आली नाही.. खरंच.. सीधी बात, नो बकवास..
केस सिल्की हवेत, चेहरा तजेलदार हवा, त्वचा मुलायम हवी, रंग गोरा हवा, आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ हवा बस्स.. बाकी शिक्षण, संस्कार, बॉडी लँग्वेज, हुशारी हे गेलं चुलीत..!!

मला तर वाटतं, काही दिवसांतच सगळीकडे संतूर गर्ल, कॉम्प्लॅन बॉय, रॉकस्टार मॉम आणि फेअर अँड हॅन्डसम डॅड दिसतील..
साबून से पण किटाणू ट्रान्सफर होते हैं म्हणे.!! (हे म्हणजे, कीटकनाशकालाच किडे लागण्यासारखं आहे!) आता, तुमचा साबण पण स्लो असतो.. मग काय.. धुवत राहा, धुवत राहा, धुवत राहा..
टॉयलेट धुवायचा हार्पिक वेगळा, बाथरूमसाठीचा वेगळा..! मग त्यात खुशबुदार वाटावं म्हणून ओडोनिल बसवणं आलंच.. जसं काय मुक्कामच करायचाय तिथे..

हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी, मशीनने धुणार असाल तर वेगळी.. नाहीतर, तुम्हारी महँगी वॉशिंग मशीन भी बकेट से ज्यादा कुछ नहीं, वगैरे..
आणि हो, कॉलर स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच आणि कपडे चमकविण्यासाठी ‘आया नया उजाला, चार बुंदोवाला’..विसरून कसं चालेल..?
‘अगं, पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?’ हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..
म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे महामूर्ख.. आणि त्यात हॉर्लिक्स मिसळणारेच तेवढे हुशार!! यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..

..आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग..
‘इसको लगा डाला, तो लाईफ झिंगालाला,’ म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं.. पण ते एचडी नाहीये.. म्हणून मग मी घरात टीव्ही बघत असलो, की लगेच दार लावून घेतो.. न जाणो, कुठून तरी पाच-सात पोरं नाचत येतील आणि ‘अंकल का टीव्ही डब्बा, अंकल का टीव्ही डब्बा’..म्हणून माझ्या? ४०,०००/-च्या टीव्हीला चक्क डब्बा करतील.. याची धास्तीच वाटते..
‘पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो’च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय.. काल घेतलेल्या वस्तू, ‘एक्सपायर’ व्हायच्या अगोदरच ‘आऊटडेटेड..?’
होताहेत.. माणसांचंही तसंच आहे म्हणा..
असो.

– डॉ. टी. पी. लहाने, डीन
सर जे.जे. हॉस्पिटल, मुंबई

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version