Home क्रीडा आनंद होतोय जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सज्ज

आनंद होतोय जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सज्ज

0

जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध ७ नोव्हेंबरपासून सोची (रशिया) येथे होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी माजी जगज्जेता भारताचा विश्वनाथन आनंद सज्ज आहे.

चेन्नई – जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध ७ नोव्हेंबरपासून सोची (रशिया) येथे होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी माजी जगज्जेता भारताचा विश्वनाथन आनंद सज्ज आहे. मात्र त्याचवेळी चेन्नईत गेल्यावर्षी कार्लसनविरुद्ध गमावलेले जगज्जेतेपद आजही आनंदच्या मनात ताजे आहे. आता मात्र सहाव्यांदा जगज्जेतेपद पटकवण्यासाठी उत्सुक आनंद सध्या जर्मनी येथे तयारी करत आहेत.

‘‘आतापर्यंत मी किती जगज्जेतेपदाच्या लढती खेळलो याचा विचार करण्यापेक्षा सोचीमधील आगामी जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सज्ज होण्यावर माझा भर आहे. दोघांनाही एकमेकांचे कच्चे दुवे माहित असले तरी बुद्धिबळासारख्या खेळात त्या दिवसातील तुमच्या खेळाला महत्व असते. त्यातले त्यात एकमेकांचा खेळाचा अंदाज असल्याने तयारी करायला मदत होते. त्यातच आम्ही दोघे आतापर्यंत ब-याचवेळा एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत.

बुद्धिबळासारख्या खेळात अनुभवाला जास्त महत्व असते असे मला वाटत नाही. कारण प्रत्येक प्रतिस्पध्र्याची खेळायची शैली वेगळी असते. ज्याप्रकारे मी व्लादिमिर क्रॅमनिकविरुद्ध खेळेन त्याचप्रमाणे मी व्हॅसेलिन टोपालोवविरुद्ध खेळू शकणार नाही. कारण दोघांच्याही चाली खेळण्याच्या भिन्न शैली आहेत. मात्र अनुभवाचा उपयोग प्रतिस्पर्धी कसा खेळणार आहे याचा अभ्यास करण्यासाठी होतो. कार्लसनची शैली एंडगेममध्ये आहे जी आपण सर्वानीच पाहिली आहे,’’ असे आनंदने म्हटले.

चेन्नईविरुद्ध गेल्यावर्षी जगज्जेतेपदाच्या गमावलेल्या लढतीबाबतही आनंद बोलला. ‘‘माझ्या कारकीर्दीतील सर्वात अपयशी लढत चेन्नईमधील होती. माझा खेळ खराब झाला आणि मी पराभूत झालो. मात्र कॅँडिडेट्स स्पर्धा जिंकून नव्या जोमाने पुन्हा जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी तयार झालो. कॅँडिडेट्सपाठोपाठ बिल्बाओमधील जेतेपदावरही मी समाधानी आहे. या स्थितीत सोचीमधील लढतीसाठी मी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहे. आता मी केलेल्या तयारीप्रमाणे माझा जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळ झाला तर मी समाधानी असेन,’’ असे आनंदने म्हटले.

आनंदच्या ताजेतवाने होण्याच्या कल्पनाही वेगळ्या आहेत. ‘‘मोकळ्या वेळात मी माझा मुलगा अखिलसोबत वेळ घालवतो. आमच्या दोघांचा आवडता खेळ म्हणजे उशीशी खेळणे. टर्मिनेटर हा आवडता पिक्चर बघतही मी स्वत:ला उत्साही ठेवतो,’’ असे आनंदने म्हटले. रशियामध्येच २०१२मध्ये आनंदने गेलफॅँडला नमवत पाचवे जगज्जेतेपेद पटकवले होते. आता पुन्हा रशियामध्येच जगज्जेतेपदाची लढत आहे. यास्थितीत रशिया माझ्यासाठी लकी आहे यावर आनंदचादेखील विश्वास आहे.

कॅरुआनाच्या लढतीचा अभ्यास

जर्मनीत सध्या त्याच्या सेकंड्सबरोबर (टीम) सरावात मग्न असलेला आनंद हा जास्तकरून इटलीच्या फॅबियो कॅरुआनाच्या खेळाचा अभ्यास करत असल्याचे कळते. कॅरुआनाने गेल्या महिन्यात सेंट लुइस (अमेरिका) येथे झालेल्या सिंक्वेफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेत दमदार फॉर्म राखत जेतेपद पटकवले होते. त्यावेळी कॅरुआनाने कार्लसनला नमवले होते. त्यावेळी कॅरुआनाने कार्लसनविरुद्ध वापरलेल्या चालींचा अभ्यास आनंद करत आहे. याबाबतीत आनंदने दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. ‘‘सध्या बुद्धिबळात स्पर्धा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यातच वर्षभरात सातत्याने महत्वाच्या स्पर्धा होत असतात. यास्थितीत ग्रॅँडमास्टर सतत त्यांच्या खेळाच्या तंत्रात बदल करतात. त्यामुळे अनेकवेळा स्पर्धेसाठी केलेले नियोजन सामन्याच्यावेळेस बदलावेही लागते. त्यातच ग्रॅँडमास्टर फॅबियानोने यावर्षात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. त्याचा मोठा प्रभाव पडलेला आहे. प्रत्येकवेळी तो त्याच्या खेळात करत असलेला बदल लक्ष वेधून घेतो,’’ याकडे आनंदने लक्ष वेधले.

बुद्धिबळातील राजकारणापासून दूरच

कार्लसनने गेल्यावर्षी ज्याप्रमाणे सुरुवातीला चेन्नईमध्ये खेळण्यास नकार दिला होता तसाच नकार त्याने सोचीसाठीही दिला होता. अखेर करारावर स्वाक्ष-या करण्यावाचून कार्लसनसमोर पर्याय उरला नाही. याउलट आनंद मात्र कोणत्याही वादापासून सुरुवातीपासून दूर राहिला आहे. ‘‘बुद्धिबळातील राजकारणात कधीही शिरायचे नाही हे तंत्र मी सुरुवातीपासून अवलंबवले आहे. कारण त्यामुळे आपले नुकसानच होत असते. माझे काम फक्त खेळण्याचे आणि बुद्धिबळाचा प्रसार करण्याचे आहे,’’ याकडे आनंदने लक्ष वेधले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version