Home महामुंबई ठाणे आदिवासीच्या घरावर कोसळले झाड

आदिवासीच्या घरावर कोसळले झाड

0

नेरळ – कर्जत तालुक्यात मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यावेळी वादळी वा-यासह आलेल्या पावसामध्ये जांभूळवाडी येथील आदिवासी कुटुंबाच्या घरावर झाड कोसळले. रात्री घरात झोपलेले असताना त्यांच्या घरावर झाड कोसळले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

१२ सप्टेंबरच्या रात्री वातावरणात प्रचंड उष्मा असताना मध्यरात्री नंतर २च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्या आधी दिवसभर सर्वत्र कडक उन्हाच्या त्रासाने सर्व हैराण होते. त्यावेळी झालेल्या वादळी वा-यासह आलेल्या पावसात कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मध्ये असलेल्या जांभूळवाडी येथील आदिवासी वस्तीत वादळाने कहर केला होता. वाडीतील विलास हरिश्चंद्र पारधी यांच्या कौलारू घरावर झाड कोसळले. त्यावेळी घरात पारधी यांची पत्नी आणि दोन मुले झोपली होती. मात्र विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असल्याने संपूर्ण आदिवासी वाडी झोपेतून जागी झाली होती.

त्यामुळे विलास पारधी यांच्या घरावर झाड कोसळल्याचे समजतात, सर्व आदिवासी ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी रात्री आधी पारधी कुटुंबाला बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेले आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान, या घटनेबाबत कर्जत तालुक्यातील प्रशासनाला, आपत्कालीन कक्षाला तसेच महसूल विभागाला कोणतीही माहिती आज दिवसभर झालेली नव्हती. सकाळी ग्रामस्थांची मदत घेऊन विलास पारधी यांनी घरावर पडलेले झाड बाजूला काढले. या अपघातात पारधी यांच्या कुटुंबाचे किरकोळ नुकसान झाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version