Home मध्यंतर उमंग आत्महत्येला गुड बाय!

आत्महत्येला गुड बाय!

0

निसर्ग, निर्माता, परमेश्वर किंवा ‘तो’! या सृष्टीतील कर्ता जो कुणीही असो, मनुष्य ही त्याची अप्रतिम कलाकृती आहे. आणि त्याच्या या अप्रतिम कलाकृतीला निरातिशय महत्त्व देणारी गोष्ट म्हणजे जन्म आणि मृत्यू! मात्र आत्महत्या या कलाकृतीला कलंकच आहे..

जन्म आणि मृत्यू हे खचितच नियतीचं देणं आहे. परंतु, आत्महत्या ही विधात्याच्या अप्रतिम कलाकृतीला लागलेला कलंकच आहे. धक्का बसतो जेव्हा खूप जवळची व्यक्ती किंवा कुणी चांगली व्यक्ती आत्महत्या करते. खरंच इतकं स्वस्त आयुष्य असू शकतं का बरं माणसाचं? खरंच, माणसाच्या आयुष्याहून कुठली मोठी समस्या असू शकते का? कुणी तरी दिलेल्या सर्वोच्च भेटवस्तूला आपण किती प्रेमाने जपतो ना? मग विधात्याने दिलेल्या अप्रतिम आयुष्यरूपी भेटवस्तूला आपण तसेच का जपत नाही?

आज कोटय़वधी लोक, असाध्य आणि दुर्धर आजाराशी झगडत असतात, पण जीवन जगण्याची किती जबरदस्त इच्छाशक्ती त्यांच्यात असते तेव्हा प्रश्न हाच पडतो की धडधाकट असणारे, अशा कुठल्या गोष्टींनी प्रेरित होत असतील की आयुष्याच्या सारीपाटातून ते अकाली एक्झिट घेत असतील?

नेहमी लक्षात ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे आणि दु:ख हे सुखाची किंमत समजण्यासाठीचं एक परिमाण आहे. प्रत्येक समस्येला एक उत्तर नक्कीच असतं, त्यासाठी गरज असते आपल्या माणसांची, मन हलकं करण्याची, प्रयत्न करण्याची, सकारात्मक विचार बाणवण्याची. यासाठी चांगलं नशीब लागतं हे सुंदर आयुष्य मिळायला. या आयुष्याची किंमत करा, आयुष्यावर भरभरून प्रेम करा, कारण शेवट ठरलेलाच आहे, पण तो नैसर्गिक होऊ द्या, कृत्रिम नको. ज्या माऊलीने नऊ महिने, नऊ दिवस परिश्रम घेऊन तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलंय, लहानाचं मोठं केलंय, कमीत कमी तिच्या वेदनांचा नक्कीच तुम्ही आदर कराल, अशी अपेक्षा आहे.

आत्महत्या करणारा आत्महत्या करून सहज मोकळा होतो, पण त्याच्यावर अवलंबून असणारे शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या आठवणीत कुढत जगतात, कधी कधी पूर्ण उद्ध्वस्त होतात. यासाठीच आपल्यावर प्रेम करणा-यांना असं दु:ख देऊन जाण्याचा अधिकार नक्कीच आपल्याला नाहीये. कुणाच्याही मनात आत्महत्यांचे विचार येत असतील तर नक्कीच आपल्या जीवलगांशी बोला, मित्रांशी बोला, आई-वडिलांशी बोला, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आत्महत्यांच्या विचारांना गुड बाय म्हणा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version